Author
करिअरचा दिपस्तंभ : करिअर कट्टा
मा. सोनाली लोहार
सदस्य, सल्लागार समिती, करिअर कट्टा

२५ फेब्रुवारी २०२६ ला महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या आपल्या 'करिअर कट्टा' उपक्रमास ५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या चळवळीशी संबंधित आणि याला जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, संस्थेचे आणि विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

एखाद्या विशिष्ट सामाजिक, राजकीय किंवा सार्वजनिक प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा अनेक लोक संघटित होऊन सातत्याने आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, तेव्हा त्या कृतीला 'चळवळ' असे म्हणतात आणि म्हणूनच हा शब्द 'करिअर कट्टा' या उपक्रमाला तंतोतंत लागू होतो. या व्याख्येत आलेला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. पण सगळ्यात महत्वाचा शब्द म्हणजे संघटन.

एखादा मोठा विचार डोक्यात येणे आणि मग सामाजिक हिताच्या पार्श्वभूमीवर तो व्यापक स्वरुपात कार्यरत करणे यासाठी नेहमीच संघटनेची आवश्यकता आहे. अर्थात 'विचार' हा सर्वोच्च स्थानीच असतो.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलायला हवे, आणि त्यासाठी महत्वाचा ठरतो तो त्यांच्या 'करिअरचा पाया' हा विचार सर्वप्रथम ज्यांच्या ध्यानी आला ते म्हणजे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे. विद्यार्थी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या यशवंतजींना स्वानुभवाने विद्यार्थी दशेतील अडचणींचे संपूर्णतः आकलन होते. आमच्या वैद्यकिय भाषेत असे म्हंटले जाते की, 'Treat the Root cause and not the symptom.' समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असते, लक्षणांवर उपाय ही केवळ मलमपट्टी असते.

प्रचंड वेगाने क्षणाक्षणाला बदलणाऱ्या या भवतालाचा 'विद्यार्थी' हा एक फार मोठा आणि महत्वाचा घटक आहे. या बदलांचा विद्यार्थ्यांवर 'बरा-वाईट' सगळाच परिणाम होतो. काही या कोलाहलात तरून जातात तर काही केवळ प्रवाहासोबत वाहत जातात. इच्छा, इच्छाशक्ती, क्षमता हे सर्व असूनही बरेचदा मार्गदर्शन आणि संसाधनांच्या अभावापायी विद्यार्थी हे सर्वच स्तरावर असमाधानी ठरु शकतात. वास्तविक पाहता हा उद्याचा जबाबदार नागरिक आणि नेतृत्व करणारा घटक आहे. विद्यार्थ्याने योग्य वेळी आत्मसात केलेले ज्ञान, कौशल्य आणि मूल्य ही समाजालाही योग्य दिशा देण्यास मदत करतात. यास्तवच विद्यार्थ्यांची विचारशक्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि नवीन तंत्रज्ञान आणि नव्या कल्पना स्विकारण्याची क्षमता विकसित केली गेली तर हाच विद्यार्थी समाज आधुनिक आणि प्रगत करतो, समस्येवर उपाय सुचवू शकतो, आर्थिक विकासाला चालना देऊ शकतो, समता आणि सामाजिक न्यायासाठी प्रयत्नशील राहू शकतो.

'करिअर कट्टा' या चळवळीचा हा गाभा आहे; याचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे. गेले ५ वर्षात या दृष्टीने अनेक उपक्रम सुरु करण्यात आले. उद्योजक आपल्या भेटीला, IAS/IPS आपल्या भेटीला या उपक्रमांपासून सुरु झालेला आपला प्रवास हा आता 'मधुर क्रांती' हा मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रकल्पापर्यंत यशस्वीपणे येऊन पोहोचला आहे. युवकांना उपलब्ध संधींची केवळ माहिती न देता कौशल्यविकास स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नवनवीन संधी उपलब्ध करून हे करिअर कट्ट्याचे महत्वाचे उद्दीष्ट राहीले आहे. या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी प्रशिक्षित झाले आहेतच पण अनेकांनी यशस्वीरीत्या अतिशय अभिनव असे स्टार्टअप्सही सुरु केले आहेत ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.

याहूनही महत्वाचं होतं ते म्हणजे महाराष्ट्रभरातील आपल्या युवकांशी या माध्यमातून साधला जाणारा संवाद. त्यांच्या अडचणी समजवून घेणं, त्या समस्यांवर तातडीने उपाययोजना होतील हे बघणं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या विद्यार्थ्यांना बोलतं करणे, त्यांच्यामधील नेतृत्व गुण जागृत करणं. महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात महाविद्यालयीन स्तरावर स्थापन झालेली 'करिअर संसद' या 'करिअर कट्ट्यासाठी' अत्यंत भूषणावह आणि अभिमानास्पद उपलब्धी आहे.

ही चळवळ आता व्यापक होत चालली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांच्या मोलाच्या सहकार्यान लवकरच या रोपट्याचा महावृक्ष होईल यात दुमत असण्याचं कारण नाही. शिक्षकांसाठी आवाजाची कार्यशाळा घेण्याचाही मला योग आला याचा आतिशय आनंद आहे.

परत एकदा 'करिअर कट्टा' या उपक्रमासाठी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा !