अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होत. आता त्यात सोशल मिडीया ही चौथी गरज म्हणून शिक्कामोर्तब झालेली आहे. लिपी आणि भाषेच्या शोधाने मानवी संपर्क व संवादात क्रांती घडली असली, तरी सोशल मिडीयाने संपर्क आणि संवादातील भौगोलिक सीमा व अंतर पूर्णपणे शून्य करून टाकले आहे. तसेच याच सोशल मिडीयाने वेळेचे अंतर तर काही सेकंदांच्या आत आणले आहे. एकंदरच या सोशल मिडीयाने मानवाच्या विशेषतः तरुणांच्या संपूर्ण जीवनाला व्यापून टाकले आहे. सोशल मिडीया ही युवकांच्या हातातील संपर्क आणि संवादाबाबतची एक नवी शक्ती म्हणून उदयास आली आहे; पण ही शक्ती पेलण्यासाठी आजचा युवक तेवढा सामर्थ्यवान आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अनुषंगाने या शक्तीचा उदय, तिचा वापर आणि तिचे भवितव्य याबाबत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहोत.
तीन लाख वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने शहाण्या मानवाचा पृथ्वीतलावर वावर सुरू झाला. एकाच भूप्रदेशात राहणे, अन्न मिळवण्यासाठी भटकंती करणे आणि पुनरुत्पादन करून वंश वाढवणे अशा प्रकारे अनेक वर्षे सर्व काही सुरळीत चालू होते. हळूहळू हा मानव मिळणाऱ्या माहितीचे आकलन, विश्लेषण आणि विचारमंथन करू लागला. तेव्हा तो उत्क्रांतीच्या प्रक्रियेत समाविष्ट झाला. ही उत्क्रांती फक्त शारीरिकच नव्हे, तर मानसिक स्तरावरही सुरू झाली होती. त्यामुळे राहत असलेल्या भूप्रदेशातील वातावरणाशी जुळवून घ्यावे लागले; तसे त्याचे शरीर अनुरूप बदल घडवून आणत होते. मात्र हे बदल अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचे आणि अत्यंत मंद गतीने होत होते. याउलट मानसिक बदल मात्र वेगाने पुढे जात होते. त्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा मानव उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अधिक गतीने पुढे गेला. ही उत्क्रांतीची गती आगीच्या शोधाने सुरू झाली, चाकाच्या शोधाने वाढली, शेतीच्या शोधाने अधिक वाढली आणि लिपी व भाषेच्या शोधाने तर खरी गती पकडली. छपाई,संदेशवहन, रेडिओ, इंटरनेट आणि मोबाइल यांनी जग अगदी जवळ आणले. सोशल मिडीयाने माणसांना जवळ आणले आणि त्यासोबतच माणसा-माणसांमधील संपर्क व संवादाचे भौगोलिक अंतर शून्य केले.
सोशल मिडीया हा मानवी उत्क्रांतीचा भाग आहे की क्रांतीचा, हा संशोधनाचा विषय असला तरी सोशल मिडीयामुळे झालेले आमूलाग्र बदल हे शारीरिक आणि मानसिक अंगवळणी पडण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी लागतो; पण तसे झाले नाही. अचानकच तरुणाई या सोशल मिडीयावर स्वार झाली आहे. सहजच त्याचे अनेक चांगले आणि वाईट परिणाम समोर येऊ लागले आहेत. जे बदल शारीरिक आणि मानसिक अंगवळणी पडत नाहीत, ते निश्चितच शारीरिक व मानसिक व्याधी निर्माण करतात. सोशल मिडीयाने तरुणाईच्या शारीरिक तक्रारी वाढवल्या आहेत, याबाबत कोणाचेही दुमत नसावे. डोळ्यांवर येणारा ताण, मानेच्या मणक्यांवर येणारा ताण, चेहऱ्याच्या त्वचेवर मोबाइलच्या प्रकाशामुळे होणारा परिणाम या तक्रारी प्रमुखपणे नमूद कराव्या लागतील. मानसिक तक्रारींमध्ये विचारप्रक्रिया मंदावणे, येणाऱ्या संदेशांमुळे सतत विचलित होणे, विचारप्रक्रिया कायम क्लिष्ट राहणे, दुःख व निराशा निर्माण होणे, भीती वाटणे आणि चिडचिड होणे या समस्या मोबाइल आणि एकूणच सोशल मिडीयाने वाढवल्या आहेत, याबाबतही कोणाचे दुमत नसावे. "कळतंय पण वळत नाही" अशी युवकांची आजची परिस्थिती आहे.
सोशल मिडीया तसा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अंगवळणी पडलेला नसला तरी उपलब्ध होणारी माहिती, साधला जाणारा संपर्क आणि संवाद यांचे आकर्षण इतके प्रबळ आहे की युवक गुरुत्वाकर्षणासारखे त्याकडे ओढले जातात. ही शक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि विचारही करू देत नाही. त्यामुळे माहिती, डेटा, भाषा, लिपी, व्हिडिओ, ऑडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून केवळ माहितीचा भडीमार होत आहे. एवढी माहिती कशी साठवायची, हा मेंदूसमोरचा मोठा प्रश्न असल्याने मेंदूने माहिती लगेच ही माहिती बाजूला टाकण्यास सुरुवात केली आहे. माहिती इतकी आहे की, तिचे आकलन आणि विश्लेषण करण्यातच मेंदूचा बराच वेळ आणि ऊर्जा खर्च होत असल्याने मेंदूने आकलन व विश्लेषण करणे थांबवले आहे. जे आहे ते तसे स्वीकारण्याच्या दृष्टीने मेंदूची वाटचाल सुरू आहे; हे आजच्या पिढीसाठी निश्चितच हितावह नाही.
साहजिकच युवकांच्या आकलनशक्ती आणि विश्लेषणशक्तीवर सोशल मिडीयाचे दूरगामी परिणाम होत आहेत. मेंदू आणि मनाची जोडणी यामुळे विस्कळीत झाली आहे. मन मेंदूला काय सांगते आणि मेंदू मनाला काय सांगतो, याचा गोंधळ निर्माण झाल्याने मनातून निर्माण होणाऱ्या भावनांमध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा आला आहे. त्यामुळे आनंद, दुःख, राग, भीती, तिरस्कार, आश्चर्य, प्रेम, माया यांमध्ये कमालीची उलथापालथ झाली आहे. पूर्वी या भावना प्रसंगानुरूप व्यक्त केल्या जात होत्या; आता त्या पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे भावना आणि विचार यांचा ताळमेळ जुळेनासा झाला आहे.
प्रत्येक तरुण या सोशल मिडीयावर अवलंबून आहे. जग कायम बदलत असते आणि विज्ञान-तंत्रज्ञान या बदलाला गती देत असते. मानवाला तसा तीन लाख वर्षांचा इतिहास आहे. जसे बदल होत गेले, तसे त्या बदलांशी मानव समरस होत गेला. परंतु आताच्या बदलांशी मानसिक आणि शारीरिक समरसता आली आहे का, या बाबत मोठे प्रश्नचिन्ह संशोधकांसमोर आहे. त्यापैकी सोशल मिडीयाचा मोठा वापर आणि त्याला आवश्यक असलेले मानसिक व शारीरिक बदल होत आहेत का, हेही पाहणे आवश्यक ठरणार आहे.
मोबाइल आणि त्याच्या विद्युतचुंबकीय लहरींनी संपूर्ण जग व्यापले आहे. मोबाइल क्रांती तर झालीच, परंतु त्यासोबत सोशल मिडीया क्रांती झाली. सोशल मिडीयाने जागतिक पातळीवर अनेक महासत्तांना धक्के दिले आणि कौटुंबिक पातळीवर तर कहरच केला आहे. वैयक्तिक आणि अंतरवैयक्तिक नातेसंबंधांपेक्षा आभासी नातेसंबंध आणि जग याच्याशी सर्व जण जोडले गेले आहेत. आभासी नातेसंबंधांमध्ये संपर्क आणि संवादाची जोडणी जलद गतीने होत असली तरी ते संबंध जिव्हाळा निर्माण करू शकत नाहीत. जिव्हाळा निर्माण करण्यासाठी डोळे, स्पर्श, प्रत्यक्ष भावनिक आणि मानसिक आधार यांची महत्त्वाची भूमिका असते. आभासी नातेसंबंधांमध्ये याचा अभाव दिसून येतो.
सोशल मिडीयाने संपर्क आणि संवादात गती आणली असली तरी त्यातून निर्माण होणारे फायदे यापेक्षा तोटे अधिक गंभीर स्वरूपाचे आहेत. व्यावसायिक आणि प्रशासकीय पातळीवर सोशल मिडीयाचे फायदे दिसत असले तरी वैयक्तिक पातळीवर अभासी संवादापलीकडे तो काम करू शकलेला नाही. तसेच मानवाची कार्यप्रवणता आणि कार्यक्षमता कमी होण्यासही सोशल मिडीयाने हातभार लावला आहे. सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता हरवून बसू की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
सोशल मिडीया जरी आकर्षक असले तरी दीर्घकालीन मानवी विकासासाठी ते उपयोगी ठरत नाही. आपल्याकडे असणारा वेळ जो बहुमूल्य आहे तो आभासी जगात आणि फक्त माहिती ऐकण्यात, पाहण्यात व वाचण्यात घालवल्यामुळे इतर काही निर्मितीपूर्ण कामांसाठी कोणाकडेही वेळ शिल्लक राहत नाही. असे काही तरुण आहेत की २४ तासांपैकी १० तासांपेक्षा जास्त वेळ मोबाइल आणि सोशल मिडीयावर खर्च करतात. एकंदर मानवी भांडवलाची शक्ती क्षीण आणि कमी झालेली दिसते. त्यामुळे व्यावसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर समस्या अधिक प्रमाणात दिसू लागल्या आहेत. यापुढेही सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढले असून अनेकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे.
माणूस असा प्राणी आहे की तो नेहमी टाकाऊ कडून टिकाऊ शोधत असतो. साहजिकच सोशल मिडीयाने जरी जग व्यापले असले तरी पुढील काळात याबाबत खूप बदल अपेक्षित आहेत. या सोशल मिडीयाचा वापर आवश्यक तेवढाच, कार्यक्षमतेने आणि परिणामकारकपणे होणे आवश्यक आहे; हीच काळाची गरज आहे. अन्यथा मानव प्राणी या सोशल मीडियापासून दूर पळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतीही गोष्ट अशी नाही की ती मानवाला कायम हरवू शकते किंवा त्याचे हरण करू शकते; कारण एकाच वेळी मानवजात समोर अनेक पर्याय ठेवते आणि योग्य वेळी योग्य पर्याय निवडण्यात ती वाकबगार आहे. सोशल मिडीया किती काळ माणसाला काबूत ठेवेल, हे सध्या सांगता येत नसले तरी सोशल मिडीयाचे अजून बरेच चांगले वाईट परिणाम समोर येणार आहेत.
साहजिकच युवकांनी सोशल मिडीयाचा वापर समयसूचक, मर्यादित, आवश्यकतेपुरता, कार्यक्षमतेने, परिणामकारकपणे आणि मानवी जीवन अधिक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत व सुखकर करण्यासाठी करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे.