Author
संवाद शृंखला मुलाखत क्र. ६
मा. श्री. अमित भोळे
संचालक महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शकः मा. अमित भोळे 'करिअर कट्टा हा उपक्रम म्हणजे केवळ मार्गदर्शन नव्हे तर, स्वप्नांना दिशा देणारा संवाद'
जिथे प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळतं, आणि प्रत्येक उत्तरातून नवा आत्मविश्वास जन्म घेतो. 'महाराष्ट्रभरातील असंख्य विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधत, UPSC सारख्या कठीण वाटणाऱ्या परीक्षेला प्रेरणादायी प्रवासात बदलणारे व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय अमित भोळे सर. लेखनाच्या माध्यमातून ते केवळ माहिती देत नाही तर, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करतात. UPSC हा केवळ एक स्पर्धा परीक्षेचा टप्पा नसून, समाजाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा एक प्रवास आहे. ते 'युवकांसाठी करिअर कट्टा' या मासिकातील विविध लेखांच्या माध्यमातून सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात आणि मार्गदर्शन करीत असतात. 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत करिअर कट्टाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली. या संवाद शृंखलेत संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार तसेच पायाभूत सुविधा/प्रकल्प, वित्त खाते, नियंत्रक जनरल या महत्वपूर्ण पदावर कार्यरत असलेले मा. अमित भोळे सर यांची विद्यार्थ्यांनी विशेष मुलाखत घेतली.
मा. अमित भोळे सर यांनी आपल्या अनुभवसंपन्न विचारांद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, दिशा आणि यशाकडे वाटचाल करण्याची ऊर्जा प्राप्त झाली आणि म्हणूनच, सदर मुलाखत ही शब्दांकित केलेली आहे. UPSC परीक्षेच्या तयारीचा अनुभव सांगताना तसेच, मार्गदर्शन करताना मा. अमित भोळे सर बोलले की, स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ ज्ञानाचा कस नाही तर; धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाची ही परीक्षा असते. भोळे सर यांनी स्वतःच्या यूपीएससी तयारीतील अनुभवातून विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन हे अत्यंत उपयुक्त आहे, त्यांनी सांगितलेले विचार आजच्या तरुणांसाठी निश्चितच दिशा दाखवणारे आहेत. मी जेव्हा यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा नेमकी दिशा स्पष्ट नव्हती. मात्र एक ठाम निश्चय होता की, हा मार्ग आपल्याला निवडायचा आहे नंतर असं आपल्याला वाटायला नको की या मार्गाने गेलो असतो तर, या भावनेतून त्यांनी यूपीएससी देण्याचा निर्धार केला. स्वतः जेव्हा या परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात केली तेव्हा जळगावमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक तेवढे पोषक वातावरण नव्हते. आजही ते कमीच आहे, तरीही सरांनी चिकाटीने प्रयत्न केले आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले. सरांचे शिक्षण पुढे पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे झाले. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आले परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले. या अनुभवातून ते विद्यार्थ्यांना सांगतात की, हा मार्ग जरी कठीण आहे पण अशक्य असा नाही. यूपीएससी तयारी करताना 'प्लॅन बी' तयार ठेवणे अत्यावश्यक आहे, अगदी तयारीच्या पहिल्या दिवसापासूनच प्लॅन बी वर काम सुरू करावे चांगली नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळाली तरीही, जर मनात यूपीएससीची जिद्द असेल तर पुन्हा प्रयत्न करण्याचे धाडस ठेवावे. आत्मविश्वास आणि धैर्य हेच या निर्णयाचे आधारस्तंभ आहेत.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन संधी शोधायला हव्यात; आज जरी माहिती एका क्लिकवर आपल्याला उपलब्ध असली तरी त्यातील गॅप्स या विद्यार्थ्यांनी शोधून काढून त्यातूनच संधी शोधायला हवी हे अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. इ-गव्हर्नरच्या माध्यमातून अनेक कामे सुलभ झालेली आहेत, वेळेची बचत होत असल्याचे सांगितले. येत्या काळातील नोकरीच्या संधींचा विचार करीत असताना, विद्यार्थ्यांनी नव-नवे तंत्रज्ञान कौशल्य विकसित करणे तितकेच गरजेचे आहे. पूर्वीच्या काळातील नोकरीच्या संधी आज बदलल्या आहेत. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत फक्त त्या ओळखण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असे नाही. अपयश आले तरी, प्रयत्न थांबवायचे नाहीत. कायम सकारात्मक राहून ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करायचे यशप्राप्तीसाठी योग्य विचार आणि अविरत प्रयत्न हेच महत्त्वाचे आहेत. यूपीएससीमध्ये वैकल्पिक विषय निवडताना उपलब्ध माहितीचा पद्धतशीर विचार करावा, योग्य विषयांची निवड ही यशाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरते. मा. अमित भोळे सरांचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगतो की, यूपीएससी हा मार्ग जरी कठीण असला तरी, अशक्य नाही प्लॅन ए म्हणजेच स्पर्धा परीक्षा तर प्लॅन बी म्हणजे पर्यायी करिअर दोन्हीवर समान मेहनत घ्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विचारातील सकारात्मकता, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करावे. या मुलाखतीच्या माध्यमातून महसूल विभागातील कार्याचे वेगवेगळे आयाम आणि महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलेत.
मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर महाराष्ट्रभरातील UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना संदेश देताना मा. अमित भोळे सर यांनी असे भाष्य केले की, 'तुमच्या प्रत्येक प्रयत्नात प्रामाणिकपणा असू द्या, प्रत्येक अपयशाला शिकवणूक म्हणून स्वीकारा आणि प्रत्येक यशाला समाजासाठी उपयोगी ठरवा.' विद्यार्थ्यांनो आजपासूनच वेळेचे नियोजन, अभ्यासाची शिस्त आणि आत्मविश्वास यांचा सुरेख संगम साधा. तुमच्या हातातच तुमचे भविष्य आहे आणि त्या भविष्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याची ताकद ही तुमच्यातच आहे. तेव्हा यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या समस्त विद्यार्थ्यांना माझ्याकडून अनेकानेक शुभेच्छा..
करिअर कट्टाच्या या व्यासपीठावरून 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या माध्यमातून घेतलेल्या माझ्या मुलाखतीसाठी मी करिअर कट्टाचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो..!!

शब्दाकन
प्रा. सायली लाखे पिदळी सदस्य, राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती, करिअर कट्टा