मा. संतोष चाळके हे २००४ चे IPS अधिकारी आहेत, जे सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून कार्यरत आहेत. त्यांना २०१४ मध्ये CBI मधून CISF मध्ये नियुक्त करण्यात आले होते.
पदः उपमहानिरीक्षक (DIG), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
मागील सेवाः ते यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
नियुक्तीः एप्रिल २०२२ मध्ये त्यांची CBI मधून CISF मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व करिअर कट्ठाच्या माध्यमातून 'नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र' या संकल्पनेतून सुरु असणारा दिल्ली दौरा आणि त्यातील ही मुलाखत.
वेदिका थोरात - सातारा ते दिल्ली हा प्रवास करताना यूपीएससीच करायचं किंवा आयपीएस व्हायचं हे आपलं ठरलं होतं का ?
तो प्रवास कसा होता ?
मा. संतोष चाळके सिविल सर्विसेस करायचंच हे ठरलेलं होतं. दहावीला ९१% मिळाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्रजी वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडिया समोर घेतला. अभ्यास काय करायचा कसा करायचं माहिती नव्हतं पण तरीही 'टाइम्स ऑफ इंडिया' पूर्ण पेपर लिहून काढला. तेव्हाच ठरवलं की यूपीएससी करायचंच.
वेदिका थोरात आपण दहावीलाच करिअर कसं काय निवडलं त्याच्या मागे काही कारणं होती का?
मा. संतोष चाळके - मोठा भाऊ आयएएसची तयारी तयारी करीत होता मग त्याला बघून मलाही वाटलं की आपणही ही तयारी करावी. त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढला. दहावीनंतर टायपिंगचा क्लास लावलेला होता. त्याचे इन्चार्ज श्रीधर जोशी होते. त्यांनी आयएएस परीक्षेबद्दल सांगितलं त्यातून कलेक्टर होता येते. साताऱ्याचं आमचं घर अगदी कलेक्टर साहेबांच्या घराच्या जवळ होते त्यांना लाल दिव्याच्या गाडीतून जातांना बघत असता स्वतःच्याही स्वप्नाला पूर्ण करायचे अशी खुणगाठ मनाशी बांधत पुढचा प्रवास सुरु केला. निर्णय लवकर घेतल्यामुळे अभ्यासाला भरपूर वर्ष मिळाली.
वेदिका थोरात - सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स नेमकं कसं काम करते ?
मा. संतोष चाळके - सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्सबद्दल कमी लोकांना माहिती असते. CICF फक्त Industrial Security बघत नाही तर देशातील सर्व Airport, Seaports, Metro rail, Parliament, Space Installation आणि Nuclear Plants या सगळ्या महत्वाच्या सुरक्षेसाठी सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स काम करते. देशासाठी पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्या तर देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येवू शकते. या सगळ्याचा रक्षणकर्ता म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स.
वेदिका थोरात - अधिकारी झाल्यानंतरही आपण पुस्तक वाचण्याची आवड कशी जपली ?
मा. संतोष चाळके - जर तुम्ही पुस्तक वाचत नसाल तर तुमची वैचारिक प्रगती होऊच शकत नाही. या आयुष्यात आपण प्रत्येक माणसाला भेटायचं ठरवलं तर किती माणसांना भेटू शकतो? पण जर तुम्ही पुस्तक वाचलं तर एका पुस्तकात तुम्ही अनेकांना भेटू शकता, त्यांच्या विचारांपर्यंत पोहचू शकता, आपल्यामध्ये बदल घडवू शकता. माझ्या घरामध्ये टीव्ही नाही. मुलगा मला रोज नवीन पुस्तकाची मागणी करतो. त्याला दुसरा टाईमपास करायचा नाही. त्याला मी जर आज संध्याकाळी जाऊन पुस्तक दिलं तर उद्या संध्याकाळी वाचून संपवतो. मिसेस, माझी आणि मुलाची स्वतःची अशी लायब्ररी आहे. एवढं पुस्तकांचं बाचन केले तर त्यात आनंद आहे आणि ती करिअरसाठी उपयोगी ठरू शकते. जसं तुम्ही तुमचे करिअर करताय, तुम्ही कुठल्या क्षेत्रात करिअर करणार मला अजून माहित नाही. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की, करिअर कोणतं निवडाल तर करिअर निवडण्याच्या आधी पहिले स्वतःला ओळखा, तुमचे चांगले वाईट गुणदोष ओळखा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्यामध्ये स्वतःची ओळख आहे, माझ्या समाजाची ओळख आहे आणि मग त्यामध्ये स्वतःला शोधलं की मला काय आवडतं, काय करायला आवडेल, यश म्हणजे काय? तणावाच्या परिस्थितीतून, कठीण मानसिक तणावाचा काळ आहे तर यामध्ये एखाद्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं याची जाणीव होऊ द्या.
वेदिका थोरात - आपण दहावीपासून अभ्यास सुरू केला, तुम्हाला कधी अभ्यासाचा कंटाळा नाही आला का?
मा. संतोष चाळके - अभ्यास करणे, वाचन करणे ही माझी आवड आहे. ज्याच्यामध्ये आवड असेल तेच करायच आणि त्यासाठी तत्पर असले पाहिजे. तुमच्या वयामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे झोप, मन स्थिर असणे आणि शारीरिक स्वास्थ-विकास उत्तम असणे, निरोगी शरीरात निरोगी मन असेल तर मानसिक ताणतणाव राहणार नाही आणि अभ्यासाला अडथळा येणार नाही. त्यासाठी मोबाईलचा कमी वापर, आवश्यक झोप घ्या. निवांत झोपेसारखे औषध जगात दुसरं कुठलेच नाहीय. रात्री झोपायचे दहा वाजता आणि उठायचे सहा वाजता हा नित्यक्रम ठेवा, व्यायाम प्राणायाम नियमित करा. त्यामुळे मानसिक ऊर्जा मिळेल. अभ्यास करण्यासाठी मन सुदृढ, मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
वेदिका थोरात - परीक्षा देतांना तुम्हाला किती अडचणी आल्या? किती प्रयत्नानंतर यश मिळाले?
मा. संतोष चाळके - UPSC मध्ये मी चार वेळा नापास झालो पण मी खचलो नाही तर त्या अपयशाला मी माझी ताकद
बनवली आणि जोमाने तयारी करीत यश मिळिवले. स्पर्धा परीक्षामध्ये स्वतःला सिद्ध करणे सोपे नाही. प्रत्येकाने IAS झाले पाहिजे असेही नाही. कारण अभ्यासात समोरच्याचा टक्का वाढला की आपण मागे येतो. त्यामुळे कित्येकदा तुम्हाला त्या रेसमध्ये राहण्यासाठी तुम्ही ९९% घेतले तरी समोरच्याने जास्त मार्क्स घेतले तर आपल्याला यश मिळालं नाही. सिव्हील सर्विसेसच्या ग्लॅमरकडे न बघता आपण आपली पात्रता ओळखावी, अशी काही क्षेत्र आहेत ज्यामध्ये आजही आपण लक्ष दिलं नाही. आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये करिअर करा. 'जीवन कशासाठी जगायचे?' हे ज्याला कळलं ना 'ते कसं जगायचं' याचे उत्तर त्यामध्येच आहे. कमिटमेंट असेल आणि आतून इच्छा असेल तर मग पगार किती मिळतो, सुट्टी मिळते की नाही आणि पोस्टिंग कुठे होते हे सगळे प्रश्न छोटे होऊन जातात.
वेदिका थोरात - आपण जबाबदारीच्या पदावर असतांना, सतत तणाव असतांना सुद्धा आपल्या वाणीमध्ये मृदूपणा आणि संयम
- शांतता जाणवते. हे आपण कसे साध्य केले?
मा. संतोष चाळके - २००१ पासून मी या कार्याला सामोरे जात आहे. चांगले करिअर का पाहिजे? तर चांगले जगता यावे. त्यासाठी फक्त पैसा नाही तर स्वास्थ छान पाहिजे त्यासाठी योग, मेडिटेशन करा. मन टवटवीत असेल तर काम करायला आणि त्याचा आनंद घ्यायला स्फूर्ती बेईल आणि कामासाठी प्लॅनिंग करता येईल. आपण निवडलेले काम असेल तर ते मनापासून करण्याचा आनंद मिळेल आणि जबाबदारी पूर्ण करण्याची भीती नसेल, हे जोखमीचे काम करतांना प्रत्येक गावात एक माणूस आपण आपला नेमला तर आपल्याकडे माहिती मिळेल आणि त्यासाठी काय करायचे याचा मार्ग मिळेल शिवाय काम करतांना तणाव राहणार नाही.
वेदिका थोरात - विकसित भारत २०४७ बद्दल आपण काय सांगाल?
मा. संतोष चाळके - विकसित भारत २०४७ मध्ये लोकसंख्येची शक्ती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास, तंत्रज्ञान आधारित स्वयंपूर्णता आणि सक्षम संरक्षण व्यवस्था हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत.
वेदिका थोरात - या तरुण पिढीला आपला काय संदेश असेल?
मा. संतोष चाळके - स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ते प्रथम समजून घ्या. ९८% मिळाले म्हणजे यश मिळेलच असे नाही. कारण बरेच विद्यार्थी प्रयत्न करतात. टक्केवारी वाढली तरी आपण कुठेतरी मागे येत जातो वाटते. अपयश आले तरी खचून न जाता जोमाने पुढे जा आणि किती तास अभ्यास केला यापेक्षा कसा केला नि आपल्या आवडत्या क्षेत्रात केला तर निराशा पदरी येत नाही आणि काम करतांना जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि इच्छाशक्ती याच्या जोरावर यश खेचून आणता येते. आजच्या डिजिटल युगात युद्धाचे स्वरूप बदललेले आहे. सायबर हल्ले, दहशतवादी हल्ले त्यामुळे अंतर्गत सुरक्षेची आव्हाने आहेत. तरुणांनी जागरूक होऊन या डिजिटल युगात वावरावे.
मा. संतोष चाळके सरांच्या मुलाखतीतून त्यांच्या नेतृत्व गुणांसोबत प्रामाणिक आणि संतुलित आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वाचा ठसा उमटलेला दिसतो. भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारणारा क्षण सगळ्यात मोठा अभिमानाचा असा होता. अधिकारी होणे म्हणजे फक्त वर्दी धारण करणे नव्हे तर अनेकांचे प्राण हाताच्या ऑजळीत घेऊन जबाबदारीपूर्ण निर्णय घेण्याचा क्षण वर्दी घालून घेतलेल्या शपथेची आठवण करून देणारा असतो. राष्ट्रभक्ती, प्रामाणिकपणा आणि शिस्त हीच करिअरची मुलभूत मूल्ये असावीत. आपल्या या सेवेपुढे आम्ही सगळेच नतमस्तक होतो. करिअर कट्टाच्या वतीने आपणास पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो !
शब्दांकन
प्रा. डॉ. वर्षा वैद्य
तायवाडे कॉलेज कोराडी सहविभागीय समन्वयक नागपूर विभाग