Author
संपादकीय
मा. यशवंत शितोळे
अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र

फेब्रुवारी महिन्याचा हा करिअर कट्टा वर्धापन दिन विशेषांक. या विशेषांकाच संपादकीय लिहीत असताना, संपूर्ण महाराष्ट्राला नको असणारी अशी ही घटना जानेवारी महिन्याच्या शेवटी घडली, ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे एका विमान अपघातामध्ये आपणा सर्वांना सोडून गेले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक उत्तम प्रशासक, प्रशासनावर पकड असणारा नेता आणि कामाची धडाडी असणारे एक नेतृत्व महाराष्ट्रान गमावलं. सन्माननीय अजितदादा पवार यांना करिअर कट्टाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो..

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी करिअर कट्टा आपल्या प्रवासाची पाच वर्षे पूर्ण करतोय. हा उपक्रम कोविडच्या काळात सुरू झाला. त्यावेळी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाची स्वीकृती कधी नव्हे, ते आपल्या व्यवस्थेने स्वीकारली होती. हे संक्रमण बऱ्याच ठिकाणी फायदेशीर ठरलेलं आहे आणि काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थेची हानी करणारे देखील ठरलेलं आहे. बरेच विद्यार्थ्यांना, तरुणांना हे सहज शक्य वाटायला लागले की कॉलेजमध्ये न जाता देखील परीक्षा पास होता येते आपल्याला डिग्री मिळू शकते आणि या गोष्टीमुळे महाविद्यालयातल्या उपस्थितीवर फार मोठा परिणाम हा गेल्या चार वर्षांमध्ये जाणवायला लागलेला आहे. असे असले तरी करिअर कट्टाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयाचे समन्वयक, महाविद्यालयाचे प्राचार्य, करिअर संसदेचे सर्व पदाधिकारी आणि करिअर कट्टाचे हितचिंतक या सर्वांनी वारंवार या करिअर कट्टाच्या यंत्रणामध्ये आवश्यक ते बदल सुचवले आणि करिअर कट्टा उपक्रम जास्तीत जास्त विद्यार्थीकेंद्रीत उपक्रमाच्या मार्गाने बहरत गेला.

आज या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये लागले आहेत, उद्योजकीय प्रेरणा मुलांच्या मनामध्ये जागृत करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली पाहिजे या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यासाठी सातत्यपूर्ण करिअर कट्टा देखील प्रयत्नशील आहे. करिअर कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यामध्ये काळानुरूप शिक्षकांनी देखील बदलले पाहिजे या उद्देशाने, 'AI टीचर' नावाचा महाराष्ट्र राज्य विकास प्रबोधिनीच्या सहकार्याने एक प्रशिक्षण कार्यक्रम बारामती मध्ये राबविण्यात आला होता. याच महिन्यामध्ये प्रतीक्षेत असणारा खादी ग्रामोद्योग महामंडळाबरोबरचा सामंजस्य करार देखील पार पडला, ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मधुमक्षिका पालन आणि त्याचे व्यावसायिक रूपांतर याविषयीचे वस्तुनिष्ठ प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करिअर कट्टाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या महिन्याच्या मासिकाचे निमंत्रित संपादक महाराष्ट्र राज्याच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) सन्माननीय रविंद्र साठे सर आणि मंडळाचे इतर सदस्य, मा. गीतांजली बावीस्कर (भा.प्र. से. मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग मंडळ), मा. रवींद्र ठाकरे (सह मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग मंडळ), मा. नित्यानंद पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग मंडळ) यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील ते नियोजनबद्ध उपक्रम राबवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठीशी उभे राहतील असा विश्वास वाटतो. या सामंजस्य करारांतर्गत तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता नियंत्रण समितीमध्ये प्राचार्य अतुल साळुंखे सर, प्राचार्या डॉ. दीपा वर्मा मॅडम, प्रा. डॉ. अजित दिघे सर या सर्वांची मोलाची मदत झाली हे विशेषत्वाने नमूद करू इच्छितो. या सामंजस्य करारामुळे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण मधमाशी विषयी सर्वसामान्य ज्ञान विद्यार्थ्यांना कृती आधारे मिळणार असल्याने याचा निश्चितच लाभहोणार आहे. तर, या विशेष अंकात राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर सर यांनी शिक्षण क्षेत्रातील आजच्या एकूणच परिस्थितीच्या अनुषंगाने 'का धरीला परदेश..? भारतीय शिक्षणाचा पुनर्विचार' या लेखाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे चिंतनशील विचार मांडले आहेत. मा. डॉ. तुषाबा शिंदे सर (IRPS, New Delhi) यांनी 'MBA प्रवेश परीक्षाः अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, पुस्तके व संपूर्ण तयारी मार्गदर्शन' या लेखाच्या साह्याने विद्यार्थ्यांसाठी या प्रवेश परीक्षेची सखोलपणे संपूर्ण माहिती विशद केली आहे. तसेच, मा. अमित भोळे सर (संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय भारत सरकार) यांनी 'स्पर्धा परीक्षाः करिअरचा पाया आणि प्लॅन बी ची गरज' विद्यार्थ्यांना या लेखाद्वारे पटवून दिलेली आहे. मा. राजीव नंदकर सर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक यशदा, पुणे) यांनी आजच्या तरुणाईला संबोधित करताना, 'आजची तरुणाई आणि सोशल मीडियाचे आभासी जग' या अत्यंत विचारप्रवण करणाऱ्या विषयाला हात घालून मार्गदर्शनपर लेख लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे सल्लागार समितीच्या सन्माननीय सदस्य असलेल्या डॉ. सोनाली लोहार मॅडम यांनी 'करिअरचा दीपस्तंभः करिअर कट्टा' या लेखाच्या माध्यमातून करिअर कट्टाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सुंदर आणि तितक्याच भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. करिअर कट्टाचा यंदाचा युवा उद्योजक पुरस्कारप्राप्त मा. भूषण मुथियान यांचा ऑटोमेटॉन एआय इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची यशस्वी वाटचाल यावर आधारित 'कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण आणि मानवी विवेकः भूषण मुथियान' यांची प्रेरणादायी वाटचाल कु. पूर्वा वानखडे यांनी लेख लिहिलेला आहे. मा. मिथिला दळवी मॅडम यांचा 'आनंद, उत्साह, ऊर्जा आणि...' या लेखाच्या माध्यमातून करिअर कट्टाच्या या अभिनव उपक्रमाला उत्साहवर्धक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच, मा. प्राचार्य धनंजय तळवणकर (अध्यक्ष, राज्यस्तरीय करिअर संसद समिती) यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनाचा संपूर्ण लेखाजोखा मांडला आहे. मागील अंकात नजरचुकीने माननीय प्राचार्य धनंजय तळवणकर सर यांचा लेख प्रकाशित करायचा राहून गेला तेव्हा याप्रसंगी त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. मा. प्रा. दिनेश पवार सर (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक) यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त 'करिअरच्या वाटेतील दहा पायऱ्या' याचे महत्त्व सांगितलेले आहे. राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समितीच्या अध्यक्षा मा. प्राचार्या शरयू तायवाडे मॅडम यांचा 'उच्च शिक्षण विभागांमध्ये करिअर कट्टा कडून संपन्न झालेले उपक्रम' हा अहवालात्मक लेख या अंकात आहे. तर, मा. प्रा. डॉ. वर्षा वैद्य मॅडम यांनी 'करिअर कट्टाः विद्यार्थ्यांच्या उन्नयनाचा राजमार्ग' या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, प्राचार्य आणि एकूणच महाविद्यालयासाठी या उपक्रमाचे किती महत्त्व आहे हे अधोरेखित करणारा लेख लिहिलेला आहे. तसेच मा. डिंपल मित्तल यांचा लेख आहे.

करिअर कट्टाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, ग्रंथपाल या नात्याने करिअर कट्टा हे मासिक विद्यार्थ्यांसाठी किती उपयुक्त आहे हे सांगणारे लेख अनुक्रमे प्रा. शिवानी बलकुंदी मॅडम, प्रा. रोहिदास लोहकरे सर आणि प्रा. सारिका पाटील मॅडम यांनी सुंदर अशा अभिप्रायाच्या माध्यमातून लेख लिहिलेले आहे. अगदी त्याचप्रमाणे, राज्यस्तरीय करिअर संसदेचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करणारे, रामेश्वर मोरे आणि कु. पर्जन्या अंजुटगी यांचे अभिप्राय दाखल लेख ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच डॉ. श्रीकांत इंगळे यांचा चालू घडामोडी हा लेख तर, प्रा. संदेश कासार यांनी तयार केलेली प्रश्नमंजुषा या अंकात घेण्यात आलेली आहे.

पाच वर्षाच्या या प्रवासाचे सिंहावलोकन करत असताना करिअर कट्टा या व्यवस्थेने ज्या पद्धतीने स्वीकारलेला आहे ज्या पद्धतीने विद्यार्थी या उपक्रमाला प्रतिसाद देत आहे ही बाब अत्यंत सकारात्मक आहे. लाखो विद्यार्थी करिअर कट्टाच्या उपक्रमांमध्ये त्यांना आवश्यक त्या पद्धतीचे मार्गदर्शन उपलब्ध करून घेत आहे. या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश देऊन देखील अनेक मान्यवरांनी आपल्या सदिच्छांच पाठबळ करिअर कट्टाच्या पाठीशी उभ केलेल आहे या सर्वांचे देखील मनःपूर्वक या ठिकाणी आभार मानतो.

या विशेषांकामध्ये ज्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या ज्यांनी आपले लेखन केले आणि हा अंक समृद्ध बनवला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. अशाप्रकारे, संपादकीय मंडळाच्या अथक परिश्रमातून या फेब्रुवारी महिन्याचे करिअर कट्टा मासिक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फलदायी ठरणार आहे असे वाटते. करिअर कट्टाचा उपक्रम हा जास्तीत जास्त विद्यार्थीभिमुख होण्यासाठीच्या प्रवासामध्ये ज्या ज्या ज्ञात, अज्ञात घटकांनी योगदान दिले तर सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा देखील या ठिकाणी पार पडल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आणि ज्यांनी उत्तम असं यश मिळवलं या सर्वांचे मनःपूर्वक या प्रसंगी अभिनंदन करतो. या पाच वर्षाच्या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे, करिअर संसदेचे, प्राध्यापक वृंदांचे आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

करिअर कट्टा हा केवळ एक उपक्रम नसून, सामूहिक स्वप्नांची पूर्तता आहे. पाच वर्षाचा टप्पा हा केवळ सुरुवात आहे पुढील दशकात करिअर कट्टा अधिकाधिक विद्यार्थ्यांना दिशा, प्रेरणा आणि नवनवीन संधी देईल हा आशावाद व्यक्त करून थांबतो.

धन्यवाद...!

जय हिंद, जय महाराष्ट्र.