मुलांच्या एका कार्यशाळेमध्ये मोबाईल वापराचा विषय सुरु होता. मोबाईल सोबत खूप वेळ जातो, तो वेळ कमी व्हायला हवा, असं बऱ्याच जणांना वाटत होतं. मोबाईल कशा-कशासाठी वापरला जातो, यावर मग आम्ही बोललो. अनेक महत्वाच्या, उपयोगाच्या गोष्टींसाठी तर तो वापरला जातोच, पण त्या ही पेक्षा जास्त 'मोबाईल डेटा' आणि 'वेळ' करमणुकीसाठी आणि 'असाच' वापरला जातो, असं अनेकांना वाटत होतं. आणि हा 'असाच' म्हणजे कसा? काहीतरी कामासाठी मोबाईल हातात घेतला की काही ना काही नोटिफिकेशन्स दिसत राहतात, रील्स समोर येत राहतात, एक युट्युब वरचा व्हिडिओ पाहिला की साधारण तसाच दुसरा व्हिडिओ सजेस्ट केला जातो आणि मग त्या सगळ्यात किती वेळ खर्च होतो, त्याच्यावर आपला काहीच कंट्रोल राहत नाही असा मुलांचा सूर होता. थोडक्यात मोबाइलवर 'नॉन प्रॉडक्टिव्ह' असा खूप वेळ जातो.
दिवसभराच्या धकाधकीनंतर विरंगुळा म्हणून मोचाईल हवासा वाटतो किंवा अभ्यास करताना, काही काम करताना कंटाळा आला की मोबाईल मदतीला येतो हे जवळजवळ प्रत्येकाने सांगितलं. कंटाळा घालवायचं 'मोबाईल' हे सगळ्यात मोठं साधन आहे, याबद्दल प्रत्येकाचं एकमत होतं. कंटाळा, थकवा प्रत्येकालाच कधी ना कधी येतो आणि त्यासाठीच तर आपण मोबाईलकडे जातो आणि बराच काळ तिथे अडकून पडतो. बर मग काही वेळ मोबाईल पाहिल्यावर कंटाळा जातो का? काहीजण म्हणाले, 'हो जातो' तर काही म्हणाले, 'नाही माहीत!' आता कंटाळा गेला की नाही हे कसं ठरवायचं?, हा अर्थातच पुढचा प्रश्न ! त्याचं सर्वसाधारण उत्तर निघालं की, थोडा वेळ गेल्यानंतर आधीचे जे काम आपण बाजूला ठेवलं होतं ते करावसं वाटलं, किंवा नवं काम करावसं वाटलं, उत्साह वाटला, फ्रेश वाटलं तर कंटाळा गेला असं म्हणता येईल.
थोडा वेळ मोबाईलवर काहीतरी पाहिलं की कंटाळा जातो, असं म्हणणारे मोजकेच होते. 'नाही माहित', असं म्हणणाऱ्या बऱ्याच जणांचा असा सूर होता की, खूप वेळ मोबाईल हातातला खाली ठेवलाच जात नाही आणि मग कुठलं तरी काम पूर्ण करायलाच हवं आता, अशी वेळ आली की मगच मोबाईल खाली ठेवला जातो. अशावेळी नाईलाजाची, निरुत्साहाची भावनाच जास्त प्रबळ असते. त्यामुळे मुळातला कंटाळा कमी होऊन उत्साह आला का नाही याच्याकडे पाहिलंच जात नाही. कदाचित कंटाळा कमी झालेला असतो, पण उत्साह नाही येत, निरुत्साहच जास्त वाटतो. मोबाईल जे जग आपल्याला दाखवतं ना, त्यात खूप एक्साईटमेंट असते, खूप नावीन्य असतं, मजा असते, ते सगळं पाहून मस्त वाटतं, खऱ्या आयुष्यातलं कुठलंच काम इतकं एक्सायटिंग नाही वाटत !
थोडक्यात कंटाळा घालवायला म्हणून ज्या मोबाईलचा आपण हात पकडतो, तो खरोखरच आपला कंटाळा घालवतो का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. जर कंटाळा जातच नसेल, निरुत्साह नाईलाजच जास्त वाटत असेल तर कंटाळ्यावरचा हा उपाय म्हणून मोबाईल नाही ना काम करत! मुळात हे खूपदा लक्षातच येत नाही आपल्या, आपण मोबाईलकडे पुन्हा-पुन्हा जातच राहतो असं का? यावर अनेक जणांनी सांगितलं की, कंटाळा आला की काय करायचं हे पटकन सुचत नाही, आणि हा मग बाकीचे उपाय जरा किचकट वाटतात, म्हणजे हाताने काही करा, फिरायला जा, पुस्तक वाचा वगैरे. त्यामानाने मोबाईल हा उपाय सोपा वाटतो आणि हातात, खिशात आहेच की मोबाईल !
या सगळ्यांमध्ये आणखी कळीचा प्रश्न विचारलाच जात नाही. त्या कंटाळ्याचं खरंच काहीतरी इतक्या तातडीने करणं गरजेचं असतं का? त्याला तिथल्या तिथे काही उपाय करुन चीतपट करणे आवश्यक आहे का? अनेकांना हा प्रश्न कळलाच नाही. म्हणजे काय? 'कंटाळा' ही भावना इतकी भयंकर आहे का? तिचं आपण काहीच केलं नाही तर काय होईल? काहीतरी त्रास होईल का? काहीतरी विपरीत, वाईट घडेल का? आमच्या कार्यशाळेत एकदम सन्नाटा पसरला.
कंटाळा या भावनेबद्दल (बोअरडम) संशोधन काय सांगतं ते बघूया. आपल्याला कंटाळा येतो म्हणजे नेमकं काय होतं? आत्ता आपण जे काम करतोय त्यात आपल्याला रस वाटत नाहीय आणि म्हणून त्या कामात काहीतरी बदल व्हायला हवा असा जो सिग्नल आपल्याला आपलं शरीर आणि मन देतं तो म्हणजे कंटाळा. कंटाळा आपल्याला दुसरा पर्याय शोधायला सुचवत असतं. ती एक 'नकोशी' भावना आहे, पण असह्य, भयानक अशी भावना नाही, हे मुळात लक्षात घेणं अगदी गरजेचं आहे. कंटाळा आला असला आणि तरीही हात घेतलेलं काम नेट लावून पार पाडलं, तर बऱ्याचदा हुश्श, कंटाळा आला आणि म्हणून काहीतरी वेगळं करून पाहिलं, काहीतरी नवं सुचलं आणि करून पाहिलं असं अनेकदा झालं आहे. त्यामुळे इनोव्हेशन (नवनिर्माण), सर्जनशीलता यांचं बीज बऱ्याचदा कंटाळ्यात असतं, असं आढळून आलं आहे. कंटाळ्याच्या संबंधित खूप संशोधन झालं आहे. खूप प्रयोग करून झाले एक गमतीशीर प्रयोग सांगते.
कंटाळ्यावरच्या एका प्रयोगामध्ये सहभागी होणाऱ्या माणसांचे दोन गट केले होते. त्यापैकी एका गटाला आधी टेलिफोन डिरेक्टरीमधले नंबर कॉपी करायचं एकसुरी काम दिलं होतं. दुसऱ्या गटाला असं काहीच काम दिलं नव्हतं आणि मग दोन्ही गटांना प्लॅस्टिकचे कप देऊन त्यांचे वेगवेगळे काय-काय उपयोग करता येतील, याच्यावर डोकं लढवायला सांगितलं होतं. ज्या मंडळींनी आधी कंटाळवाणं काम केलं होतं ना, त्यांनी खूपच जास्त वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या. हाच प्रयोग तीन वेगवेगळ्या गटांना घेऊनही झाला. एका गटाला आधी काहीच काम दिलं नव्हतं. दुसऱ्या गटाला थोडंसं कंटाळवाणं काम आणि तिसऱ्या गटाला अतिशय कंटाळवाणं काम दिलं गेलं होतं. मग त्यांना प्लॅस्टिकच्या कपांचे पुन्हा वेगवेगळे उपयोग शोधायला सांगितले होते. ज्या गटाला सर्वात कंटाळवाणं काम दिलं गेलं होतं, त्यांनी जास्तीत जास्त प्लॅस्टिकच्या कपाचे उपयोग सुचवले होते.
कंटाळ्यावर असे अनेक प्रयोग करण्यात आले आहेत, त्या सगळ्यांमधून एक गोष्ट फार ठळकपणे समोर आली आहे, की कंटाळा आल्यानंतरचे पुढचं काम लोकं करतात त्यात कल्पनाशक्ती जास्त लढवली जाते आणि नवीन गोष्टी जास्त सुचत जातात. पण त्यासाठी थोडा वेळ कंटाळ्यासोबत राहावं लागतं. कंटाळा येतो म्हणजे नेमकं काय होतं? हे पाहावं लागतं. कदाचित काहीच न करता कंटाळा अनुभवावा लागतो.
थोडा वेळ नुसताच शांत बसून राहिलं, आपल्याला शांत बसून कसं वाटतंय हे आजमावून पाहिलं, हा प्रकारच आता अनेकांच्या बाबतीत होतच नाहीय. कंटाळा येतोय अशी जराशी जरी शंका आपल्याला आली की लगेचचं हात मोबाईलकडे जातो आणि मग कंटाळ्यासोबत राहता येत नाही आणि त्यानंतर कल्पनाशक्ती लढवण्याचं, नाविन्याचं जग आपोआपच लांब जात राहतं. बरकरणी नकोश्या वाटणाऱ्या कंटाळ्याची ही अशी 'ग्यानबाची मेख' आहे. ही कथा साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झालेली पाहायची असेल, तर "कंटाळ्याशी दोस्ती" करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.