Author
संवाद शृंखला मुलाखत क्र. १७
डॉ. प्रियांका मनोज जावळे
Legal Officer, (Ministry of External Affairs) Legal & Treaty Division

'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या दिल्ली शैक्षणिक दौऱ्यात मला ज्या व्यक्तीची भेट झाली आणि ज्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली, त्या व्यक्तीचं नाव ऐकताच मनात एक वेगळीच आदरयुक्त उत्सुकता निर्माण झाली होती. त्या होत्या भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात (Ministry of External Affairs) Legal & Treaty Division मध्ये Legal Officer म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. प्रियांका मनोज जावळे मॅडम. आंतरराष्ट्रीय कायदा, अणुऊर्जा कायदा (Nuclear Energy Law), अंतराळ धोरण व कायदा (Space Law & Policy) अशा जगातील अत्यंत दुर्मीळ आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या या युवा महिला अधिकाऱ्यांचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळाली, ही गोष्ट माझ्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरली.
दिल्लीत त्यांना भेटल्याबरोबर त्यांच्या साध्या पण आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाने मन जिंकून घेतलं. बोलताना त्यांचा आवाज शांत, स्पष्ट आणि ठाम होता. त्यांनी मुलाखत सुरू करताना सांगितलं की त्यांचं सध्याचं पद फक्त एक नोकरी नाही, तर देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण करणारं एक महत्त्वाचं किल्ला आहे. भारताने जगातील १९० हून अधिक देशांबरोबर केलेले हजारो करार, सामंजस्य करार, संकेत आणि आंतरराष्ट्रीय संधी यांचं कायदेशीर विश्लेषण, अंमलबजावणी आणि भारताच्या हितांचं रक्षण करणं हे त्यांचं दैनंदिन काम आहे. विशेष म्हणजे अणुऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रातील कायद्यांवर त्यांनी Ph.D. तर अंतराळात वापरल्या जाणाऱ्या अणुतंत्रज्ञानाच्या कायदेशीर, पर्यावरणीय व सुरक्षाविषयक पैलूवर Post-Doctoral संशोधन पूर्ण केलं आहे. आज जगात या दोन्ही क्षेत्रांचं एवढं सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तींची संख्या मोजकीच आहे.
मॅडम म्हणाल्या, 'आंतरराष्ट्रीय कायदा हा फक्त कागदावरचा विषय नाही. तो देशाच्या सुरक्षेशी, ऊर्जेशी, अंतराळातील वर्चस्वाशी आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेशी जोडलेला आहे. एका चुकीच्या कायदेशीर सल्ल्यामुळे संपूर्ण देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती दर क्षणाला सजग, अपडेट आणि १०० टक्के अचूक असली पाहिजे.'
त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की लहानपणापासूनच त्यांना दोन गोष्टी फार आवडायच्या विज्ञान आणि कायदा. विज्ञान प्रश्न निर्माण करतं आणि कायदा त्या प्रश्नांची उत्तरे देतो. त्यामुळेच त्यांनी LL.B., LL.M. नंतर थेट Nuclear Law मध्ये Ph.D. आणि Space Law मध्ये Post-Doctorate केलं. अंतराळात उपग्रह, रॉकेट किंवा अंतराळ स्थानकांसाठी वापरल्या जाणाऱ्या अणुभद्या, त्यांचे सुरक्षाविषयक धोरण, पर्यावरणावर होणारे परिणाम, आंतरराष्ट्रीय करारांतील जबाबदाऱ्या या सगळ्यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. आज भारत इस्रोद्वारे जगातील सर्वांत यशस्वी अंतराळ कार्यक्रम चालवतो, पण त्यामागे कायदेशीर कवचही तितकंच मजबूत असलं पाहिजे, हे मॅडमनी अधोरेखित केलं.
काम करताना येणाऱ्या आव्हानांबद्दल त्या म्हणाल्या, 'आंतरराष्ट्रीय धोरणे आणि करार हे कधीच स्थिर नसतात. दररोज नवीन संकटे, नवीन तंत्रज्ञान, नवीन अडचणी निर्माण होतात. उदाहरणार्थ, अंतराळात खाजगी कंपन्या आता स्वतःचे उपग्रह सोडत आहेत, त्यामुळे Space Debris चा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा वेळी नवीन कायदे, नवीन करार आणि नवीन धोरणे तयार करावी लागतात. हे सगळं करताना भारताच्या हितांचं रक्षण करणं हे आमचं सर्वोच्च कर्तव्य असतं.'
विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी फक्त तीन शब्दांवर भर दिला Curiosity, Discpiline आणि Consistency. 'तुमच्यात जर खरं कुतूहल असेल, जर तुम्ही शिस्तबद्ध असाल आणि सातत्याने मेहनत करत राहिलात, तर जगातील कोणतेही क्षेत्र तुमच्यासाठी खुले आहे. मी स्वतः एका साध्या कुटुंबातून आले, पण मला माझ्या स्वप्नांची तीव्रता माहिती होती. म्हणून मी कधीही थांबले नाही. तुम्हीही मोठी स्वप्ने बाळगा, पण त्यासाठी दररोज छोटी पावले टाका. शिकण्याची वृत्ती कधीही सोडू नका.'
ही मुलाखत माझ्यासाठी केवळ एका अधिकाऱ्याशी संवाद नव्हता, तर आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या जगात डोकावण्याची खिडकी होती. मला समजलं की आजच्या काळात देशाची सीमा फक्त जमिनीपुरती मर्यादित नाही; ती अंतराळात, समुद्रात, अणुऊर्जा प्रकल्पांत आणि आंतरराष्ट्रीय करारांतही आहे. त्या सर्व सीमांचे रक्षण करणाऱ्या कायदेशीर योद्ध्यांमध्ये डॉ. प्रियांका जावळे मॅडम यांसारख्या महिला अधिकारी अग्रभागी आहेत.
त्यांच्या शब्दांतून, नम्रतेतून आणि डोळ्यांतील चैतन्यातून एकच संदेश स्पष्टपणे येत होता भारताच्या युवक-युवतींनी जर खऱ्या अर्थाने जिज्ञासू, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण राहिले तर जगातील कोणतेही क्षेत्र त्यांच्यासाठी खुले आहे. डॉ. प्रियांका जावळे मॅडम यांचा हा प्रेरणादायी प्रवास आणि मार्गदर्शन माझ्या करिअरला निश्चितच नवी दिशा देईल. त्यांना भेटण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची ही संधी मिळाल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि विशेषतः मा. श्री. यशवंत शितोळे सर यांची मनापासून आभारी आहे.

 

शब्दांकन
साक्षी प्रकाश शिदुक
पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव, जि. सिंधुदुर्ग