Author
संवाद शृंखला मुलाखत क्र. १३
मा. सुवर्णा तुषाबा ओगले-शिंदे (IAS)
उप-संचालक, दिल्ली जल बोर्ड

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या 'करिअर कट्टा' उपक्रमाच्या 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या दिल्ली दौऱ्यादरम्यान आम्हाला एक अजरामर भेट मिळाली. ती म्हणजे दिल्ली जल बोर्डाच्या उप-संचालक तथा माजी उपविभागीय दंडाधिकारी, माजी नगरपरिषद मुख्याधिकारी आय.ए.एस. मा. सुवर्णा तुषाबा ओगले-शिंदे मॅडम यांची प्रेरणादायी मुलाखत.

दिल्लीत त्यांना भेटताच त्यांनी आमच्यासमोर जे पहिले
वाक्य उच्चारले, ते आजही डोळ्यासमोर तरळते 'स्वप्न पाहणं खूप महत्त्वाचं आहे, पण ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द आणि शिस्त त्याहून कितीतरी जास्त महत्त्वाची असते. खरंच, ही जिद्द आणि शिस्त यांचं जिवंत प्रतीक म्हणजे मॅडम स्वतः ! मॅडम यांचा प्रवास अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव-मनोरी या छोट्याशा खेड्यातून सुरू होतो. त्या साध्या प्राथमिक शाळेच्या फरशीवर बसून शिकल्या, चार दिवस झाडाखाली वर्ग घेतला, शनिवारीही सुटी नव्हती. पण त्या परिस्थितीने त्यांना खचवले नाही, उलट तीच परिस्थिती त्यांच्या जिद्दीला खतपाणी घालणारी ठरली. बालपणापासून त्यांचं नातं फक्त पुस्तकांशी, चिकाटीशी आणि प्रामाणिक अभ्यासाशी होतं. त्याच बालपणी त्यांनी शिकलेला पहिलं धडा 'अडचणी परिस्थिती निर्माण करतात, पण त्यातून उभं राहण्याची ताकद आपण स्वतःच तयार करतो.'
पुण्यातील गरवारे कॉलेजमध्ये बारावीला प्रवेश मिळाला, पण इंग्रजी दुबळे असल्याने पहिल्याच वर्षी अपयशाचा मोठा धक्का बसला. सामान्य मुलगी खचून गेली असती, पण सुवर्णा मॅडम यांनी त्या धक्क्‌याला आयुष्याची कलाटणी बनवली. एक संपूर्ण वर्ष त्यांनी इंग्रजीवर, अभ्यासपद्धतीवर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतः वरील विश्वासावर प्रचंड मेहनत घेतली. आणि तिथून खरा प्रवास सुरू झाला. त्या म्हणतात, 'एक अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, ते पुढच्या यशाचं बीज असतं.'
वडील डॉक्टर असल्याने घरच्यांची इच्छा होती की त्या डॉक्टर व्हाव्यात. पण त्यांच्या मनात देशसेवेची धगधगती ज्वाला होती. त्यांनी यूपीएससीचा मार्ग निवडला. पहिला प्रयत्न अपयशी, दुसऱ्या प्रयत्नात अंतिम निवड येण्याएवढे गुण पडले नाहीत, मध्यंतरी त्यांनी एम.बी.ए. पूर्ण केले. तिसऱ्या प्रयत्नात सर्वांना वाटलं की आय. पी. एस. होईल, पण नियतीने त्यांना दुसरीच पोस्ट दिली. पण मॅडम हसत म्हणतात, 'मला जी पोस्ट मिळाली, तीच माझ्या आयुष्याला सर्वात सुंदर वळण देणारी ठरली.'
पहिली पोस्टिंग लागली पाणीटंचाईग्रस्त भागात. तिथे लोकांना बावीस दिवसांनी पाणी मिळायचं. पुण्यातून आलेल्या मॅडमना हा धक्का असह्य झाला. त्यांनी ठरवलं की आता पाण्याची समस्या सोडवायचीच. नंतर वडगाव मावळ येथे उपविभागीय दंडाधिकारी असताना कोरोनाच्या काळात सतत अडीच महिने कुटुंबापासून दूर राहून संपूर्ण तालुका सांभाळला. त्यांच्या नेतृत्वामुळे तालुका संकटातून सुखरूप बाहेर पडला आणि त्यांना 'मुख्यमंत्री दलित मित्र पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. गावागावात रस्त्याच्या दिवे, स्वच्छतागृहं, महिलांसाठी खास सुविधा, पाणीपुरवठा योजना असे अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वी करून दाखवले. लोक त्यांना प्रेमाने म्हणू लागले, 'मॅडमकडे गेलो की समस्या संपते.'

सध्या दिल्ली जल बोर्डात उप संचालक म्हणून त्या दिल्लीतील पाणीपुरवठा, सीवरेज व्यवस्थापन, उपचार प्रकल्प, टैंकर देखरेख, कर्मचारी व्यवस्थापन आणि केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन या प्रचंड जबाबदाऱ्या सांभाळतात. दिल्लीत काम करायचं तर शंभर टक्के प्रामाणिक, नियमबद्ध आणि सतत सजग राहावं लागतं, असं त्या ठामपणे सांगतात.
मॅडम यांचं टाईम मॅनेजमेंट आणि शिस्त पाहून थक्क व्हायला होतं. त्यांची सुवर्णसूत्रे अशीः पुढच्या दिवसाचं नियोजन आदल्या रात्रीच करावं, सकाळी चार वाजता उठावं, व्यायाम आणि अभ्यास यांचा समतोल सांभाळावा, मोबाइलपासून अंतर ठेवावं, पाठांतर आणि मूलभूत समज यांचा मेळ साधावा, अभ्यास डायरी ठेवावी. त्यांचं जीवनवाक्य आहे 'Discpiline is the best gift you can give to your future.'
मुली, महिला आणि तरुणांसाठी त्यांचा खास संदेश आहे 'तुम्ही कोणत्या गावातले आहात, कोणती भाषा बोलता, तुमचं घर किती साधं आहे, हे काहीही महत्त्वाचं नाही. तुमची जिद्द, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं भविष्य घडवणार आहेत. आज तुम्ही जे शिकता, ते उद्या तुमची ओळख बनेल.'
शेवटी मॅडम यांचा संपूर्ण प्रवास एकच गोष्ट सांगतो साधेपणा हा अडथळा नव्हे, अपयश हे शेवट नव्हे, शिस्त हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे आणि काम हेच खरं अधिकारीपदाचं भूषण आहे. त्यांचा शेवटचा संदेश आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय आहे- 'तुमचं स्वप्न कुणापेक्षाही मोठं असू दे, पण ते पूर्ण करण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमचीच आहे!'
या प्रेरणादायी भेटीची आणि दिल्ली दौऱ्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि विशेषतः मा. श्री. यशवंत शितोळे सर यांची मनापासून आभारी आहे. अमरावती जिल्ह्यातून मला ही संधी मिळाली, याचा खूप अभिमान आहे.

 

शब्दांकन
सानिया सादिक शेख
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे, अमरावती