आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ तांत्रिक संकल्पना उरलेली नाही; ती समाजाच्या विचारपद्धतीला आकार देणारी शक्ती बनली आहे. प्रश्न आता असा नाही की, कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रवेश आहे की नाही? कारण आज स्मार्टफोनपासून शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंत तिचा प्रवेश सर्वत्र आहे. खरा आणि अधिक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही उपलब्ध असलेली बुद्धिमत्ता आपण केवळ वापरत आहोत की तिच्या सहाय्याने मूल्य निर्माण करत आहोत? ती आपल्याला केवळ सोयीस्कर बनवत आहे की अधिक सक्षम, विवेकी आणि स्वावलंबी घडवत आहे? करिअर कट्टाच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिकासाठी हा लेख लिहिताना, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लोकशाहीकरणाविषयीचा हा विचार अधिक अर्थपूर्ण ठरतो आणि त्याबद्दल मनापासून आनंद होतो. याच संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण या संकल्पनेचा अर्थ अधिक खोल होतो. लोकशाहीकरण म्हणजे केवळ तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचणं नव्हे, तर ते समजण्यासारखं, आत्मसात करण्याजोगं आणि सर्जनशील वापरासाठी खुलं करणं. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक आणि सामान्य नागरिक हा केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपभोक्ता न राहता, तिच्या सहाय्याने समस्यांचे उत्तर शोधणारा, नवे मार्ग निर्माण करणारा घटक बनावा.
याच विचारसरणीचं सशक्त प्रतिबिंब आपल्याला भूषण मुथियान यांच्या कार्यात दिसून येतं. त्यांची दृष्टी स्पष्ट आहे कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाची जागा घेण्यासाठी नव्हे, तर माणसाची क्षमता वाढवण्यासाठी असावी. भीती निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाऐवजी मानवकेंद्री तंत्रज्ञान उभारणं, हीच त्यांच्या उद्योजकीय वाटचालीची खरी दिशा आहे. आज आपण अशा टप्प्यावर उभे आहोत जिथे इतिहास वेगाने घडतो आहे. आर्थिक मंदीच्या बातम्या, रोजगारकपात, स्वयंचलन आणि अस्थिर जागतिक परिस्थिती यामुळे आजचा विद्यार्थी केवळ अभ्यासक्रम शिकत नाही; तो स्वतःच्या भविष्याचा अर्थ शोधत आहे. "कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या संपवेल का?" हा प्रश्न वारंवार विचारला जातो. पण हा प्रश्न अपूर्ण आहे. खरा प्रश्न असा आहे माणूस स्वतःला बदलासाठी कितपत तयार करतो आहे? इतिहास साक्षी आहे की औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत तंत्रज्ञानाने नोकऱ्या नाहीशा केल्या नाहीत, तर त्यांचं स्वरूप बदललं. आजही तेच घडत आहे.
भूषण मुथियान यांचा प्रवास या वास्तवाचं जिवंत उदाहरण आहे. त्यांची वाटचाल ही अचानक मिळालेल्या यशाची कथा नाही, तर सातत्यपूर्ण शिक्षण, प्रयोगशीलता आणि अपयशातून उभं राहण्याची गोष्ट आहे. विविध आघाड्यांवर कार्य करताना त्यांनी केवळ तांत्रिक कौशल्य आत्मसात केलं नाही, तर समस्यांकडे पाहण्याची दृष्टी विकसित केली. त्यांच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही नेहमीच मानवी विचारशक्तीचा विस्तार राहिली पर्याय कधीच नव्हे. आजच्या युगात एक कटू पण सत्य विधान स्वीकारावं लागत - कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या घेत नाही; कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा माणूस नोकऱ्या घेतो. त्यामुळे पदवीपेक्षा कौशल्य, पाठांतरापेक्षा चिंतन आणि सुरक्षिततेपेक्षा लवचिकता अधिक महत्त्वाची ठरते. आजचा विद्यार्थी जर केवळ गुणांच्या आधारे स्वतःचं भविष्य ठरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो मागे पडण्याची शक्यता आहे. पण जो विद्यार्थी समस्या ओळखतो, उपाय शोधतो आणि नव्या तंत्रज्ञानाचा अर्थपूर्ण वापर करतो, तो भविष्यातील जगाचा शिल्पकार ठरतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण ही संकल्पना याच ठिकाणी अधिक महत्त्वाची ठरते. जेव्हा ही बुद्धिमत्ता काही मोजक्या तज्ज्ञांपुरती मर्यादित राहते, तेव्हा ती सत्तेचं साधन बनते; पण जेव्हा ती सर्वांसाठी खुली होते, तेव्हा ती संधीचं माध्यम बनते. भूषण मुथियान यांच्या कार्यातून हीच भूमिका अधोरेखित होते विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणं, नवउद्योजकांना सक्षम करणं आणि उद्योगांना भीतीऐवजी स्वीकाराकडे नेणं. आज इतिहासात प्रथमच असं घडतं आहे की एक निर्जीव व्यवस्था जिवंत माणसाच्या विवेकाला आव्हान देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वेगवान आहे, अचूक आहे, पण तिला जाणिव नाही. ती नैतिकतेचा विचार करत नाही, परिणामांची जबाबदारी घेत नाही. म्हणूनच मानवी विवेकाचं महत्त्व अधिक ठळकपणे समोर येतं. बुद्धिमत्ता कृत्रिम असू शकते, पण मूल्य, करुणा आणि दिशा देण्याचं काम माणसालाच करावं लागतं.
करिअर कट्टा मासिकमधील हा लेख म्हणूनच केवळ यशकथेपुरता मर्यादित नाही. तो विद्यार्थ्यांना आरसा दाखवतो, प्रश्न विचारायला भाग पाडतो आणि अस्वस्थ करतो. भविष्यात प्रश्न असे नसतील "तुम्ही कुठून शिक्षण घेतलं ?" तर असे असतील "तुम्ही काय निर्माण करू शकता?" "तुम्ही बदलाशी जुळवून घेऊ शकता का?" आजचा काळ अनिश्चित असला, तरी दिशाहीन नाही. दिशा त्यालाच सापडते, जो बदलाला विरोध न करता त्याला समजून घेतो.
शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे कृत्रिम बुद्धिमत्ता जग बदलू शकते, पण जगाची दिशा ठरवण्याचं सामर्थ्य अजूनही माणसाकडेच आहे. त्या सामर्थ्याला जबाबदारीची जोड देणं, हीच या युगातील खरी गरज आहे. भूषण मुथियान यांची वाटचाल आपल्याला हेच शिकवते की तंत्रज्ञानापासून घाबरण्याऐवजी, त्याला समजून घेऊन मानवतेच्या सेवेत वापरणं - हीच खऱ्या अर्थाने प्रगतीची वाट आहे.