Author
करिअर कट्टा -माझ्या सर्वांगीण विकासाचा सोबती
कु. पर्जन्या अंजुटगी
सोलापूर विभागीय नियोजन समिती समन्वयक

करिअर कट्टा' या उपक्रमाचा आता ५ वा वर्धापन दिन साजरा होत आहेत, ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या पाच वर्षाच्या प्रवासात करिअर कट्टाने केवळ माहिती देण्याचे काम केले नाही, तर माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचे कार्य केले आहे. अशा या 'करिअर कट्टा' या उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण होत असताना, मागे वळून पाहताना मला माझा स्वतःचाच एक नवा चेहरा दिसतो. महाविद्यालयात पाऊल ठेवल्यापासून ते आज या उपक्रमाची एक जबाबदार सदस्य म्हणून काम करण्यापर्यंतचा माझा हा प्रवास विलक्षण आहे.

करिअर कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून विविध सत्रांमुळे मला केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर प्रशासकीय सेवा, उद्योग क्षेत्र आणि आधुनिक तंत्रज्ञान यांमधील बदलत्या प्रवाहांची माहिती मिळाली. तज्ज्ञ मार्गदर्शकांशी थेट संवाद साधता आल्यामुळे माझ्या मनातील अनेक प्रश्नांना, शंकांना उत्तराची वाट मिळाली. करिअर कट्टाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे एक मोठे नेटवर्क तयार झाले आहे. अनेक ऑनलाईन व ऑफलाइन कार्यक्रमांमध्ये या मोठ्या व्यासपीठावर सूत्रसंचालन करण्याची संधी मला दिली त्यामुळे माझे संवाद कौशल्य अधिक प्रभावी झाल्याचे जाणवते.

माझा आणि करिअर कट्टाचा परिचय महाविद्यालयातील 'करिअर संसद' मुळे झाला. तिथे माझी 'मुख्यमंत्री' म्हणून निवड झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने माझ्या जडणघडणीला सुरुवात झाली. मा. यशवंत शितोळे सरांच्या दर रविवारी होणारी ऑनलाइन बैठक आणि त्यांनी दिलेल्या विविध टास्कमुळे माझ्या सामाजिक व शैक्षणिक जाणिवा प्रगल्भ झाल्या. ग्रॅज्युएशननंतर सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मला मिळाली. ऑनलाईन मिटींगमध्ये 'हॅन्ड रेज' पद्धतीने पारदर्शक मतदान घेऊन सरांनी लोकशाहीचे जे उदाहरण मांडले, त्यातूनच माझी 'सोलापूर विभागीय समन्वयक' म्हणून निवड झाली. यामुळे माझ्यामध्ये सर्वसमावेशक विचार करण्याची वृती आणि नेतृत्व कौशल्य विकसित झाले.

करिअर कट्टाच्या विविध उपक्रमांनी माझ्या कौशल्यांना पैलू पाडलेः

गर्जे मराठी ग्लोबलः या उपक्रमात उद्योजकता विकास या विषयांतर्गत महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थ्यांना परदेशातील मराठी उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली होती. ज्यामध्ये विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्यामध्ये संवाद घडविण्यासाठी मी विद्यार्थी आणि परदेशातील मार्गदर्शक यांच्यात 'सेतू' म्हणून काम केले. यामुळे मला विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन प्रश्न मांडण्याची प्रगल्भता आली.

करिअर संधीचा ऑनलाइन महामेळावा २०२५:

सलग ३० दिवस चालणाऱ्या या उपक्रमामध्ये समन्वयाची जबाबदारी सांभाळल्यामुळे माझे 'Meeting Coordination' आणि 'Public Involvement' कौशल्य कमालीचे सुधारले.

90 Days Activity: मा. शितोळे सरांसोबत Co-host म्हणून काम करताना, सातत्य म्हणजे काय असते, याचा मी अनुभव घेतला. अनेक लेखक /कवी मान्यवरांशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. ज्याद्वारे माझे प्रभावी संवाद कौशल्य विकसित झाले अतिशय सातत्यपूर्णरित्या सलग ९० दिवस हा उपक्रम राबवून आम्ही तो यशस्वीपणे संपन्न केला.

365 days activity daily 5 min. यामध्ये ही माझा सहभाग आहे. ज्यामध्ये रोज एका महत्वपूर्ण अग्रलेखाविषयी सारांश आणि मुद्देसूद फ्लायर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मा. शितोळे सरांनी मला दिली आहे. या जबाबदारीमुळे माझ्या वाचनाला आणि विश्लेषणाला शिस्त लागली.

५२ आठवड्यांची अखंड संवाद शृंखला: करिअर विषयक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधीबाबत डॉ. तुषाबा शिंदे सरांचे मार्गदर्शन या उपक्रमातून मिळते. यामुळे माझ्या सर्वांगीण ज्ञानात सातत्याने वाढ होत आहे आणि या उपक्रमामुळे माझे सूत्रसंचालन कौशल्य विकसित झाले.

मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीमध्ये 'Disaster Relief Fund' च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करताना खारीचा वाटा मी उचलला. या माध्यमातून समाजसेवेसाठी आवश्यक असलेली 'तत्परता' मी शिकले. करिअर कट्टाने केवळ करिअरच नाही, तर माणूस म्हणून समाजाशी कसं जोडून राहावं, हेही शिकवलं.

दिल्ली दौराः जीवनातील एक 'माइलस्टोन' माझ्या या प्रवासातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे 'दिल्ली दौरा'. नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र अंतर्गत आयोजित दिल्ली दौरा यासाठी

महाराष्ट्रातील निवडक विद्यार्थ्यांमध्ये माझी निवड होणे आणि दिल्लीतील मराठी अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता. या दौऱ्यात मा. शितोळे सरांचा सहवास लाभला, त्यांच्या व्यक्तिमत्वातील पैलू जवळून अनुभवता आले. या दौऱ्याने मला खऱ्या अर्थाने 'One Step Up' नेले आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला.

करिअर कट्टासाठी इंटर्नशिप करताना 'मिटिंग मिनिट्स' काढणे, वेळेचे नियोजन आणि मान्यवरांशी संवाद साधणे यांसारख्या कॉर्पोरेट कौशल्यांचा माझ्यात विकास होत आहे.

थोडक्यात सांगायचे तर...

करिअर कट्टाने मला केवळ संधी दिली नाही, तर त्या संधीचे सोने करण्याची ताकद दिली. मा. शितोळे सरांचे मार्गदर्शन आणि या व्यासपीठामुळे मी आज एक आत्मविश्वासू आणि सक्षम युवती म्हणून उभी आहे.

पाचव्या वर्धापन दिनानिमित या उपक्रमाला आणि यामागील सर्व मार्गदर्शक मान्यवरांना माझ्या अनेक शुभेच्छा !