'तुम्ही जिथे आहात, तिथून पुढे जायचं असेल तर फक्त एकच गोष्ट हवी स्वप्न आणि त्याला पूर्ण करण्याचं धैर्य!' या शब्दांनी कर्नल कौस्तुभ जाधव सरांनी करिअर कट्टा उपक्रमाच्या दिल्ली येथील भव्य समारोप कार्यक्रमात उपस्थित तरुण-तरुणींच्या मनात देशसेवेची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचं संपूर्ण भाषण हे फक्त डिफेन्स सेवेची माहिती नव्हती ते तर जीवन, शिस्त, स्वप्न, नारीशक्ती आणि संतुलन यांचा एक अनुभवात्मक महाकाव्य होतं.
कर्नल सरांनी अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत सांगितलं की, 'डिफेन्स ही नोकरी नाही, पदवी नाही, पगाराची हमी नाही - डिफेन्स हा एक जीबनमार्ग आहे. तुम्ही एकदा यात आलात की तुमचं आयुष्य फक्त तुमचं राहत नाही; ते देशाचं होऊन जातं.' लहानपणापासून सैनिक शाळेत शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या मनात देशसेवेची बीजं अगदी लवकर रुजली होती. UPSC ची NDA परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा प्रशिक्षणासाठी घर सोडत होते, तेव्हा त्यांनी आईला मजेत सांगितलं, 'आई, जर फार कठीण बाटलं तर परत येईन.'
आईचं उत्तर अवीट होते 'हो बाळ, परत ये पण घरी येऊ नकोस!' हा एकच वाक्य त्यांना आयुष्यभराची दिशा आणि प्रचंड धैर्य देणारा ठरला. कर्नल सर हसत-हसत म्हणाले, 'हे फक्त नारीशक्तीच करू शकते. तीच खरी शक्ती आहे जी मुलाला घर सोडायला आणि देशासाठी जगायला शिकवते.' डिफेन्समधील संधींचं वर्णन करताना सरांचे डोळे चमकले. ते म्हणाले, 'तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे? डिफेन्समध्ये संधी आहे. इंजिनिअर व्हायचं आहे? संधी आहे, पायलट? संधी आहे. वकील, शिक्षक, शास्त्रज्ञ, खेळाडू ज्या क्षेत्राचं नाव तुम्ही घ्याल, त्या क्षेत्रात डिफेन्समध्ये जागा आहे. डिफेन्स हा एक संपूर्ण विश्व आहे. इथे फक्त सीमेवर लढायचं नसतं; इथे देश घडवायचा असतो.'
'जेव्हा आम्ही लढत नाही, तेव्हा आम्ही लढाईची तयारी करत असतो,' असं सांगताना त्यांनी सैन्याच्या प्रत्येक क्षणाची सज्जता कशी असते हे पटवून दिलं. सीमेवर असो की मुख्यालयात, प्रत्येक जवान, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक विभाग सतत अबाधित तयारीत असतो. 'तुमची बंदूक स्वच्छ आहे का? तुमचं मन स्वच्छ आहे का? तुमचं ध्येय स्वच्छ आहे का? हे तिन्ही दररोज तपासले जातात,' असे ते म्हणाले.
SSB (Service Selection Board) बद्दल बोलताना त्यांनी वास्तव सांगितलं 'दहा हजार उमेदवारांतून फक्त पाच जण निवडले जातात. म्हणजे ०.०५ टक्के ! SSB कठीण आहे कारण तिथे फक्त मार्क्स नाहीत, तिथे Officer Like Qualities (OLQ) पाहिल्या जातात.'
ते पुढे म्हणाले, 'डिफेन्स तुम्हाला तीन गोष्टी शिकवतं -
Head (डोके) - शिक्षण, विचारक्षमता, निर्णयक्षमता
Heart (मन) - संवेदनशीलता, मूल्यं, भावनिक परिपक्वता
Hand (हात) - शारीरिक कष्ट, कृती, कर्तव्यनिष्ठा
या तिन्हींचा समतोल जर तुम्ही साधला, तर जीवनात काहीही अशक्य नाही.'
स्वप्नांबद्दल बोलताना सरांचा आवाज आणखी खोल झाला 'स्वप्नं मूर्ख असू शकतात, खूप मोठी असू शकतात, लोक हसतीलही, पण स्वप्नं असलीच पाहिजेत. स्वप्नं नसतील तर काहीही साध्य होत नाही आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागतं ते धैर्य. धैर्य आईकडून मिळालं की मग कसल्याही SSB ला, कसल्याही लढाईला सामोरं जाता येतं.'
शेवटी त्यांनी आपल्या खास विनोदी शैलीत सभागृहाला हसवत हसवत गंभीर संदेश दिला 'आम्ही इतकी वर्षं गोळीबाराच्या, तोफांच्या आवाजात राहिलोय की तो आवाज आम्हाला सुरक्षित वाटतो. दिल्लीत आल्यावर इथली शांतता पाहून उलट भीती वाटते! कारण आम्हाला माहितीये, खरी शांतता ही तेव्हाच असते जेव्हा सीमेवर कोणी तरी जागत असतं.'
त्यांचं संपूर्ण भाषण हे शिस्त, धैर्य, स्वप्न, संतुलन, मातृशक्ती आणि देशप्रेम यांचा एक अप्रतिम संगम होतं. प्रत्येक वाक्य डोळसपणे खोलवर रुजत होतं. ते निघताना उपस्थित प्रत्येक तरुण-तरुणीच्या मनात एकच संदेश ठेवून गेले -
'तुमचं स्वप्न काहीही असो डॉक्टर, इंजिनिअर, कलाकार, उद्योजक की सैनिक ते मनापासून बघा, धैर्याने पाळा आणि प्रामाणिकपणे जपा. कारण तुमचं स्वप्न फक्त तुमचं नसतं, ते देशाचंही असतं!'
करिअर कट्टा उपक्रमाच्या या समारोपाला कर्नल कौस्तुभ जाधव सरांसारख प्रेरणास्रोत लाभलं, याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आणि संयोजकांचे मनापासून आभार !
शब्दांकन
धनश्री राजेश मिश्रा
जी. एस. खामगाव कॉलेज, बुलढाणा