Author
आनंद, उत्साह, ऊर्जा आणि
मा. मिथिला दळवी
भावनिक बुद्धिमत्ता ट्रेनर

करिअर कट्टाच्या या अंकासाठी लिहिताना मला अतिशय आनंद आणि समाधान वाटतं आहे. हा अंक प्रसिद्ध होताना करिअर कट्टा पाचव्या वाढदिवस साजरा करतो आहे. त्यासाठी करिअर कट्टा उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.

हा पाचवा वर्धापन दिन माझ्यासाठी ही खास आहे. पाच पैकी तीन वर्ष मी करिअर कट्टा परिवाराशी जोडलेले आहे. आणि मी जेव्हा "जोडलेले आहे" म्हणते तेव्हा अक्षरशः हजारोच्या संख्येने मी विद्यार्थी, प्राध्यापक कॉलेजेस आणि करिअर कट्टा परिवाराचा अॅक्टिव्ह भाग झाले आहे. आणि ही तीन वर्ष माझ्यासाठी अतिशय समाधानाचा अनुभव देणारी राहिली आहेत.

इमोशनल इंटेलिजन्स (भावनिक बुद्धिमत्ता) हा विषय शिकवायला म्हणून मी करिअर कट्टा सोबत आले. पहिल्याच वर्षी पंधरा हजाराहून जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स अटेंड केला. हे आकडेच माझ्यासाठी "बापरे!" अशी छान अर्थाने बोबडी वळवणारे होते !! गेली पंधरा सोळा वर्षं अगदी शाळकरी मुलं तरुण वर्ग ते पालक प्राध्यापक शिक्षक अशा सगळ्या वयोगटांना हा विषय मी शिकवते आहे, पण एकाच वेळी अशा प्रचंड संख्येने मात्र पहिल्यांदाच शिकवला. त्यामुळे शिकवता शिकवता मी स्वतःच थोडीशी साशंकता, थोडं आश्चर्य, थोडं दडपण आणि खूप मजा गंमत, अतीव समाधान अशा मिश्र भावनांचा अनुभव पहिल्या वर्षी घेतला.

याचा गमतीचा भाग म्हणजे आपण कुठल्या प्रचंड स्तराला मुलांशी जोडले जात आहोत, याची मला स्वतःलाच पहिल्या वर्षी कल्पना नव्हती. इमोशनल इंटेलिजन्समध्ये जागतिक स्तरावर काम करणाऱ्या सिक्स सेकंट्स (6) Seconds www.6seconds.org) या संस्थेची मी सदस्य आहे. दरवर्षी आपण किती लोकांपर्यंत इमोशनल इंटेलिजन्स पोहोचवला याचे आकडे आम्ही तिकडे नोंदवत असतो. पहिल्याच वर्षी मी जो आकडा नोंदवला त्यामुळे जागतिक स्तरावर सुद्धा आपली नोंद घेतली गेली. त्यानंतर करिअर कट्टा, इमोशनल इंटेलिजन्स आणि आमचा एकत्रचा प्रवास हा प्रचंड समाधान देणारा अनुभव झाला आहे. त्यासाठी करिअर कट्टाचे खूप मनापासून आभार.

भारत हा तरुणांचा देश आहे. आपली ४८% लोकसंख्या तिशीच्या आतली आहे. आज अनेक देशांमध्ये तरुण वर्गाचा घटते प्रमाण हे काळजीच कारण झालं आहे या पार्श्वभूमीवर पुढचं जवळजवळ अर्धशतक आपण जगातला तरुण देश असणार आहोत आणि अर्थातच जगाला तरुण मनुष्यबळ पुरवणार आहोत.

आपण जे मनुष्यबळ जगाला पुरवणार आहोत ते अधिकाधिक सक्षम असावं यावर आपला कटाक्ष असणार आहे. आता 'सक्षम असावं' म्हणजे नेमकं कसं असावं? टेक्नॉलॉजीच्या आघाडीवर आपलं नाणं खणखणीत असायला हवंच, याबद्दल दुमत नाहीच. पण सध्याच्या तरुण वर्गाचं चित्र आपल्याला काय दिसतं आहे ?

एकीकडे त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, अनेक संसाधन त्यांच्या हाताशी आहेत, एका "क्लिक" सरशी ते जगाशी जोडले जाऊ शकत आहेत. पण या सगळ्याची एक दुसरी बाजू पण आहे. या एका क्लिकच्या अॅक्सेस ने खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताणही त्यांच्या आयुष्यात आणले आहेत. काही वेळा या ताणासमोर तरुण वर्ग कोलमडताना आपल्याला दिसतो आहे. ही अतिशय काळजीची बाब आहे. त्यामुळे आपल्या तरुणाईला एकूणच सक्षम बनवायचं असेल, तर ताणाला सामोरे जाण्याची क्षमता घडवणं, हे अगदी आवश्यक आहे.

आधुनिक संशोधन आपल्याला काय सांगतं आहे? आपण भावनांचं नियोजन कशाप्रकारे करतो याचा थेट संबंध आयुष्यात आपण किती आनंदी, समाधानी आणि यशस्वी आहोत याच्याशी असतो. त्यामुळे अर्थातच तरुणाईला भावनांचा नियोजन शिकवणं हा त्यांच्या सक्षमीकरणाचा मोठा भाग आहे.

प्रत्येक संस्कृतीने आपापल्या परीने भावनांचे नियोजन कसं करायचं हे असंख्य वर्षांपासुन शिकवलेलं आहेच. पण सध्याच्या काळात आपण सगळेच भावनांच्या प्रचंड कल्लोळाला सामोरं जातो आहोत. त्यामुळे शास्त्र म्हणून त्याचा आणखी अभ्यास होणं, आपण जे शिकतोय, ते आपल्या सद्य परिस्थितीत आजमावून पाहणं फार गरजेचं झालं आहे. म्हणूनच आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही 'इमोशनल इंटेलिजन्स' हा विषय शिकवला जावा, हे सुचवण्यात आलेलं आहे. तो शिकवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. ते अर्थातच करिअर कट्टाच्या माध्यमातून. ही गोष्ट करिअर कट्टा परिवाराचा एक हिस्सा म्हणून, महाराष्ट्र राज्याची रहिवासी म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आणि अर्थातच इमोशनल इंटेलिजन्स विषयाचा अभ्यासक म्हणून माझ्यासाठी खासच आहे. आता आणखी थोडं... सिक्स सेकंदच्या इनस्टाग्राम पेजवर दोन दिवसांपूर्वी ही बातमी झळकली, आणि अगदी गहिवरुन आलं.

आता आणखी गंमत सांगते. इमोशनल इंटेलिजन्स आपल्या अंगी बाणवायला सरावाची गरज आहे. केवळ त्याची थिअरी शिकून ते जमणारं नाही, त्याचा सराव रियाज व्हायला हवा. हीच गोष्ट लक्षात घेऊन करिअर कट्टाने यावर्षी 'इक्यू क्लब' ची संकल्पना लॉन्च केली आहे. ११०० मुलं ५२ आठवड्यासाठी भेटतील इमोशनल इंटेलिजन्सचे वेगवेगळे पैलू आजमावून पाहतील, सराव करतील, असं त्याचं स्वरुप असेल. थोडक्यात हे ५२ आठवड्यांचं प्रॅक्टिकल असेल. त्यातून आपला तरुण वर्ग स्वतःच्या भावना आणखी चांगल्या प्रकारे मॅनेज करायला शिकेल, एकमेकांना भावनांच्या बाबतीत सपोर्ट करू करेल आणि त्यातून साखळी बनत आपण एक इमोशनली इंटेलिजंट समाज घडवून आणण्याच्या दिशेने एक पाऊल टाकू अशी याची कल्पना आहे. यातली सर्वात खास बाब म्हणजे जगाच्या पाठीवरचा एवढा दीर्घ काळासाठी आखलेला आणि एवढ्या मोठ्या संख्येने तरुणवर्ग सहभागी होण्याचा हा पहिला प्रयोग आहे. सिक्स सेकंदने आपल्याला या प्रकल्पासाठी एक आगळावेगळा सपोर्ट ऑफर केला आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला आणि शेवटी सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांच्या इक्यू मोजण्यात येईल आणि प्रकल्पाच्या शेवटी - साधारण वर्षभराच्या सरावानंतरनंतर प्रत्येकाच्या इक्यूमध्ये काय फरक पडला आहे हे आजमावून पाहता येईल. (इक्यू - भावनिक बुद्धयांक. तो मोजता येतो, आणि वयाच्या कोणत्याही टप्प्याला सराव करुन तो वाढवता येतो, असं संशोधन सांगतं.) आज सांगताना खूप अभिमान वाटतो की सिक्स सेकंदसाठी असा प्रकल्प राबवायला आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या करिअर कट्टामार्फत उपलब्ध झालं आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही फार खास गोष्ट आहे.

इतक्या सगळ्या उत्साहवर्धक घटनांबद्दल लिहिते आहे, त्याने छान वाटतं तर आहेच, आणि काम करायला नवी ऊर्जा मिळाली आहे, असं वाटतं आहे. यासोबत एक जबाबदारीची भावना ही वाटते आहे, जगभरातली इमोशनल इण्टेलिजन्सची अभ्यासक मंडळी आपल्याकडे अपेक्षेने, आशेने आणि कुतुहलाने ही पाहत आहेत, याचं थोडंसं दडपणही वाटतं आहे.

या सगळ्या भावना अनुभवायच्या हे या विषयानेच शिकवलं आहे. कोणतीही भावना कितीही नकोशी वाटली तरी दडपायची नाही, झटकायची नाही, कारण भावना हा आपल्या शरीराने घेतलेला खराखुरा अनुभव असतो. म्हणून त्या भावनांना ओळखणं, न्याहाळणं, त्यांच्यासोबत राहणं एक अतिशय वेगळा अनुभव आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या सोबतीने तो अनुभवते आहे.

जी काही भावना असेल ती खरीखुरी अनुभवली, तिला तिचं योग्य ते स्थान दिलं, की भावनांची विचार आणि कृतीशी सांगड घालायला खूप मदत होते. त्यामुळे आज करिअर कट्टाच्या पाचव्या वाढदिवसाच्या दिवशी या सगळ्या छान बातम्यांनी दिलेला आनंद, उत्साह, ऊर्जा तुम्हा सगळ्यांशी शेअर करताना यातून आपल्या स्वतःवरच्या जबाबदारीची जाणीवही होते आहे आणि आनंदाबरोबर ती जबाबदारी ही भावनाही इक्यू क्लबच्या आम्ही सगळ्या शिलेदारांनी धरून ठेवली आहे. त्यातून आपल्या हातून यथायोग्य कृती घडेल अशी आशा करते, संकल्प करते.