'प्रेरणेचा प्रवास..'
'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या ब्रीदवाक्याला अनुसरून कार्यरत असलेले मा. सतीश जाधव सर हे केवळ एक व्यक्तिमत्व नाहीत तर, प्रेरणेचा दीपस्तंभ आहेत. राष्ट्रहिताची जाणीव आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि इथल्या मातीशी असलेली हृदयातील नाळ यांचा संगम त्यांच्या विचारातून सतत जाणवतो. स्पर्धा परीक्षेतील यशप्राप्तीसाठी प्रसंगी आलेल्या अनेक आव्हानांना सामोरे जात आपल्याला आलेल्या अनेक अनुभवांच्या आधारे आजच्या तरुणाईला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी त्यांची धडपड ही खरच मार्गदर्शक ठरतेय. त्यांच्या विचारातून उमटणारी ऊर्जा ही प्रत्येक युवकाला नव्या उमेदीने आव्हानं पेलण्याची प्रेरणा देते. 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या दिल्लीतील प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची मुलाखत या संवाद शृंखलेच्या माध्यमातून करिअर कट्टाच्या पदाधिकाऱ्यांनी मा. सतीश जाधव सर यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या अनुभवांचा आणि विचारांचा हा शब्दांकित संवाद...
कोल्हापूर येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. मा. सतीश जाधव सरांच्या घरातच पोलीस सेवेशी निगडित वातावरण होते स्वतःचे काका पीएसआय असल्यामुळे वडिलांची इच्छा होती की, आपल्या मुलानेही पोलीस सेवेत प्रवेश करावा. दहावी-अकरावीच्या काळातच ही कल्पना त्यांच्या मनात रुजली होती. वडिलांनी रोवलेले बीज हळूहळू अंकुरू लागले. पदवी शिक्षण घेत असताना जाधव सरांचा सहभाग काही यशस्वी विद्यार्थ्यांशी आला. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. या काळातच स्पर्धा परीक्षांची गोडी लागली आणि मोठ्या पदासाठी तयारी करण्याचा निर्धार त्यांनी केला. कोल्हापुरातील मा. विश्वास नांगरे पाटील सर आणि मा. हेमंत निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन सातत्याने जाधव सरांना लाभले. राजाराम कॉलेजमध्ये झालेल्या सत्कार कार्यक्रमात या तिन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनातून मोठे काम करण्याची प्रेरणा मिळाली. स्पर्धा परीक्षांची तयारी करायचीच आहे तर छोटा विचार कशाला करायचा? मोठ्या पदासाठीच प्रयत्न करायचे या विचारातून जाधव सरांचा प्रवास सुरू झाला. वडिलांनी रोवलेले बीज आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाने दिलेला आत्मविश्वास यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या मार्गावर ठाम पाऊल टाकल्याचे सांगितले.
मी जेव्हा पुण्यात होतो आणि रिझल्ट लागल्याची बातमी कळताच गावी सांगितली तेव्हा संपूर्ण गावात आनंदाचा, जल्लोषाचा माहोल निर्माण झाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. आपण यूपीएससीसारखी कठीण परीक्षा द्यायची हे ठरवण्यापूर्वी आपण हे जिंकू शकतो का? की जिंकू शकत नाही? असा प्रश्न अनेक वेळा मनात यायचा पण मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली इतरांना जमते तर मला का नाही? म्हणून मी ठामपणे ठरवलं की यूपीएससीची तयारी करायचीच.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. सतीश जाधव सर बोलले की, २०४७ या वर्षापर्यंत टेक्नॉलॉजीचा प्रशासनावर प्रभाव प्रचंड वाढणार आहे. आपल्या मा. पंतप्रधानांच्या व्हिजनप्रमाणे शासन थेट लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लोकांना सरकारी ऑफिसमध्ये येण्याची गरजच पडू नये यासाठी इ-गव्हर्नर्स हा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. शिक्षण व्यवस्थेला अधिक आधुनिक कसे बनवता येईल याकडे शासनाचा प्रमुख भर आहे. पुढच्या काळात कोणत्या नोकऱ्यांची मागणी वाढेल? जसे की ए आय रोबोटिक्स, ऑटोमेशन यांचा गांभीर्याने विचार केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे युवकांनी वेळेनुसार कौशल्य अवगत करणे आणि अद्ययावत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील दहा वर्षात आजचे अनेक जॉब प्रोफाइल बदलतील तर, काही संपतीलही आणि काही नवीन निर्माण होतील त्यामुळे संधी कोणत्या दिशेने आहे हे ओळखून आवश्यक कौशल्य आत्मसात करणे आजच्या तरुणांसाठी तितकेच गरजेचे आहे. बदल स्वीकारून त्याला जुळवून घेणे हीच खरी शक्ती आहे.
एक सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा पहिल्यांदा जेव्हा अधिकारी बनतो तेव्हा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, इतरांशी अत्यंत नम्रतेने वागणे या सगळ्यांचा अगदी मनापासून अभ्यास करावा लागतो. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी कामावरील चिकाटी आणि प्रामाणिकपणा अनिवार्य असतो. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी काय वाचायचं? यापेक्षा काय वाचू नये, कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे हे अधिक महत्त्वाचे आहे. मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया जातो म्हणून अभ्यासकांनी हे शक्य तितके टाळले पाहिजे.
भरमसाठ पुस्तकं वाचण्यापेक्षा दोन चांगली आणि योग्य संदर्भ पुस्तक निवडणे अधिक परिणामकारक असते. अभ्यासाचा सराव आणि पुनरावृत्ती हाच या परीक्षेचा खरा पाया आहे. त्यासाठी वेळेचे योग्य नियोजन महत्त्वाचे असते. यूपीएससीची तयारी सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारावं मला काय व्हायचं आहे? मी कोणत्या क्षेत्रासाठी योग्य आहे? आणि त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची माझी तयारी आहे का? एकदा ध्येयनिश्चित झालं की त्या दिशेने सतत प्रयत्न करत राहिले पाहिजेत. आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठण्याची इच्छा मनात असेल तर यूपीएससी सारख्या अवघड परीक्षेतही आपण नक्की यशस्वी होऊ शकतो.
मा. सतीश जाधव यांच्याशी साधलेल्या संवादाच्या माध्यमातून आपल्याला दर्शवले की चिकाटी, प्रामाणिकपणा आणि समाजासाठीची बांधिलकी हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. संघर्षातून उभारी घेऊन त्यांनी दाखवून दिले की प्रत्येक अडथळा हा पुढे जाण्याची एक पायरी असते. त्यांच्या विचारातून आपल्याला हे शिकायला मिळतं की स्वप्न फक्त पहायचे नसतात तर, त्यांना कृतीत उत्तरवायचं असतं.
आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून मेहनतीला योग्य दिशा दिली तर, कोणतेही ध्येय अशक्य नाही त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.
'स्वप्न तीच खरी असतात, जी आपल्याला झोपू देत नाहीत; आणि मेहनत तीच खरी असते, जी त्या स्वप्नांना वास्तवात आणते.'
करिअर कट्टाच्या या व्यासपीठावरून 'नजरेसमोर राष्ट्र, आणि हृदयात महाराष्ट्र' या संवाद शृंखलेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या माझ्या मुलाखतीसाठी मी करिअर कट्टा या उपक्रमाचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो.
धन्यवाद..!
शब्दाकन
प्रा. सायली लाखे पिदळी सदस्य, राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती, करिअर कट्टा