'सेवेची शपथ, संधींचा महामार्ग'
भारतीय सैन्य दलातील अधिकारी मा. हर्षवर्धन सरांचा विद्यार्थ्यांशी संवाद - एक प्रेरणादायी मार्गदर्शन
भारतीय सैन्याचा उल्लेख जरी झाला, तरी मनात अभिमानाची लहर उमटते. वर्दीतील शिस्त, निःस्वार्थ सेवा, राष्ट्ररक्षणासाठी समर्पित आयुष्य हे सर्व ऐकताना हृदय वेगळेच धडधडू लागते. अशा या गौरवशाली विश्वाचा दरवाजा विद्यार्थ्यांसाठी उघडून त्यातील करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मा. हर्षवर्धन सर यांच्याकडून घेण्याचे भाग्य विद्यार्थ्यांना मिळाले. 'नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत करिअर कट्ठा या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आणि त्यातून मिळालेले हे मार्गदर्शन कायमच महाराष्ट्रातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त पथदर्शक ठरेल.
Join Indian Army - A Way of Life' ही PPT सादर करत भारतीय सैन्याच्या जगाचे एक अद्भुत दृश्य हर्षवर्धन सरांनी उलगडून दाखवले. त्यांच्या शांत, संयत आणि कटीबद्ध आवाजातून बोलताना जाणवत होते की, हे शब्द फक्त माहिती नाहीत; तर अनुभवातून आलेले सत्य आहे.
मार्गदर्शनाची सुरुवात करताना सरांनी सैन्याचा 'राष्ट्रीय ढाल' म्हणून उल्लेख केला.
त्यांनी सांगितले की, 'सैन्याचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे राष्ट्राची सार्वभौमता, सीमा आणि हितसंबंध जपणे. पण तेवढ्यावरच ते थांबत नाही. देशातील अंतर्गत सुरक्षेपासून नैसर्गिक आपत्तींतील मदतीपर्यंत 'सैन्य' हे राष्ट्राच्या प्रत्येक श्वासात आहे.' त्यांच्या नजरेतील झळाळी विद्यार्थ्यांना जाणवत होती. या कार्यामध्ये 'धैर्य', 'कर्तव्यभावना', 'अनुशासन' आणि 'निःस्वार्थ सेवेची भावना' हे गुण किती महत्त्वाचे आहेत हे ते शब्दांपेक्षा नजरेतूनच स्पष्ट करत होते.
भारतीय सैन्याबद्दल अनेकांच्या मनात असलेला गैरसमज सरांनी अतिशय सुंदरपणे दूर केला.
'सैन्यात येणे म्हणजे फक्त बंदूक घेऊन सीमेवर उभे राहणे नव्हे. तर सैन्य हे एक विशाल करिअर विश्व आहे.' त्यांनी सोबतच दाखवत असलेल्या PPT मधील प्रत्येक शाखेचे विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत विवेचन केले-
Combat Arms जिथे धैर्य हे श्वासासारखे असते; Mechanised Infantry; Combat Support Arms
जिथे रणनीतीला विज्ञानाची साथ असते, Artillery Engineers Logistics & Support Arms जिथे व्यवस्थापन, तांत्रिक कौशल्य आणि सेवा भावना एकत्र येतात, Army Service Corps, Corps of EME, Army Ordnance Corps, Army Medical Corps इत्यादी. यांद्वारे विद्याथ्यांना समजले की सैन्यात अभियंते, डॉक्टर, तंत्रज्ञ, व्यवस्थापक, कम्युनिकेशन तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, संशोधक अशा असंख्य क्षेत्रांमध्ये चमकण्याची संधी आहे.
सरांनी सांगितलेली पुढील गोष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या मनाला भिडली ती अशी की, 'आर्मीचा गणवेश हा फक्त नोकरीची ओळख नाही, तो आयुष्यभराची मूल्यांची शिदोरी आहे.' हा एक साहस आणि अनुभवांचे अद्भुत विश्व आहे. हा देशातील दुर्गम भागापासून परदेशातील शांतता मोहिमांपर्यंत प्रवास आहे. हा अडथळ्यांवर मात करत मिळणारी मानसिक ताकद आहे आणि अवघड गोष्टी रोजच्या रोज करून दाखवण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे, व्यावसायिक प्रगती, शिकत राहण्याचा अखंड प्रवास आहे. कुटुंबियांसाठी सुरक्षित, सन्मानाची आणि सुविधा-संपन्न जीवनशैली देण्याचा मार्ग आहे. सरांनी कॅन्टोन्मेंटमधील सुरक्षित जीवन, खेळगृह, शाळा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छ परिसर याचे वर्णन ज्या आत्मविश्वासाने केले, त्यातून विद्यार्थ्यांना समजले की सैन्यातील जीवन हे सन्मानपूर्ण, सुरक्षित आणि समाधानी आहे.
सरांनी PPT मधील पगार आणि भत्त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश टाकला. जसे, प्रशिक्षणादरम्यान मिळणारे सहाय्य; नियुक्तीनंतरचा उत्कृष्ट पॅकेज; मोफत दर्जेदार वैद्यकीय सेवा; रेशन, LTC, रेल्वे व हवाई सवलती; ६०+२० दिवसांची सुट्टी; फॅमिली वेल्फेअर स्कीम्स; मुलांच्या शिक्षणातील सवलती; सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या विविध प्रोजेक्ट अंतर्गत रिसेटलमेंट कोर्सेस, पेन्शन, विमा, ग्रॅच्युइटी इत्यादी या सर्व गोष्टींमुळे 'जीवनातील स्थैर्य' हे सैन्यातील मोठे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सरांचे एक वाक्य विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर कोरले गेले ते असे की, 'कॉर्पोरेटमध्ये standard of living मिळतो; पण आर्मीमध्ये quality of life मिळते. सैन्यातील जीवनातील बंधन, सहकार्य, सामूहिक भावना, वेळेची किंमत, आत्मविश्वास आणि कुटुंबासोबतचा गुणवत्तापूर्ण वेळ हे आर्मीला इतर क्षेत्रांपासून वेगळं बनवतात.'
सरांनी PPT मधील Entry Schemes विशेष उत्साहाने समजावून सांगितल्या. त्या पुढील प्रमाणे १०+२ Entry; NDA; TES; Graduate Entry (Permanent & Short Service Commission); CDS; OTA; Women Special Entry; NCC; JAG; Technical Entry त्यांच्या या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये 'भारतीय सैन्यात या प्रकारे मी ही सामील होऊ शकतो/शकते' ही भावना जागृत झाली.
यासाठी आवश्यक परीक्षांविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. SSB व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगीण परीक्षण
Intelligence Test, PPDT, Group Tasks, Psychology Tests, Interview... SSB हा केवळ परीक्षा नाही, तर व्यक्तिमत्त्वाचा उत्सव आहे,' असे सांगून सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
हर्षवर्धन सरांनी मार्गदर्शनाचा शेवट अत्यंत प्रेरणादायी शब्दांत केला की, 'आर्मी तुम्हाला गणवेश देत नाही, ती तुम्हाला धैर्य देते; निर्णयक्षमतेचं तेज देते; नेतृत्वाचा कणा देते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे देशासाठी जगण्याची जाणीव देते.' भारतीय सैन्य म्हणजे देशसेवेची संधी, शिस्तीचे शास्त्र, कुटुंबाची सुरक्षितता आणि साहसाने भरलेले सुंदर आयुष्य असतं असे त्यांनी सांगितले.
मा. हर्षवर्धन सरांचा संवाद हा केवळ माहितीपर नव्हता. तो प्रेरणेचा झरा, राष्ट्रसेवेची ओढ निर्माण करणारा क्षण होता. एकंदरीतच, करिअरच्या असंख्य शक्यतांचा खुला पट आणि विद्याथ्यांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करणारा अनुभव होता.
'जिथे गणवेश असतो, तिथे अभिमान आपोआप येतो. 'हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात घर करून गेला. करिअर कट्टा या माध्यमातून भारतीय सैन्य दलातील अधिकारी मा. हर्षवर्धन सर यांचे मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार !
जय हिंद !
शब्दांकन
मिहिर गजानन भेदे
नूतन आदर्श कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय उमरेड, नागपूर