महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअरची वाट दाखवण्यासाठी आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारा कट्टा म्हणजे करिअर कट्टा, राज्यातील होतकरू जिद्दी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी जीवनासाठी एक वाटाड्या बनत आहे, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना करिअरचे स्वप्न मनी बाळगून करिअर कट्टाच्या माध्यमातून स्वप्न साकार करण्यासाठी एक सोयीस्कर व सकारात्मक माध्यम म्हणजे करिअर कट्टा आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ बुद्धिमत्ता, पदवी किंवा कौशल्ये असून पुरेसे नसते; त्यांना योग्य दिशा देणारी मनाची मानसिकता अत्यंत महत्त्वाची ठरते. मनाची तयारी असेल, मन एकाच ध्येयावर ठाम असेल तर अपयश न येता यश मिळते, करिअर घडवताना येणाऱ्या अडचणी, अपयश, स्पर्धा आणि बदल स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी हवी असते. योग्य मानसिकता असेल तर सामान्य व्यक्तीदेखील असामान्य यश मिळवू शकते. आपले ध्येय साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहणे खूप महत्त्वाचे आहे, प्रयत्न केल्याने कठीण गोष्ट सोपी होते, पण यासाठी सातत्य फार महत्त्वाचे असते, हे सातत्य रहावे व आपल्याला यश मिळावे यासाठी मनाची मानसिकता राखणे गरजेचे ठरते आणि यासाठी महत्त्वाचे दहा टप्पे (पायऱ्या) सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. या दहा पायऱ्यांविषयी आज आपण सविस्तर माहिती घेऊ.
१) ध्येय स्पष्टता -
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ध्येय स्पष्टता असणे खूप महत्त्वाचे आहे, जर ध्येय निश्चित असेल तर आपल्या पदरी अपयश येत नाही.
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम स्वतःचे ध्येय स्पष्ट असणे गरजेचे आहे. "मला काय व्हायचे आहे?"
आणि "का व्हायचे आहे?" याची उत्तरे स्वतःला देता आली पाहिजेत. ध्येय स्पष्ट असेल तर निर्णय घेणे सोपे जाते, वेळ व ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते आणि गोंधळ कमी होतो आणि खूप कमी वेळात यश मिळते.
२) सकारात्मक विचारसरणी -
कोणत्याही क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे असेल तर त्यासाठी एक महत्वाची पायरी म्हणजे सकारात्मक विचार.
सकारात्मक मानसिकता ही यशाची पहिली पायरी आहे. "माझ्याकडून होईल", "मी शिकू शकतो" व "हे मी करू शकतो" असा विश्वास मनात ठाम असेल तर कठीण परिस्थितीतही माणूस टिकून राहतो. नकारात्मक विचार अपयशाची भीती वाढवतात, तर सकारात्मक विचार आत्मविश्वास वाढवतात. ज्यांच्याकडे आत्मविश्वास असतो ते जिद्दीने पुढे जातात व यशस्वी होतात.
३) अपयश स्वीकारण्याची तयारी -
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळेल असे नाही, काहीजण पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतील तर काहीजणांना खूप प्रयत्न करावे लागतील सतत अपयश येत असेल तर आपल्यातील होणाऱ्या चुका शोधून त्यावर उपचार योजून पुढे वाटचाल करणे महत्त्वाचे ठरते. एकदा आलेल्या अपयशात खचून न जाता त्यातून बाहेर येत पुढे वाटचाल करणे गरजेचे आहे, अपयश स्वीकारणे खूप महत्त्वाचे असते, कारण आलेले अपयश अनुभव देते व यशस्वी होण्यासाठी आपल्याला बळकट बनवते म्हणून अपयश स्विकारता आले पाहिजे.
करिअरच्या प्रवासात अपयश अटळ आहे. पण अपयशाला शेवट न मानता शिकवण मानणे ही परिपक्व मानसिकता आहे. जे अपयशातून शिकतात, तेच पुढे यशस्वी होतात. अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. असं म्हणतात यशस्वी होण्यासाठी यशस्वी व अयशस्वी झालेल्यांचे अनुभव समजून घेतले पाहिजे त्यातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.
४) सातत्य आणि संयम
करिअर एका दिवसात घडत नाही. सातत्याने मेहनत करणे आणि परिणामासाठी संयम बाळगणे ही मानसिक शिस्त आहे. लगेच यश न मिळाल्यास निराश न होता रोज थोडी प्रगती करत राहणे हे यशाचे गमक आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे - 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणी प्रमाणे आपण आपले ध्येय साकार करण्यासाठी दररोज थोडे-थोडे प्रयत्न केले पाहिजे, अचानक आलेल्या अपयशाने न थांबता दररोज प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
५) आत्मविश्वास आणि आत्ममूल्य -
स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे फार महत्त्वाचे आहे. इतरांशी सतत तुलना केल्यास न्यूनगंड निर्माण होतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते; स्वतःच्या गुणांची जाणीव ठेवून त्यावर काम करणे ही सशक्त मानसिकता आहे. आपण कोण आहोत नि आपल्याला काय येते ? याचे उत्तर शोधून आपण पुढे जाणे गरजेचे आहे, आपण आपली क्षमता ओळखून पुढे गेल्यास येणारे अडथळे किरकोळ वाटतात.
६) बदल स्वीकारण्याची तयारी -
बदलत्या काळानुसार आपण बदल स्वीकारत पुढे वाटचाल करणे गरजेचे असते, आजचे करिअर क्षेत्र सतत बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन संधी, नवीन कौशल्ये हे सर्व स्वीकारण्याची मानसिकता असावी लागते. "मी शिकायला तयार आहे", मला हे जाणून घ्यायला आवडेल, मी हे करू शकतो ही वृत्ती करिअरला दीर्घकाळ टिकवते.
७) शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन -
वक्तशीरपणा, संयम नि शिस्त याचे योग्य पालन केल्यास आपले व्यक्तिमत्त्व सकारात्मक व दृढ निश्चयी बनण्यास मदत होते. यशस्वी करिअरसाठी मनाची शिस्त आवश्यक आहे. अभ्यास, सराव, विश्रांती आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. वेळेचे योग्य नियोजन करणारी मानसिकता तणाव कमी करते आणि कार्यक्षमता वाढवते.
८) अंतर्गत प्रेरणा -
फक्त पैसा, पद किंवा प्रतिष्ठा यासाठी नव्हे, तर स्वतःच्या आवडीसाठी, समाधानासाठी काम करण्याची मानसिकता असेल तर करिअर दीर्घकाळ आनंददायी बनते. अंतर्गत प्रेरणा असलेली व्यक्ती अडचणीतही पुढे चालत राहते. आपले कौशल्ये ओळखून पुढे चालत राहणे खूप फायदेशीर ठरते, प्रत्येकाला सर्वच येईल असे नसते, प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळ्या स्वरूपाची असल्याने प्रत्येकजण आपल्या विचारानुसार बदल स्वीकारत असतो, नि यशस्वी होतो त्यामुळे आपल्याला जे परफेक्ट जमते आपल्याला जे आवडते त्यात कार्यरत राहणे फायद्याचे ठरते.
९) योग्य मार्गदर्शन स्वीकारण्याची तयारी
"मला सगळं येतं" ही अहंकाराची मानसिकता प्रगती रोखते. मला कुणाची गरज नाही, मला सर्व गोष्टीचा अनुभव आहे, ही मानसिकता आपल्याला अपयशाच्या खाईत घेऊन जाते त्यामुळे ही विचारसरणी बाजूला सारून; शिक्षक, मार्गदर्शक, अनुभवी व्यक्ती यांचे मार्गदर्शन स्वीकारणे आणि चुका सुधारण्याची तयारी ठेवणे ही प्रगल्भ मानसिकता आहे.
१०) मानसिक आरोग्याची काळजी
या जगात कोणत्याही वस्तू बिघडल्या तर त्यावर दुरुस्ती करण्यासाठी सोय उपलब्ध आहे पण मन बिघडले तर दुरुस्ती करण्याचे माध्यम उपलब्ध नाही, यासाठी मानसिक आरोग्य राखणे गरजेचे आहे. करिअर करताना तणाव, दडपण, भीती येऊ शकते. अशा वेळी स्वतःशी संवाद साधणे, विश्रांती घेणे, मनन, चिंतन करणे, छंद जोपासणे आणि गरज असल्यास मदत घेणे हेही करिअर यशाचेच भाग आहेत.
आपले करिअर योग्य वेळी होण्यास नक्कीच मदत होईल. या दहा पायऱ्या जीवनात आपण तंतोतंत पाळल्यास
करिअर घडवताना बाह्य साधनांपेक्षा मनाची मानसिकता अधिक निर्णायक ठरते. सकारात्मक विचार, सातत्य, आत्मविश्वास, अपयशातून शिकण्याची तयारी आणि बदल स्वीकारण्याची वृत्ती हे घटक असतील तर कोणतेही करिअर यशस्वी होऊ शकते. म्हणूनच "करिअर घडवायचे असेल तर आधी मन घडवा" हे सूत्र कायम लक्षात ठेवावे. मनाची तयारी असेल तर अशक्य गोष्ट शक्य करण्याची क्षमता निर्माण होते त्यामुळे योग्य नियोजन करून आपल्या करिअर कट्टाच्या माध्यमातून आपले करिअर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच घडवणे गरजेचे आहे, यासाठी वरील दहा पायऱ्या अगदी मूलमंत्र म्हणून उपयोगी ठरतील हे मात्र नक्की. सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा !