Author
करिअर कट्टा : विद्यार्थी विकासाची यशस्वी पाच वर्षे
शिवानी बलकुंदी
ग्रंथपाल आणि करिअर कट्टा समन्वयक एल. ए. डी. कॉलेज फॉर विमेन, नागपुर

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त वतीने महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टा हा उपक्रम राबविला जातो. "युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी" असे ब्रीद वाक्य असलेले करिअर कट्टा राज्यभरात महाविद्यालयांच्या मदतीने अनेक विद्यार्थी विकासाभिमुख कार्यक्रम वर्षभर राबवित असते. करिअर कट्टाची स्थापना महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांनी २०२१ साली केली. त्यांनी लावलेले हे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.

राज्यभरातील सुमारे ५००० पेक्षा ही जास्त महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टाचे विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी विकासासोबतच विद्यार्थ्याने आर्थिक स्वावलंबी व्हावे, तसेच त्याला रोजगार मिळिवण्यास मदत करणे आणि त्याला स्वयंपूर्ण, होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यावर करिअर कट्टा भर देतो. त्या अनुषंगाने वर्षभर जिल्हा निहाय आणि ऑनलाइन पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यातील पहिले दोन उपक्रम हे वर्षभर म्हणजेच ३६५ दिवस राबविले जातात. आणि म्हणूनच करिअर कट्टाचे नोंदणी शुल्क देखील तीन वर्षांसाठी ३६५ रुपये एवढेच ठेवण्यात आले आहे. असे नाममात्र शुल्क भरून विद्यार्थी तीन वर्षे करिअर कट्टाच्या द्वारे चालविले जाणारे महाराष्ट्र शासन मान्य सर्व अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. या अभ्यासक्रमांमधे तणाव व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, आर्थिक साक्षरता, जर्मन, फ्रेंच, जपानी भाषा, भावनिक बुद्धिमत्ता अशा प्रकारच्या अनेक विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

करिअर कट्टा द्वारे चालविले जाणारे काही प्रमुख उपक्रम

पुढील प्रमाणे आहेत.:

१. आय ए एस आपल्या भेटीला

 २. उद्योजक आपल्या भेटीला

३. कौशल्य विकासात्मक शॉर्ट कोर्सेस

४. आर्थिक साक्षरता कार्यशाळा

५. OJT आणि internship

६. विद्यार्थी संवाद

७. सेंटर ऑफ एक्सलंस

८. राज्यस्तरीय रिल्स मेकिंग स्पर्धा

९. करिअर डायरी

१०. करिअर संसद

११. वृत्त वेध चालू घडामोडी

१२. भारतीय संविधानचे पारायण

१३. पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.

१४. करिअर संसद अधिवेशन

१५. सोलार एनर्जी जागरूकता अभियान.

वरील सर्व उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक काम करीत असतो तसेच महाविद्यालयीन स्तरावर करिअर कट्टाचे उपक्रम राबवित असतो. त्यामुळे करिअर कट्टाचे उपक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जातात.

करिअर कट्टाद्वारे महाविद्यालयीन स्तरावर दोन समन्वयकांची नेमणूक केली जाते. याशिवाय प्रत्येक जिल्हयासाठी जिल्हा समन्वयक, प्राचार्य प्रवर्तक याशिवाय विभागीय समन्वयक, तालुका समन्वयक, अशी विविध पदे करिअर कट्टाने महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राचार्य यांना दिलेली आहेत. त्या पदासाठी जी काही कामे वाटून दिली आहेत त्यानुसार ती व्यक्ती आपली जबाबदारी आणि नेमून दिलेले काम अतिशय मनापासून पूर्ण करते, तसेच सर्वच उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या समित्यांच्या मार्गदर्शन नुसार करिअर कट्टाचे उपक्रम अत्यंत योग्य नियोजनाद्वारे यशस्वीपणे पूर्ण केले जातात.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक मा. श्री. शेलेंद्र देवळणकर यांचे देखील करिअर कट्टास वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त होते असते, आणि त्यानुसारच करिअर कट्टाची वाटचाल सुरू आहे.

आजपर्यंत राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी करिअर कट्टाच्या मदतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी प्राप्त केलेली आहे. त्यामधे पोलिस भरती, MPSC परीक्षा उत्तीर्ण करणे तसेच व्यवसायासाठी देखील करिअर कट्टाद्वारे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते, त्याचा लाभघेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. करिअर कट्टाच्या अशा विविध विद्यार्थीभिमुख उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

नुकतेच करिअर कट्टाद्वारे प्रत्येक महाविद्यालयात विविध क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने EQ क्लब, Business क्लब व Finance क्लब यांचा समावेश आहे. हे क्लब वर्षभर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असतील व महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होईल.

करिअर कट्टा विविध मध्यमांमधून सातत्याने दर्जेदार विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवित असते, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे युवकांसाठी करिअर कट्टा हे मासिक. अतिशय नाममात्र शुल्क असलेले आणि उत्कृष्ट दर्जाची छपाई असलेले असे हे गुणवत्ता पूर्ण मासिक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्यामधील कौशल्ये विकसित करण्यासाठी, या मासिकतील सदरे ही वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त असतात. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, केंद्रातील आणि राज्यातील राजपत्रित अधिकऱ्यांची मुलाखत अशा

विविध माहितीपूर्ण लेखांचे या मध्ये संकलन केलेले असते. ज्यामुळे विद्यार्थी प्रेरित होतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देखील या मासिकाचा विद्यार्थ्यांना खूपच उपयोग होतो. या मासिकाची स्वतंत्र अशी एक संपादन समिती आहे जी वेळोवेळी मासिकाला अधिक दर्जेदार कसे करता येईल यासाठी प्रयत्न करीत असते. प्रत्येक महाविद्यालयीन ग्रंथालयात या मासिकाची प्रत दर्शनीय भागत ठेवल्यास सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे मासिक पोहचू शकते. महाविद्यालयीन विद्यार्थी, हे मासिक स्वतः साठी देखील स्वतंत्रपणे खरेदी करू शकतात. ज्यामुळे त्यांना प्रत्येक महिन्यांला येणारे नवे सदर, नवीन माहिती, मुलाखती वाचायला मिळतील आणि आपल्याला करिअरच्या कोणत्या वाटेवरून जायचे आहे याचा निर्णय घेणे सोपे जाईल.

आज महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्याला करिअर कट्टा चे सदस्य होणे बंधनकारक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना करिअर कट्टा मधे सहभागी करून घेणे, आणि विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांना करिअर कट्टा च्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे हे महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयकाचे काम आहे.

महाविद्यालयीन समन्वयक म्हणून माझाही करिअर कट्टा सोबत हा प्रवास २०२२ पासून सुरू आहे. त्यामुळे करिअर कट्टा चे समन्वयक म्हणून काम करताना प्राध्यापकांसाठी, महाविद्यालयांसाठी देखील करिअर कट्टा अनेक पुरस्कार प्रदान करते. ज्यामुळे प्राध्यापकांना आणखी काम करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळतेच पण विद्यार्थ्यांच्या विकास सोबत च महाविद्यालयातील प्राध्यापकांना देखील राज्य स्तरावर काम करण्याची आणि त्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि त्यायोगे विद्यार्थी हिताचे काम केल्याचे समाधान देखील मिळते.