Author
आयुष्याचा टर्निंग पॉईट : करिअर कट्टा
रामेश्वर परमेश्वर मोरे
नियोजन समिती राज्य समन्वयक

करिअर कट्टाचा पाचवा वर्धापन दिन साजरा करत असताना मनस्वी आनंद होतो आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा..

हा चार वर्षाचा प्रवास आनंदाचा, परिश्रमाचा आणि प्रतिपदेचा चंद्राप्रमाणे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी वाढत जाणार होता. या प्रवासाचा साक्षीदार असण मी माझं भाग्य समजतो.

करिअर कट्टा हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आमच्या सरांनी मला करिअर कट्टा या उपक्रमाबद्दल सांगितलं. मी एक ग्रामीण भागातला सर्वसामान्य विद्यार्थी होतो. ग्रामीण भागात शिक्षण लवकर पोहोचत नाही आणि विद्यार्थी आपल्याला काही येत नाही या न्यूनगंडामध्ये वावरताना दिसतात, यातलाच मी एक होतो. करिअर संसदेची स्थापना माझ्या महाविद्यालयात झाली आणि रोज कॉलेजला येतो म्हणून मला कौशल्य विकास मंत्री या पदाची जबाबदारी दिली. करिअर कट्टा बद्दल जास्त माहिती नव्हती पण सरांनी सांगितला आहे म्हंटल्यावर हे आपण केलं पाहिजे असं वाटू लागलं, करिअर कट्टाच्या रविवारच्या मा. श्री. यशवंत शितोळे सरांचे मार्गदर्शन सुरू झाले आणि हेच मार्गदर्शन माझे आयुष्य बदलवणारे ठरले. जसं दरवर्षी अनेक विद्यार्थी घ्यायचं म्हणून अॅडमिशन घेतात तसं मी पण घेतलं होतं, आयुष्याला दिशा नव्हती, काय करायचं माहित नव्हतं पण शितोळे सरांच्या रविवारच्या मार्गदर्शनाने आयुष्यात आमुलाग्र बदल झाला. डोळ्यासमोर स्वप्न दिसू लागली, आयुष्याला दिशा मिळाली, शिक्षणाला गती मिळाली आणि या सगळ्यातून माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊ लागला.

विद्यार्थी संवादासाठी मा. श्री यशवंत शितोळे सर माझ्या महाविद्यालयात आले आणि त्यांनी सांगितलं रामेश्वर तू खूप पुढे जाशील, यातून एक आत्मविश्वास मिळाला की आपण जरी ग्रामीण भागातले विद्यार्थी असलो तरी खूप काही करू शकतो. मनातला न्यूनगंड निघून गेला. त्यानंतर बारामती येथे करिअर संसदेचे पहिले अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसमोर बोललो. अधिवेशनातून खूप काही शिकलो. करिअर संसदेच्या तीनही अधिवेशनाला मला उपस्थित राहता आलं. करिअर कट्टा मध्ये अविरतपणे काम सुरू होतं याची पावती म्हणून करिअर संसदेचा उत्कृष्ट पदाधिकारी हा राज्यस्तरीय पहिल्या पुरस्काराचा मानकरी मी झालो. त्यानंतर करिअर संसद बीड जिल्हा नियोजन समितीमध्ये माझी निवड झाली, नंतर मी माझा सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान प्रक्रियेतून विभागीय नियोजन समन्वयक म्हणून विजयी झालो आणि आता मा. श्री. यशवंत शितोळे सरांचा मार्गदर्शनातून जिल्हा नियोजन समितीचा राज्य समन्वयक म्हणून काम करणार आहे. मी एका वेगळ्या क्षेत्रात काम करणार होतो परंतु करिअर कट्टा मुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलो, स्वप्न बदलली, आयुष्याची दशा बदलून शिक्षणाची योग्य दिशा मिळाली. करिअर कट्टाने मला एक वेगळी ओळख दिली, आत्मविश्वास दिला, जिद्द दिली, नेतृत्व गुण दिला, संभाषण कौशल्य दिले, इतरांसाठी काहीतरी करण्याची शिकवण दिली. मा. श्री. यशवंत शितोळे सरांमुळे आयुष्यामध्ये अमुलाग्र बदल झाला. आयुष्याच्या वाटेवर प्रवास करत असताना करिअर कट्टाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. माझ्यासारख्या अनेक युवकांच्या आयुष्यात बदल करिअर कट्टामुळे झाला आहे. आज करिअर कट्टाचा पाचवा वर्धापन दिन या निमित्त आपणा सर्वांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.