Author
संवाद शृंखला मुलाखत क्र. १ - नवऊर्जेचा प्रवास : विचार, दिशा आणि प्रेरणा
मा. श्री. प्रफुल्ल पाठक
अध्यक्ष सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया (SESI)

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व करिअर कट्टाच्या माध्यमातून "नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र" या संकल्पनेतून सुरु असणारा दिल्ली दौरा आणि त्यातील ही मुलाखत.
भारतामध्ये सौर ऊर्जा क्रांतीचा पाया मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलणारे नाव म्हणजेच मा. श्री. प्रफुल्ल पाठक सर - सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया (SESI) चे अध्यक्ष म्हणून २०१९ पासून त्यांनी देशातील अक्षय्य ऊर्जा धोरणांसाठी जागरूकता निर्माण करणे, तंत्रज्ञान उन्नतीसाठी भूमिका ठेवणे आणि सामाजिक सहभाग वाढविणे यासाठी सातत्याने कार्य केले. त्यांच्या व्यावसायिक अनुभवासह सामाजिक आघाडीवर केलेले कार्यसुद्धा विशेष उल्लेखनीय आहे. विशेषतः त्यांनी निर्माण केलेले 'पुढचे पाऊल' हा सकारात्मक विचारांचा मंच असून यातून त्यांची दृष्टी स्पष्ट होते.
मा. श्री. प्रफुल्ल पाठक सर संत्रानगरी नागपूर मधील एक उमदे व्यक्तिमत्व. नागपूरपासून दिल्लीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा आव्हानांवर मात करत सतत पुढे जाण्याचा संदेश देणारा असा आहे. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अभियांत्रिकी, अक्षय्य ऊर्जा आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील संधी ओळखत स्वतःचा व्यक्तीपासून व्यक्तिमत्वापर्यंतचा त्यांच्या करिअरचा प्रवास झालेला आम्हाला दिसतो. २०१० मध्ये दिल्लीला स्थलांतरित होताना फॅमिली कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणे, नवीन संधी स्वीकारणे, रोटरी इंटरनॅशनल मधील जबाबदाऱ्या सांभाळणे या सगळ्या कार्यप्रणालीतून त्यांची नेतृत्व शैली अधिक प्रभावित झालेली जाणवते. नागपूरमधून नव्हे महाराष्ट्रातून दिल्लीत आल्यानंतर, 'पुढचे पाऊल' या सकारात्मक विचारांच्या अनोख्या मंचाची स्थापना मा. श्री. प्रफुल्ल पाठक सरांनी केली. खरे म्हणजे, 'पुढचे पाऊल' या उपक्रमाच्या निर्मिती करण्यामागील उद्देशाबद्दल त्यांनी जेव्हा सांगितले की समाजात सकारात्मकतेला बळ देणे आणि त्या माध्यमातून दिल्लीतील हजारो मराठी लोकांमध्ये मानसिक ऊर्जा आणि आशावाद वाढवणे, एवढेच नव्हे तर दिल्लीतील मराठी अधिकाऱ्यांना एकत्रितपणाने मुक्तपणाने विचार मांडण्यासाठी, 'पुढचे पाऊल' हा मंच कार्यरत असतांना दिसतो आणि हा मंच निर्माण करताना त्यामागचा त्यांचा उद्देश किती मोलाचा आहे हे जाणवते.
पर्जन्या - भारताची २०४७ साठी ठरवलेल्या सौर ऊर्जा क्षमता लक्ष्य अनुषंगाने सोलार एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाची भूमिका काय ?
मा. प्रफुल्ल पाठक - आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून भारताने २०४७ पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्याचे स्वप्न ठेवले आहे. २०४७साठी सौर ऊर्जा क्षमता अनुषंगाने सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाची भूमिका दृष्टिकोन आणि योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सौर ऊर्जा सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरण पूरक असल्यामुळे ती सर्वांसाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच जागरूकता वाढवणेही गरजेचे आहे. २०४७ पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याच्या भारताच्या ध्येयाला मदत करण्यासाठी केलेली ही संस्था देशभरात अक्षय्य ऊर्जा, विशेषतः सौर ऊर्जेचा वापर, व्यापारीकरण आणि विकास करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय आणि धोरणे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

पर्जन्या सौर उर्जा जनजागृती बाबत सरकारी धोरणात्मक बदलासाठी सामान्य नागरिकाचा काय सहभाग असेल?
मा. प्रफुल्ल पाठक नागरिकांनी ई-मेलच्या माध्यमातून आपले विचार सरकारपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आता मोकळा आहे. त्यामुळे आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे याबाबत ज्या काही अडचणी असतील त्या सरकारपर्यंत कळवाव्या. कारण या अंतर्गत होणाऱ्या निर्णय निर्मितीत लोक सहभागाचे महत्त्व आहे. प्रत्येक नागरिक देशाच्या धोरणांचा भाग होऊ शकतो.
पर्जन्या - जागतिक स्तरावर भारताला जागृत बनवण्यासाठी काय धोरण असेल?
मा. प्रफुल्ल पाठक - भारताला जागतिक स्तरावर ऊर्जा स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक दिशा, उच्च दर्जाची निरीक्षण प्रणाली आणि सौर कचऱ्याबाबत पुनर्वापर प्रक्रिया योग्यरित्या करण्याची आवश्यकता आहे. सोलर रिसायकलिंग टेक्नॉलॉजी मधील सध्याचे ट्रेंड आणि भविष्य याविषयी सांगताना सौर ऊर्जेचा झपाट्याने वाढणारा बापर लक्षात घेता पुढच्या दशकात सोलर बेस्ट मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा प्रश्न ठरणार आहे आणि त्यासाठी भारताला सध्या सौर ऊर्जा, सौर कचऱ्यासाठी एकसंघ नियम नाहीत, ते असण्याची आज गरज आहे. सोलर रिसायकलिंग हा उद्योग भविष्यात मोठा रोजगार क्षमतेसह विकसित होणारे नवीन क्षेत्र आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील घातक गोष्टींबाबतची जोखीम करण्यासाठी कमी किमतीचे काही प्रतीकात्मक उपाय करावे लागतील. सौर पॅनलचे अयोग्य विघटन केल्यामुळे जड धातू व इतर विषारी पदार्थ पर्यावरणात मिसळू शकतात त्यामुळे कमी खर्चिक उपाय काय असू शकतील यावर विचार होणे गरजेचे आहे. जसे स्थानिक पातळीवर पॅनल साठवणुकीसाठी काही डिझाईन सुरक्षित झोन निर्माण करणे, वैयक्तिक उपकरणे संरक्षणासाठी वापर करणे, साधी पुनर्वापर प्रणाली वापरणे तसेच काही तांत्रिक प्रशिक्षणाचे अल्पकालीन कोर्स बनविणे.
पर्जन्या सोलर एनर्जी क्षेत्रात तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तींसाठी कोणत्या संधी आहेत?
मा. प्रफुल्ल पाठक - सौर ऊर्जा म्हणजे फक्त अभियांत्रिकी नाही तर प्रकल्प व्यवस्थापन, सोशल मीडिया पब्लिक अवेअरनेस, सोलर कॉस्टिंग अँड फायनान्शियल प्लॅनिंग हे क्षेत्र तरुणांसाठी फक्त वैज्ञानिक नाही तर बहुआयामी संधी निर्माण करणारे आहे.
पर्जन्या इनोव्हेशन स्टार्टअपबद्दल आपले मत काय ?
मा. प्रफुल्ल पाठक - इनोव्हेशन स्टार्टअप सुरु करत असताना ग्रुपसोबत मिळून नवीन प्रकल्प करावा तरच या नवीन प्रकल्पातील यशाचा टक्का वाढू शकतो. त्यासाठी जिज्ञासा असावी लागेल. सोलर ही एक संधी आहे; जर तुम्ही याकडे उदासीनतेने पहिले तर ती एक फक्त टेक्नॉलॉजी बाटते पण तसं नाही.
पर्जन्या - दिल्लीतून महाराष्ट्र बघत असताना आजच्या या तरुण पिढीला त्यांच्या करिअरबाबत आपण काय संदेश द्याल ?
मा. प्रफुल्ल पाठक डिजिटलायझेशन मुळे आज विद्यार्थ्यांपुढे अनेक संधी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक माहिती उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये अनेक तरुणांनी यावं, इथे अनेक एक्सपोजर आहेत. सौर ऊर्जा हे एम्प्लॉयमेंट असलेले क्षेत्र आहे. स्टोरेज टेक्नॉलॉजी, कॉस्टिंग अशा विविध गोष्टींमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करून त्यावर काम करून व्यापक सर्व संधी उपलब्ध आहेत. संपूर्णतः सौर ऊर्जेवर अवलंबून असणारे सोलर व्हिलेजेस ही भविष्यात निर्माण होणारी शक्यता आहे त्यामुळे यामध्ये काम करण्याची संधी आणि त्यांना मिळू शकते, ती संधी आपण शोधावी.
खरं म्हणजे सोलर सोसायटी ऑफ इंडियाचा करिअर कट्टाला जोडण्याचा हाच उद्देश होता. आमच्या महाराष्ट्रातली मुलं प्रामाणिक आहेत, मेहनती सुद्धा आहेत, पण त्यांना एक्सपोजर मिळाल्याशिवाय ते पुढे जाऊ शकणार नाही. टॅलेंट असून चालत नाही वेगळ्या वाटेने गेल्याशिवाय संधी मिळत नाही. फक्त मेडिकल, इंजीनियरिंग नव्हे तर आर्टस्, कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे खूप सारे एक्सपोजर आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी ती संधी निवडावी कारण कला, साहित्य या सगळ्यांमध्ये दिल्ली सारख्या ठिकाणी एक्सपोजर मिळतात. नागपूर ते दिल्ली प्रबास हा कठीण असला तरी अशक्य नाही.
मा. श्री. प्रफुल्ल पाठक सर यांची ही मुलाखत म्हणजे ऊर्जा, पर्यावरण, कर्तृत्त्व, समाज आणि नेतृत्व त्यांच्या संगमातून दिसणारी एक व्यापक दृष्टी असणारी आहे. त्यांचा प्रवास प्रेरणादायी, विचार प्रवर्तक आणि भविष्यदर्शी आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ तांत्रिक नाही तर सामाजिक धोरणात्मक आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारे आहे. भारत हरित ऊर्जाकडे वेगाने वाटचाल करत असताना मा. पाठक सरांसारख्या नेतृत्त्वाची आवश्यकता आमच्या या देशाला जाणवते आणि 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' हे त्यांच्या कार्य करण्याच्या भूमिकेतून आम्हाला दिसते. त्यामुळे आम्ही अभिमानाने हे सांगू शकतो की आमच्या महाराष्ट्राचा नव्हे नागपूरचा व्यक्ती दिल्लीपर्यंत जाऊन देशाच्या विकासाच्या दृष्टीने भरीव कार्य करतांना बघून आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आम्ही सलाम करतो आणि पुढील वाटचालीसाठी करिअर कट्टा कडून शुभेच्छा !

 

शब्दांकन
प्रा. डॉ. वर्षा वैद्य
तायवाडे कॉलेज कोराडी सहविभागीय समन्वयक नागपूर विभाग