महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या 'करिअर कट्टा' या उपक्रमांतर्गत दिल्ली येथील मराठी अधिकाऱ्यांशी संवाद साधला जातो. 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' हे ब्रीदवाक्य घेऊन घेतलेल्या या मुलाखतीत IP&TAFS अधिकारी तथा UPSC पॅनेल मेंबर मोनाली धकाटे मॅम यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाची आणि जीवनानुभवांची मांदियाळी उलगडली.
मोनाली मॅम या मूळच्या कलाकार आहेत. त्यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला होता; पण बडिलांची इच्छा होती की घरातल्या पहिल्या पिढीत कोणी तरी सरकारी अधिकारी व्हावे. घरात कोणीही अधिकारी नव्हते, म्हणून वडिलांनी त्या जबाबदारीची वीण त्या मुलीच्या खांद्यावर टाकली. मोनाली मॅम या कुटुंबातील पहिल्याच सरकारी अधिकारी ठरल्या. जिद्द, मेहनत आणि देवकृपेने त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्या वेळी त्या एअर इंडियामध्ये नोकरी करीत होत्या. नोकरी सांभाळून अभ्यास आणि पहिल्याच प्रयत्नात यश ही गोष्ट त्यांच्या दृढनिश्चयाची साक्ष देते.
बडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे तीन भावांची जबाबदारी त्यांच्यावर आली. १९९४ साली पहिली सरकारी नोकरी लागली तेव्हा त्यांना फक्त बावीस हजार रुपये पगार मिळायचा. तरीही त्यांनी हार मानली नाही. आज त्यांना प्रशासकीय सेवेत पूर्ण एकतीस वर्षे झाली आहेत. पहिली पोस्टिंग नागपूरला टेलिकॉम विभागात मिळाली. दीड वर्ष त्या पोस्टल व टेलिकॉम खात्यात काम करून ओडिशाला गेल्या. तिथे कटक, उमेश्वर परिसरात १९९९ च्या सुपर सायक्लोनचा भयंकर अनुभव आला. पूर्ण किनारपट्टी उद्धवस्त झाली होती. अनेक कुटुंबे उघडी पडली होती. ग्राऊंड लेव्हलवर जाऊन त्या कुटुंबांना पुन्हा उभे करण्याचे, त्यांना पुन्हा स्थलांतरित करून नवे जीवन देण्याचे काम त्यांनी केले. त्या कामाचा आनंद आजही त्यांच्या शब्दांतून उमलतो.
त्यानंतर साडेतीन वर्षे काश्मीरमध्ये पोस्टिंग, कारगिल युद्ध, लॉकडाउन, दहशतवादी हल्ले, हाय प्रेशर झोन सगळेच अनुभव त्यांनी घेतले. सियाचीन ते लडाख, लेह ते श्रीनगर सगळीकडे फिरल्या. तिथल्या स्थानिकांची अतुलनीय आदरातिथ्य आजही त्यांच्या मनात जिवंत आहे. काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच तिथल्या कठीण परिस्थितीत काम करण्याची त्यांची मानसिक ताकदही दिसली.
छत्तीसगड मध्य प्रदेशात बायफरकेशन झाले तेव्हा त्यांना एक नवीनच आव्हान मिळाले. संपूर्ण छत्तीसगड राज्यासाठी स्वतंत्र कंट्रोलर ऑफिस उभारायचे. रेकॉर्डपासून ते स्टाफपर्यंत सगळे शून्यातून निर्माण केले. त्यानंतर दिल्लीत संचार भवनात ऑडिट, अकाउंट्स, पेन्शन अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये रिजनल डायरेक्टर म्हणून अडीच वर्षे काम केले. तिथेच त्यांनी संस्कृती मंत्रालयाच्या अनेक उपक्रमांना हातभार लावला परंपरागत जेवण, नृत्य, मिशन ऑन लायब्ररीज, हस्तलिखितांचे डिजिटायझेशन असे अनेक राष्ट्रीय प्रकल्प त्यांनी यशस्वी केले.
दिल्ली विद्यापीठात एक वर्ष डेप्युटेशन आणि नंतर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात तीन पदव्या व एक डिप्लोमा - मास्टर्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड पर्सनल पॉलिसी, सोशल व्हेंचर डिप्लोमा आणि सोशल सायन्स फॉर ह्युमॅनिटी अशी शैक्षणिक प्रगती केली.
परत भारतात आल्यावर पुन्हा टेलिकॉम खाते महाराष्ट्र, मुंबई, गोवा, गुजरात, केरळ अशा पाच राज्यांचे चार्ज. त्या काळात BSNL-MTNL च्या हजारो कर्मचाऱ्यांचे गोल्डन हँडशेक, पेन्शनर्स व सीनियर सिटिझन्सचे प्रश्न मार्गी लावले. महाराष्ट्रातील ११ स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती देण्यापासून ते इंडिया पॉइंटपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यापर्यंत सगळी मोठी आव्हाने त्यांनी यशस्वी केली. कोविड काळात थोडा ब्रेक घेऊन पुण्यातून पोस्ट्युरल सायकॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. २०२३ पासून त्या जॉइंट सेक्रेटरी या पदावर दिल्लीत कार्यरत आहेत.
'सगळीच चॅलेंजेस स्वीकारायची असतात, पर्याय नसतो,' असे त्या ठामपणे सांगतात. 'रडण्यापेक्षा त्या चॅलेंजला हसत सामोरे जायचे आणि त्यातून शिकायचे. आयुष्य शिकवते ती शिकवण किताबात मिळत नाही.' कितीही मोठे संकट आले तरी हसतमुखाने स्वीकारण्याची वृत्ती त्यांनी अंगी बाणवली आहे.
UPSC मुलाखतीबद्दल त्या म्हणाल्या, 'पॅनेलमध्ये ६-७ मेंबर्स असतात, त्यात दोन सायकॉलॉजिस्टही असतात. ते फक्त तुमचे ज्ञान नव्हे तर तुमचे आय कॉन्टॅक्ट, बसण्याची पद्धत, ट्विस्टेड प्रश्नांना तुम्ही कसे हाताळता, तुमचे हॉबीज, तुमचे व्यक्तिमत्व, तुम्ही संभाषण कसे तुमच्या बाजूने वळवता हे सगळे बारकाईने तपासले जाते. तुम्हाला कोणता प्रश्न विचारावा हे तुम्हीच ठरवू शकता, फक्त तुम्हाला त्या दिशेने संभाषण वळवता यायला हवे.' SSC परीक्षा UPSC पेक्षा कठीण असल्याचे मत त्यांनी मांडले. कारण UPSC ला लाखो फॉर्म्स येतात, तर SSC ला कोटींच्या संख्येने अर्ज येतात. 'प्रत्येक सर्व्हिस ही चॅलेंज आहे. त्यासाठी मेंटल टफनेस हवी. घरातही चॅलेंजेस येतात. पहिल्याच फटक्यात हार मानली तर काही साध्य होणार नाही. एकदा लढून बघा, डोंगरही सर कराल अशी मनाची जिद्द हवी. कमजोरीवर लक्ष देण्यापेक्षा ताकदीवर भर द्या. चुका व्हायलाच हव्यात, कारण चुका नसतील तर शिकणार कसे? पण त्या चुका सिस्टेमॅटिक अभ्यासाने टाळता येतात,' असे मार्गदर्शन त्यांनी केले. शेवटी त्यांनी सांगितले, 'तुमच्याकडे सगळेच आहे बुद्धी, मेहनत, वेळ, संधी. फक्त एकदा ठामपणे ठरवा आणि करून दाखवा. सिस्टीम कधीही ब्रेक करता येते, फक्त तुम्हाला ती इच्छाशक्ती हवी.'
आज देशात डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, पण २०५० पर्यंत प्रत्येक सहाव्या नागरिकाचे वय ६० असेल, त्यासाठी NIHD अंतर्गत एल्डली केअर, सीनियर सिटिझन्सच्या गरजा यासाठी आतापासून तयारी करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
"Use your own magic तुमची जादू तुम्हीच निर्माण करा,' असे शब्द देऊन मोनाली धकाटे मॅम यांनी मुलाखत संपवली.
हा प्रवास आहे एका साध्या कलाकार मुलीचा जिद्द, मेहनत, हसतमुख स्वभाव आणि राष्ट्रसेवेच्या भावनेने देशाच्या कानाकोपऱ्यात झालेला. आज त्या UPSC पॅनेल मेंबर म्हणून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहेत. खरंच, नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र अशा मराठी मनाचा हा उत्तुंग प्रवास प्रेरणादायी आहे.
शब्दांकन
माधवी रतन बोरसे
कला, वाणिज्य व बीसीए महिला महाविद्यालय, धुळे