महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत 'नजेरे समोर राष्ट्र... हृदयात महाराष्ट्र...' या ब्रीदवाक्याचा उपयोग करीत प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची संवाद श्रृंखला या उपक्रमांतर्गत प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या मा. डॉ. सौ. अरुणा शर्मा, निवृत्त IAS अधिकारी पाय जमिनीवर आणि नजर आकाशावर प्रगतीचा पाया ध्रुव आणि महत्त्वाकांक्षा उंच उत्तम चारित्र्य आणि पराक्रमी कर्तृत्व सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेते तर सुंदर व्यक्तिमत्व मन जिंकते
या विचारांना योग्य तो न्याय देणाऱ्या डॉ. सौ. अरुणा शर्मा मॅडम यांची मुलाखत येथे शब्दबद्ध करीत आहोत. आशावाद हा केवळ टेम्प्लीन-कोटेड' शब्द नसून एक शाश्वत तर्क आणि जीवनाचा मार्ग आहे असं सांगणाऱ्या डॉ. सौ. अरुणा लिमये शर्मा भारताच्या Digital Transformation मागील दूरदर्शी नेतृत्व भारतातील प्रशासन, विकास, तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात काही निवडक व्यक्ती अशा आहेत ज्यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि उल्लेखनीय कार्याने देशाला एक नवी दिशा दिली. त्यापैकीच एक नाव अत्यंत आदराने घेतले जाते अरुणा शर्मा मॅडम, १९८२ बॅचच्या प्रतिष्ठित IAS अधिकारी. त्यांनी १९८१ मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि १९८२ ते २०२० या जवळपास ३८ वर्षांच्या कालखंडात भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत राहून भारताच्या डिजिटल प्रवासाला गती, दिशा आणि एक नवे स्वरूप दिले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी पारंपरिक भारताला डिजिटल भारताच्या दिशेने नेण्याचा पाया भक्कम केला.
त्यांच्या मते भारतातील युवकांमध्ये असलेली क्षमता अफाट आहे. युवकांनी लक्ष केंद्रित केले, सातत्याने मेहनत केली आणि प्रामाणिकपणा जपला तर त्यांना यश मिळणे अपरिहार्य आहे. जीवनातील चढउतार हा प्रत्येकाच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे; परंतु ज्ञान, प्रामाणिकता आणि अथक परिश्रम या तीन गोष्टी पक्या असतील तर यश नक्की मिळते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांनी प्रशासनात कार्य करताना हे मूल्य स्वतः पाळले आणि पुढील पिढीलाही तेच सांगत राहिल्या. देशाच्या ग्रामीण भागात तीन प्रकारच्या connectivity ची कमतरता ही सर्वात मोठी समस्या होती रस्ते संपर्क, आर्थिक संपर्क आणि डिजिटल संपर्क. या तिन्ही क्षेत्रांमध्ये प्रगती झाल्याशिवाय ग्रामीण भारत आधुनिक विकासाच्या प्रवाहात येऊ शकत नव्हता. सहकारी बँका आणि पोस्ट ऑफिसेस पूर्णपणे नॉन-डिजिटल असल्याने आर्थिक व्यवहारात प्रचंड अडचणी यायच्या. व्यवहार चुकत, वेळ लागत, चुका सुधारायला दिवस जात आणि भ्रष्टाचाराला वाव मिळत होता.
या सर्वांचा विचार करून अरुणा शर्मा मॅडम यांनी एक मोठे आव्हान स्वीकारले. त्यांनी सर्व IT तज्ज्ञांना एकाच खोलीत तीन दिवस बसवून संपूर्ण सॉफ्टवेअर आणि प्रणाली सुधारण्याचे काम केले. व्यवहार रोज चुकत असले तरी समस्या शोधून तात्काळ निराकरण करणे हेच उद्दिष्ट होते. सहा जणांची स्वतंत्र टीम प्रत्येक failure तपासायची, कारण त्यांनी सिद्ध केले की प्रभावी coordination असले की कोणतेही मोठे परिवर्तन शक्य होते. ही केवळ दुरुस्ती नव्हती, तर ग्रामीण भारताच्या डिजिटायझेशनचा एक संकल्प होता. या कठोर मेहनतीमुळे आज भारतात कोणत्याही व्यक्तीला सरकारी लाभ रोख रकमेने दिला जात नाही. मनरेगा असो, कृषी अनुदान असो, MSP चे पैसे असोत, पेन्शन असो सगळे डिजिटल पद्धतीने थेट खात्यात जमा होते. यामुळे भ्रष्टाचार कमी झाला, मध्यस्थ संपले, पारदर्शकता वाढली आणि प्रामाणिकपणे पैसा योग्य ठिकाणी पोहोचू लागला, हे भारतीय शासनव्यवस्थेतील एक ऐतिहासिक परिवर्तन होते.
UPI सुरू झाल्याच्या काळात केवळ ४०% लोकांकडेच स्मार्टफोन होता, तर ६०% लोकांकडे फक्त फीचर फोन. तरीही भारताला डिजिटल पेमेंट्समध्ये पुढे नेण्यासाठी RBI मध्ये sandbox तयार करण्यात आला. यामुळे तांत्रिक प्रयोग, चाचणी आणि बदल यांना गती मिळाली. कालांतराने स्मार्टफोनचा वापर वाढून तो ६५% वर पोहोचला आणि UPI चा प्रसार संपूर्ण देशभर झाला. अरुणा मॅडम यांच्या दूरदृष्टीमुळे डिजिटल पेमेंट्सची क्रांती घराघरात पोहोचली. खननक्षेत्रात (Mining Sector) होणाऱ्या auction प्रक्रियेबाबत मात्र मॅडमचा स्पष्ट विरोध आहे. त्यांचे म्हणणे असे की कंपन्या जास्त बोली लावतात, परंतु उच्च दरामुळे त्या बोली लावण्यापासून मागे हटू शकतात, यामुळे पारदर्शकतेवर परिणाम होतो. त्यांच्या मते खननक्षेत्रात 'systematic आणि sensible' दृष्टिकोनातून धोरणे आखणे आवश्यक आहे. अनावश्यक बोली लावून प्रक्रिया गुंतागुंतीची करण्यापेक्षा सुयोग्य आणि स्थिर प्रणाली आवश्यक आहे.
त्यांच्या संपूर्ण करिअरमधून एकच गोष्ट अधोरेखित होते ध्येय स्पष्ट असेल, काम सातत्याने व निष्ठेने केले तर यश मिळणे निश्चित आहे. कोणत्याही क्षेत्रात स्थिरता, दूरदृष्टी, मेहनत आणि प्रामाणिक दृष्टिकोन आवश्यक आहे, हे त्यांनी स्वतःच्या कामातून आणि अनुभवातून सिद्ध केले.
अरुणा शर्मा मॅडम यांचे जीवन हे भारतातील प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी धडे देणारे आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पारंपरिक प्रणाली आधुनिक झाली, ग्रामीण भाग डिजिटलदृष्ट्या सक्षम झाला आणि भारत आज जागतिक स्तरावर डिजिटल अर्थव्यवस्थेचा अग्रदूत म्हणून उभा आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका खोल आहे की भारतात आज डिजिटल व्यवहार ही जीवनाची मूलभूत गरज बनली आहे.
डॉ. अरुणा शर्मा मॅडम यांच्याशी साधलेला संवाद नक्कीच तरुणवर्गाला प्रेरणादायी राहणार आहे.
पुनःश्च करिअर कट्टाचे आभार.
धन्यवाद !
शब्दांकन
कु. निलम शैलेंद्र पाटील
मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव