मै अकेलाही चला था जानिबे मंझिल मगर लोग साथ आते गये, और कारवाँ बनता गया
२५ फेब्रुवारी २०२१ ला मा. यशवंत शितोळे सरांनी सुरु केलेल्या करिअर कट्टा या उपक्रमाने पाच वर्षाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केलाय. व्यवसायाभिमुख, रोजगारक्षम व विकासाच्या वाटेवर चालणारा सक्षम युवक घडवताना शिक्षण व्यवस्थेला साथ देणारा नवतरुण निर्माण करण्यासाठी शिक्षण आणि उद्योग यातील अंतर कमी करण्यासाठी चौकट बाहेरची पण चौकट सांभाळणारी आव्हान पेलणारी जबाबदारी स्वीकारून काम करणारी तरुणाई उभी करणारी करिअर कट्टा नावाची व्यवस्था उपक्रम या देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात २०२१ पासून सातत्याने सुरू आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. २१ व्या शतकात स्वतःच्या पायावर उभा राहणारा, जगाच्या प्रगतीच्या दिशेने स्वतःला त्या प्रवाहात जोडून घेणारा तरुण घडविण्याचे आवाहन स्वीकारणारा करिअर कट्टा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात प्रकाशाची नवी वाट निर्माण करणारा ठरला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यासाठी कौशल्य विकसित करणारे शिक्षण, उद्योजक घडवणारी, मराठी तरुणांची मानसिकता बदलवणारी, नवीन शैक्षणिक धोरणाचे आव्हान पेलण्यास हातभार लावणारी शासन पूरक व्यवस्था ही करिअर कट्टाने स्वीकारली आणि ती स्वीकारताना या सगळ्यांची जबाबदारी विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवणारे, विद्यार्थ्यांचे हित जपणारे आपण सर्व, या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही समाज भावना ठेवून काम करणाऱ्या प्राध्यापक प्राचार्य यांच्याकडे सोपविण्यात आले. खरे म्हणजे या तरुणाईचे भविष्य घडविण्याची संपूर्ण जबाबदारी प्राध्यापकांनी घेतली ती करिअर कट्टाचे समन्वयक म्हणून, तर कोणी जिल्हा समन्वयक, तर कोणी विभागीय समन्वयक म्हणून घेतली. सगळ्यांनी आपल्या कामाव्यतिरिक्त या तरुणाईला घडवण्यासाठी आपला अतिरिक्त वेळ देऊन काय चांगलं करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली आणि करिअर कट्टा या उपक्रमात सहभागी झाले. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक सर्जनशील, आव्हानात्मक, बुद्धीला चालना देणारे उपक्रम महाविद्यालयीन पातळीवर कसे राबविले जावे, यासाठी काय प्रयत्नांची गरज आहे, तसेच व्यक्तिमत्व विकासातून करिअरचा राजमार्ग कसा निवडायचा या अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला. एवढंच नव्हे तर स्वकर्तृत्वाने उद्योग क्षेत्रात भरारी घेणाऱ्या नवनवीन उद्योजकांना आमच्या या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल यावरही विचार मंथन करण्यात आले. खरं म्हणजे कोविड नंतरच्या कालावधीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या हितसंबंधांमध्ये, अचानकपणे एक वेगळे बदल जाणवायला लागले. त्या एक-दोन वर्षातील ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या नियोजनासाठी अत्यंत काळजीपूर्वक झटणारा प्राध्यापक आणि महाविद्यालयाची व्यवस्था एका वेगळ्या साशंक वातावरणात दिसायला लागली. हे चित्र युवकांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून सुखावह नाही उलट गंभीर परिणाम निर्माण करणारे होते; आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी, विद्यार्थ्यांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं करण्यासाठी, महाविद्यालयाला येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी एका समन्वयाचा भाग म्हणून करिअर कट्टा उपक्रमामध्ये काही नाविन्यपूर्ण बदल करून सकारात्मकतेचा विचार पुढे घेवून संबंधित महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व सन्माननीय प्राचार्य यांनी करिअर कट्टाचे स्वागत करत असतांना या मार्फत महाविद्यालय मध्ये होणाऱ्या प्रवेशासाठी याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला.
एक गुरु-शिक्षक म्हणून सामाजिक भान जपतानाच ज्योतिबा आणि सावित्रीबाईना अपेक्षित असलेले शिक्षण आणि शिक्षक याची भूमिका प्रामाणिकपणे बजावणारा शिक्षकच विद्यार्थ्यांचे हित, त्यांचे पुढील करिअर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू शकतो; आणि म्हणून प्रत्येक महाविद्यालयातून करिअर कट्टासाठी काम करणारा समन्वयक निवडला गेला. त्यानंतर जिल्हा पातळीवर काम करणारा जिल्हा समन्वयक आणि विभाग पातळीवर काम करणाऱ्या विभागीय समन्वयक, सहविभागीय समन्वयक आणि विभागीय प्राचार्य प्रवर्तक निवडले गेले. या सगळ्यांच्या माध्यमातून करिअर कट्टाचं काम प्रत्येक जिल्ह्यातून, विभागातून करत असताना महाराष्ट्र स्तरावर त्यांच्या कामाची दखलही स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कृत करून घेतली गेली. महाविद्यालयात प्रवेश घेताच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरचा मार्ग दाखवणारे नव्हे, त्यांना करिअरचा विचार करायला लावणारे प्लॅन ए-बी तयार करण्यासाठी मार्गदर्शन करून, करिअरला निवडण्यासाठी मदत करणारे अनेक व्याख्यानाचे आयोजन करिअर कट्टाच्या माध्यमातून होत असताना माहिती देण्याचं काम या करिअर कट्टाच्या समन्वयकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना केलं आणि म्हणून बारावी झाल्यानंतर प्रवेश घेतल्यानंतरच आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, कुठल्यातरी करिअरच्या राजमार्गावर आपल्याला चालायचं आहे हा विचार घेऊनच करिअर कट्टाचा हा विद्यार्थी प्रवेशित झाला. समन्वयकांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अजून काय आपल्या करिअरसाठी आवश्यक आहे याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून हा करिअर कट्टा तुमचा करिअरचा मार्ग कसा सुकर कसा करू शकतो याची माहिती देत त्याला त्या मार्गावरून चालायलाही शिकवले.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती महाविद्यालयांमध्ये हा करिअर कट्टा चालवला जातो आणि किती महाविद्यालय या पासून वंचित आहेत याची दखल घेत जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी दिलेले सर्व समन्वयक आपापल्या परीने, आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळ देऊन प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोहोचत प्राचार्यांना करिअर कट्टा महत्त्वाचा कसा आहे, तो आमच्या महाराष्ट्रीयन मराठी तरुणांना नव्हे आमच्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील तरुणांना सुद्धा कसा करिअर घडवण्यात मदत करू शकतो हे समजून सांगत करिअर कट्टा महाविद्यालयामध्ये सुरू करावा याबद्दल माहिती देऊ लागले. अनेक जिल्ह्यांमध्ये, महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा हा उपक्रम सुरू झाला. अनेक जिल्हे म्हणून असलेला हा विभाग, विभाग पातळीवर सुद्धा आपल्या विभागामध्ये किती महाविद्यालयांमध्ये, किती जिल्ह्यांमध्ये करिअर कट्टा चालवला जातो? किती जिल्ह्यांपर्यंत आपण या सगळ्या करिअर कट्टाचा, त्यातील होणाऱ्या उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांना देऊ शकतो? याबद्दल आढावा सभांच्या माध्यमातून घेण्यात येतो. महाविद्यालयीन समन्वयक, जिल्हा समन्वयक त्यानंतर विभागीय समन्वयक आणि विभागीय प्राचार्य प्रवर्तक, प्राचार्य प्रवर्तक या सगळ्यांच्या माध्यमातून करिअर कट्टाला एक वेगळी दिशा देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा कसा पोहोचला जाईल आणि त्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याला कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करणारी ही साखळी निर्माण करण्यात आली. आपल्या विभागात, जिल्ह्यामध्ये हा करिअर कट्टा कसा काम करतो, विभागातील जिल्ह्यातील विद्यार्थी याचा किती लाभ घेतात याची संपूर्ण माहिती आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी होणाऱ्या सभांमधून प्रत्येकापर्यंत येऊ लागली. करिअर कट्टाचे काम सुरळीत सुरू झाले. या पाच वर्षांमध्ये करिअर कट्टा एका वेगळ्याच वळणावर येऊन वटवृक्षामध्ये रुपांतरीत झाला. या वटवृक्षाच्या पारंब्यांच्या स्वरुपात काम करणारी, त्या वटवृक्षाला खतपाणी घालणारी ही सगळी मंडळी, ज्योतिबा सावित्रीबाईनी शिक्षणासाठी त्यावेळी जी मेहनत घेतली तेवढी कदाचित घेत नसेल पण फुलं नव्हे तर फुलाची पाकळी होऊन त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या करिअर पर्यंत पोहोचविताना, त्यासाठी प्रयत्न करत असतांना समाधानानी वावरताना दिसून येते. ज्या समाजात अनेक समाजसेवक होवून गेले ज्यांनी शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले त्याच सामाजिक परिवर्तनाची किनार असलेल्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय आणि समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं हीच जाणीव ठेवून आपल्याला नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त काही वेळ देऊन या विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण सर्व मंडळी या विद्यार्थ्यांचं भविष्य ओंजळीत घेऊन त्यांना पुढील मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आज करिअर कट्टाच्या विद्यार्थ्याला कुठल्याही ज्योतिषीकडे जाऊन पुढलं भविष्य काय असेल हे विचारण्याची गरज नाही. तर आम्ही सर्व महाविद्यालयीन समन्वयक, जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक या सगळ्यांनाच त्यांच्या भविष्याची चिंता असल्यामुळे त्याचं पुढचं भविष्य काय असणार किंवा त्यांनी कुठला मार्गाने जावे, त्याने उद्योजक व्हावं की स्पर्धा परीक्षा द्यावी त्याचा प्लॅन ए काय असावा, त्याचा प्लॅन बी काय असावा यावर चर्चा करत त्याचा पुढील करिअरच्या मार्गावर पोहोचवण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आम्हा सगळ्यांकडून होतोय. या सगळ्यांचा आपण सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. खरं म्हणजे पाच वर्षाचा टप्पा पूर्ण करतांना आज हा करिअर कट्टा बहरलेल्या वटवृक्षाप्रमाणे दिसतोय. येणाऱ्या पुढील काळात तो अजून बहरलेला दिसेल अशीच आपण अपेक्षा करूया हाच आशावाद घेऊन या करिअर कट्टातील प्रत्येक तरुण एक यशस्वी व्यक्ती आणि उत्तम माणूस होवून कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवेल असाच संकल्प करूया.
।। लाथ मारुनी आव्हानांना। गंध यशाचा धुंद करावा ।। ।। मिठीत घ्यावी आपली स्वप्ने ।
आयुष्याचा उत्सव व्हावा ।।