Author
स्पर्धा परीक्षाः करिअरचा पाया आणि प्लॅन 'बी' ची गरज'
मा. अमित भोळे
संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय भारत सरकार, पायाभूत सुविधा / प्रकल्प वित्त, SYDENHAM खाते नियंत्रक जनरल,

सगळ्यांना नमस्कार..!

सर्वप्रथम, करिअर कट्टा या उपक्रमाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे आणि करिअर कट्टा परिवाराचे मनापासून अभिनंदन करतो. 
आजपर्यंत आपण स्पर्धा परीक्षा विशेषतः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेबद्दल बोलत आलेलो आहोतच. स्पर्धा परीक्षेबद्दल काही महत्त्वाच्या सूचना जर द्यायच्या झाल्या तर त्याच्यापैकी एक सर्वजण देतील अशी सामायिक सूचना ही आहे की, कोणत्याही स्पर्धा परीक्षेवर पूर्णपणे अवलंबून राहू नये त्या परीक्षेसाठी किंवा एकूणच आपल्या करिअरसाठी आपण एक 'प्लॅन बी' सुद्धा तयार ठेवला पाहिजे म्हणजे काय...? तर, समजा तुम्ही एका परीक्षेसाठी अभ्यास करीत आहात, अगदी पदवीनंतर कोणाला CAT ची परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहात तर केवळ CAT या परीक्षेसाठी तयारी न करता आपल्या नजरेसमोर अजून एक-दोन तत्सम परीक्षा असल्या पाहिजेत जेणेकरून CAT मध्ये आपले यथोचित गुण नाही मिळाले यामुळे जे आपलं ड्रीम कॉलेज आहे ते जर का हुकलं तर दुसरीकडे आपल्याला एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो आणि आपल करिअर हे चांगल्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो. कोणत्याही परीक्षेसाठी मग ती यूपीएससीची असो किंवा मग ती इतर कोणत्याही असोत स्पर्धा परीक्षेचा महत्त्वाचा एक पाया असला पाहिजे म्हणजेच काय तर हा पाया मजबूत असणे गरज 2 किंवा अंडरलाईन थॉट असतो ते म्हणजे आपल्याला एक चांगल करिअर घडवता यायला पाहिजे मग ते केवळ UPSC मधूनच होईल किंवा CAT मधून होईल किंवा अमुक स्पर्धा परीक्षा मधूनच होईल असं नसतं. म्हणजे एका परीक्षेबरोबर आपण अनेक दुसऱ्या परीक्षेची तयारी केलीच पाहिजे किंवा ते आपल्या नजरेसमोर एक ध्येय तरी किमान असलं पाहिजे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा हाच धागा पुढे नेताना या विचार प्रक्रियेने पुढे गेलो तर, आपल्याला लक्षात येईल की यूपीएससीची तयारी करताना आपण यूपीएससीच्या इतर परीक्षांबद्दल सुद्धा तयारी आपसूकपणे करीत असतोच, उदाहरण द्यायचे झाले तर सीएपीएफ असिस्टंट कमांइंटची परीक्षा आहे. महाराष्ट्रात कित्येक उमेदवार सीएपीएफ मध्ये आज यशस्वी होऊन ते कार्यरत आहेत. चांगलं कार्य देखील करीत आहेत. हाही एक पर्याय असतोच कारण काय तर यूपीएससीचा अभ्यास करताना आपल्याकडे एक पाया तयार झालेला असतो त्या पायावर आपण बाकीच्या गोष्टी पण आपल्यासाठी करू शकतो. तर हा विचार प्रथमदर्शनी न पटण्यासारखा आहे पण संयंतपणे आपण जर विचार केला तर लक्षात येईल की प्रामुख्याने एक परीक्षा ही सर्व काही नसते. म्हणजेच करिअर घडवण्यासाठी एक परीक्षा मदत करते हे बरोबर आहे पण त्या परीक्षेमध्ये आपण जर यशस्वी झालो नाहीत तर पुढे काय..? हा प्रश्न नेहमीच आपल्याला भांडावून सोडत असतो. मी तर असं म्हणेन की अशा प्रश्नांने आपल्याला खरेखुरे भांडावून सोडायलाच हवे. असं असलं तरच आपण इतर परीक्षांसाठी ओपन (खुले) होऊ आणि त्यासाठी सुद्धा आपण तितक्याच तन्मयतेने त्या गोष्टींकडे बघू शकू.

जर करिअर कट्टाचाच विचार केला तर करिअर कट्टाच्या संकल्पनेद्वारे जे मासिक आपल्याला दर महिन्याला उपलब्ध होत आहे तर त्यामध्ये अशा अनेक विभूतींशी आपला परिचय होतोय ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं आहे, वेगवेगळ्या करिअरच्या वाटा निवडलेल्या आहेत. त्या करिअरच्या मागे कुठलीही एकच परीक्षा नाही आहे. म्हणजेच वेगवेगळ्या परीक्षा आहेत मूळ मुद्दा हाच आहे की आपण आपलं करिअर घडवताना ओपन असलं पाहिजे "Mind should be open to accept various options" यामध्ये आपली आवड निवड ही केंद्रस्थानी असायलाच पाहिजे त्याबद्दल काही शंकाच नाही पण ही आवड असताना देखील त्याच्यामध्ये करिअर करण्यासाठी आपल्याला किती वाटा उपलब्ध आहे याचा सांगोपांग विचार या अनुषंगाने करायलाच पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे.

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये जेव्हा सर्वप्रथम आपण निर्णय घेतो की, अमुक ही स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि त्या हिशोबाने आपण तयारीला लागतो. खरं तर असं बघितलं तर तिथेच आपला अर्धा विजय हा झालेला असतो कारण आपण आपल्या मनाची तयारी करीत असतो की आपल्याला या स्पर्धा परीक्षांसाठी कसून प्रयत्न करायचे आहेत आणि त्या परीक्षेची जी गरज आहे तो अभ्यास करायचा आहे, त्या तयारीसाठी लागणारी आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत मग ते नोट्स गोळा करणे असो की स्वतःला एक शिस्तबद्ध वर्तन घालून देणं असो आणि त्या हिशोबाने अभ्यास करणे असो या सगळ्यांमध्ये एक सुसंगती आणून आपण आपल्याला एक दिशा देत असतो म्हणजेच पदवी शिक्षण घेताना जसं एकांगी प्रवास आपला सुरू असतो त्याच्यापासून थोड पुढे जाऊन आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतो.

यूपीएससीच्या नागरी सेवेच्या स्पर्धा परीक्षाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या जो पदवीचा विषय आहे त्या व्यतिरिक्त आपण काहीतरी एक वेगळा अभ्यास करणार आहोत आणि त्या हिशोबाने आपलं एक व्यक्तिमत्व तयार होणार आहे आणि हा जो व्यक्तिमत्व विकास आहे हा आपल्याला पुढे जाऊन कोणतेही करिअर करू किंवा काही पण काम करू यामध्ये आपल्याला नेहमीच उपयोगी पडणार आहे. उदाहरणतः समजा एक पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यूपीएससी करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे तो उमेदवार काही कारणास्तव यशस्वी झाला नाही तरी देखील त्याच्यासोबत ज्याने पदवी शिक्षण घेतल आहे आणि तो अमुक एका कंपनीमध्ये किंवा एका ठिकाणी नोकरी करीत आहे त्यापेक्षा या उमेदवाराला जो धोका पत्करून स्वतःला त्याने एक बळ दिलेले आहे. आपल्या बुद्धिमत्तेला आपल्या व्यक्तिमत्त्वाला बळ दिलेल आहे तो नेहमीच उजवा ठरतो. मग असं जेव्हा आपल्याला बळ मिळतं तेव्हा अपयश आल्यानंतर त्याला कसं पचवायचं किंवा त्याला कसं सामोरे जाऊन आपण आपला मार्ग निवडायचा..? तर जेव्हा आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतो तेव्हा आपण त्याचं एक अपयशाच प्लॅन ज्याला आपण 'प्लॅन बी' असे सुद्धा म्हणतो याच्यासाठी सुद्धा आपण तयारी करून ठेवली पाहिजे कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये एक समान धागा असतो आणि तो धागा असतो अनिश्चिततेचा.

ही अनिश्चितता मग ती कोणावरही येऊ शकते तेव्हा त्याचा विचार देखील आपण सारासारपणे केला पाहिजे. फक्त आपल्याला अमुक गोष्ट करायला आवडते, तमुक गोष्ट आपल्याला माहिती आहे म्हणून भावनिक दृष्ट्या विचार न करता अगदी तटस्थपणे विचार करणे गरजेचे आहे म्हणून प्लॅन बी हा नेहमीच आपल्याला फायदेशीर ठरतो.

कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना जर आपण तयारी करतो आहोत तर त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये कोणते बदल होतात हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. एकतर या कोणत्याही स्पर्धा परीक्षांमुळे आपल्यामध्ये एक शिस्तबद्धपणा येतो या अशा स्पर्धा परीक्षांमुळे आपल्याला आपली एक पातळी कळते की आपण कोणत्या डोहामध्ये पोहोत आहोत म्हणजे आपल्या गावाजवळची विहीर आहे की, हा समुद्र आहे त्या हिशोबाने आपण आपले क्षितिज आखत असतो त्यामुळेच अशी स्पर्धा परीक्षा देणं ही काळाची गरज आहे कारण आज सर्वदूर बघता तुम्ही कोणत्याही नोकरीसाठी म्हणा किंवा पदवी परीक्षेसाठी म्हणा, या स्पर्धा परीक्षांपासून दूर पळणे हा पर्याय असूच शकत नाही. सांगायचा मुद्दा हा आहे की, स्पर्धा परीक्षा हा एक अविभाज्य घटक बनला आहे आपल्या आयुष्याचा.

तर यासाठी घाबरून न जाता शिस्तबद्ध आणि कंट्रोल एप्रोच आपला कायमच असला पाहिजे जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा देखील विकास होईल आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते देखील साध्य होऊ शकेल.

हे असं नमूद केलेलं जरी थोडसं वावग वाटत असलं तरी त्याच्या मागे जो गाभा दडलेला आहे तो उमेदवाराच्या लक्षात यायला पाहिजे. ज्याच्या अन्वये मी इथे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की स्पर्धा परीक्षा कोणती पण असू देत यासाठी एक प्लॅन आवश्यक आहे आणि हा प्लॅन केवळ स्पर्धा परीक्षांसाठी न करता आपल्या करिअरसाठी प्लॅन करायला पाहिजे तरच एक यशस्वी नियोजन याला म्हणता येईल आणि मी या आधीच्या लेखांमध्ये सुद्धा नमूद केल आहे की कोणतीही परीक्षा द्यायची असल्यास तीन प्रमुख गोष्टी महत्वाच्या असतात. हे असे मेथोडॉजिकल एप्रोचद्वारा स्वतःसाठी एक शोध घेतला पाहिजे आणि खरतर हा शोध घेता घेता उमेदवाराला नकळतपणे स्वतःचा शोध लागतो म्हणजे असं की उमेदवाराला नकळतपणे कळायला लागतं की आपल्याला विशिष्ट विषयामध्ये जास्त आवड आहे म्हणून कित्येक उमेदवार आणि कित्येक अधिकारी मी आजही प्रशासनात सुद्धा बघतोय की त्यांना ज्या विषयाची आवड नागरी सेवेत येताना अभ्यास करताना लागली होती त्याच विषयात त्यांनी नंतर पुढे Post graduation केलं आणि Ph.D सुद्धा केली तर हा स्वतःचा जो शोध आहे तो या स्पर्धा परीक्षांमुळे सुकर होतो असं मला इथे आवर्जून नमूद कराव वाटतं आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षाही केवळ करिअरचा मार्ग नाही तर, ती उमेदवाराला स्वतःचा शोध घ्यायला लावते UPSC असो व अन्य कुठलीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेची तयारी उमेदवाराला शिस्त, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास देते पण या प्रवासात 'प्लॅन बी' ठेवणे अत्यावश्यक आहे कारण करिअर घडवताना एकाच मार्गावर अवलंबून न राहता अनेक पर्याय खुले ठेवले तरच यशस्वी नियोजन साध्य होऊ शकते.