Author
करिअर संसद अधिवेशन : युवा वर्गाचा महाकुंभ
मा. प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर
अध्यक्ष, राज्यस्तरीय करिअर संसद समिती, करिअर कट्टा

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मागील तीन वर्षापासून जानेवारी महिन्यामध्ये शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर बारामती येथे करिअर संसदेचे अधिवेशन आयोजित केले जाते. सत्र २०२५- २६ चे करिअर संसद अधिवेशन नुकतेच दिनांक ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान बारामती येथे यशस्वीपणे पार पडले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये ११ विद्यार्थ्यांची निवड करून १५ जुलै, युवा कौशल्य दिनानिमित्त या विद्यार्थ्यांचा करिअर संसद सदस्य म्हणून शपथविधी पार पडतो. वर्षभर सदर विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण, कौशल्य विकास, करिअर बिल्डिंग या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांचे संकल्पनेतून सदर विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन बारामती येथे आयोजित केले जाते. ४०० विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या या अधिवेशनाचा प्रवास अवघ्या तीन वर्षात १००० युवकांच्या सक्रीय सहभागापर्यंत पोहोचला. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध महाविद्यालयातील सुमारे १००० करिअर संसद सदस्य व त्यांचे समवेत १५० पेक्षा अधिक प्राध्यापक ह्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी आपला अमूल्य वेळ दिला. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात आपले करिअर करता यावे याकरिता आयएएस, आयपीएस अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक यांचे मार्गदर्शन लाभले. या क्षेत्रातील भक्कम अनुभव पाठीशी असणारे उच्चपदस्थ अधिकारी मा. तुषाबा शिंदे आय. आर. पी. एस., मा. नामदेव भोसले उपसचिव, मा. प्रफुल्ल पाठक सोलर एनर्जी सोसायटी, मा. राजीव नंदकर अतिरिक्त जिल्हाधिकारी, मा. शेखर गायकवाड उपमहासंचालक यशदा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उद्योग क्षेत्रामध्ये मा. शंकर जाधव सिंघानिया कंपनी, मा. विलास बुरडे बीएसएनएल, मा. भरत गीते सीईओ तोरल इंडिया, मा. गणेश निबे व्यवस्थापकीय संचालक इत्यादी नामवंत उद्योजक विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविलेले मा. प्रदीप लोखंडे, महाराष्ट्र टाइम्स चे संपादक मा. श्रीपाद अपराजित, नामवंत लोखिका मा. दीपा देशमुख, लेखक मा. राजीव तांबे इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण क्षेत्रामध्ये सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे संस्थाचालक मा. राजेंद्र दादा पवार, मा. सुनंदा पवार यांचे मार्गदर्शनाचासुद्धा विद्यार्थ्यांना लाभ मिळला.

विद्यार्थ्यांना या अधिवेशनामध्ये विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींच्या मार्गदर्शनासोबतच नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याच्या दृष्टीने विशेषतः कृषी विकासामधील नवीन तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शिकविले गेले. भारतातील अग्रगण्य अटल इनक्युबेशन सेंटरला भेट देण्याची संधी या अधिवेशनाच्या निमित्ताने विद्यार्थी वर्गाला उपलब्ध झाली. ADT द्वारा संचालित कृषी विकास केंद्रामध्ये AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय विकास केला जाऊ शकतो हा आत्मविश्वास प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यांना आला. विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण, कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानचा वापर इत्यादी क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे वाटचाल करण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शनाची ही एक पर्वणी म्हणावी लागेल. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे अधिवेशन विद्यार्थ्यांच्या जीवनात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावते. या अधिवेशनामध्ये शैक्षणिक, सामाजिक, उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान इत्यादी मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा आधुनिक सावित्री पुरस्काराने गौरव केला गेला. दिनांक ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत येणाऱ्या प्राध्यापकांकरिता विशेष प्रशिक्षण देता यावे या दृष्टिकोनातून प्राध्यापकांकरिता करिअर कट्टाच्या पुढाकाराने गो. से. महाविद्यालय खामगाव, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय बारामती व महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने शॉर्ट टर्म फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापकांना अध्यापन पद्धतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून युवकांना अधिकाधिक यशस्वी युवा म्हणून घडविता यावे याकरिता “अध्ययन, अध्यापन व कृत्रिम बुद्धिमत्ता" ह्या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शहरी, ग्रामीण असे सर्व स्तरातील विद्यार्थी एका ठिकाणी येऊन त्यांना एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करता यावी, उज्वल भविष्याच्या दृष्टीने यशस्वी वाटचाली करिता अनुभव संपन्न व अत्यंत कुशल अशा विविध क्षेत्रातील मार्गदर्शकांचा लाभ या युवा पिढीला व्हावा, याकरिता करिअर कट्टा या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करते. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान होऊ घातलेले अधिवेशन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी झाले. विद्यार्थ्यांची प्रत्येक उपक्रमामधील उपस्थिती व सहभाग व त्यावरील त्याचा तात्काळ प्रतिसाद इत्यादी बाबी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तात्काळ नोंदविली गेली. विद्यार्थी व प्राध्यापकांच्या निवास व्यवस्थेपासून ते बौद्धिक सत्रापर्यंत सर्व नियोजन अती सूक्ष्म स्तरावर करण्यात आले होते. सद्यस्थितीत गोंधळलेला युवा योग्य व नियोजनबद्ध मार्गदर्शनाच्या माध्यमातून यशस्वी व उज्वल भविष्याकरिता निश्चितच वाटचाल करेल अशा पद्धतीचे प्रशिक्षण मिळणारा हा मोठा समुदाय म्हणून याला ज्ञानाचा महाकुंभ म्हटल्यास वाव  ठरणार नाही.