Author
संवाद शृंखला मुलाखत क्र. ८
मा. सुप्रिया देवस्थळी
Joint Controller General of Accounts for the Public Financial Management System (PFMS) division.

'महाराष्ट्राची परंपरा, मूल्यं आणि कार्यनिष्ठा जपत देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे - सुप्रिया सुरेंद्र देवस्थळी मॅम. मातृभूमी, संस्कार आणि कर्तव्यनिष्ठेची शिकवण त्यांच्या कामात स्पष्ट दिसते.'
महाराष्ट्रातील युवकांचा सर्वांगीण विकास हे ध्येय नजरेसमोर ठेवून, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत दिल्लीत कार्यरत Joint Controller General of Accounts (PFMS विभाग) मा. सुप्रिया देवस्थळी मॅडम यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. हा अनुभव केवळ एक संवाद नव्हता; तर माझ्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात नवी दिशा देणारा एक संपूर्ण अध्याय ठरला.
त्यांच्याशी झालेला संवाद साधा प्रश्नोत्तरांचा नव्हता तर तो आजच्या तरुणांच्या मनोविश्वापासून UPSC सारख्या कठीण स्पर्धा, कौशल्यविकास, फिटनेस, कुटुंबमूल्ये, डिजिटल युगातील आव्हाने आणि समाजातील बदलणारे प्रवाह या सर्वांवर हृदयातून उमटलेली अर्थपूर्ण चर्चा होती.
फिटनेसविषयी त्यांनी व्यक्त केलेले विचार बिशेष प्रेरणादायी होते. आजचा युवक आरोग्याबद्दल जागरूक असला तरी फिटनेस म्हणजे फक्त व्यायाम किंवा शरीररक्षण नाही; ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. शिस्त, सातत्य, आत्मनियंत्रण आणि मानसिक संतुलन या सगळ्यांचा संगम म्हणजे खरा फिटनेस. वेळ कमी असला तरी योग्य नियोजन आणि दृढनिश्चय असेल तर तंदुरुस्त आणि सक्षम जीवन जगणे शक्य आहे, हे त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितलं.
UPSC संदर्भातील चर्चा मनाला भिडणारी होती. त्यांच्यामते UPSC ही केवळ ज्ञानाची परीक्षा नसून मानसिक स्थैर्य, संयम, सातत्य आणि योग्य दृष्टिकोनाचीही कसोटी आहे. तयारी दरम्यान येणारा ताण, असुरक्षितता, अपयशाची भीती या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांच्या मनात असतात, आणि त्यांना समजून घेणारी व्यक्ती एखादी अनुभवी अधिकारीच असू शकते. त्यांनी सांगितलेला एक मंत्र मनात कायमस्वरूपी कोरला जातो 'Consistency over intensity.' सातत्य असेल तर कोणतीही परीक्षा, कोणतेही ध्येय दूर राहत नाही.
कौशल्यविकासाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या जगात केवळ पदवीच नाही तर कौशल्य हेच खरे मूल्य आहे. स्वतःची क्षमता ओळखून तिला विकसित करणे, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवणे आणि स्वतःला सतत अपडेट ठेवणे यातच प्रगतीचा मार्ग आहे. जग बदलत आहे, संधी बदलत आहेत आणि त्यामुळे तरुणांनी फक्त नोकरीकडे न बघता मोठं विचार करण्याची गरज आहे, अशी त्यांची धारणा होती.
पालकत्वाविषयी त्यांनी व्यक्त केलेले विचार अत्यंत हृदयस्पर्शी होते. मुलांना प्रेमाची गरज असते, पण त्याहून महत्त्वाची असते ती विश्वासाची आणि योग्य स्वातंत्र्याची. मुलांना जास्त जपल्याने काही वेळा त्यांची निर्णयक्षमता कमी होते ही त्यांनी सांगितलेली गोष्ट कोणत्याही पालकांना विचार करायला लावणारी होती. त्यांच्या मुलींनी कधी तरी त्यांना सांगितलेली ओळ 'आई, तू नेहमी आमच्यासोबत असशील, तर आम्ही independent कधी होणार?' पालकत्वातील संतुलन किती महत्त्वाचं आहे, हे स्पष्ट दाखवते.
व्यस्त करिअर सांभाळताना कुटुंबासाठी वेळ देण्याची त्यांची भूमिका वास्तववादी आणि मूल्यप्रधान होती. काम कितीही महत्त्वाचं असलं तरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये; कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण मुलांचे बालपण पुन्हा मिळत नाही हा त्यांचा जीवनानुभवातून आलेला सोपा पण प्रभावी संदेश होता.
डिजिटल युगातील मोठ्या पिढीच्या अडचणींबद्दल त्यांनी दाखवलेली समजूतदार भूमिका मनाला भिडली. तंत्रज्ञान
सर्वांसाठी असले तरी सर्वजण तंत्रज्ञानासाठी तयार नसतात. त्यामुळे वयस्कर लोकांना या डिजिटल बदलांमध्ये साथ देणे ही संपूर्ण
समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असा त्यांचा संदेश आजच्या तरुणांना मार्गदर्शक आहे.
स्टार्टअप संस्कृतीवरील त्यांचे विचारही प्रेरणादायी होते. स्टार्टअप म्हणजे फक्त व्यवसाय नव्हे; तर देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा मार्ग आहे. समस्या ओळखून त्यावर उपाय शोधणे, रोजगार निर्माण करणे आणि समाजात बदल घडवणे हीच खरी उद्योजकता आहे, असे त्यांनी सांगितले.
संवादाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेला संदेश माझ्यासाठी आणि प्रत्येक युवकासाठी एक प्रकाशकिरण होता स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्न मोठी ठेवा, अपयशाला घाबरू नका आणि सातत्य जपा. मेहनत करणाऱ्याला जग स्वतःहून मार्ग देतं हा त्यांचा अनुभवसिद्ध विश्वास.
ही संपूर्ण मुलाखत माझ्यासाठी विचारांची, मूल्यांची आणि जीवनदृष्टिकोनाची एक यात्रा होती. प्रत्येक वाक्यातून नवीन
शिकवण मिळाली, प्रत्येक अनुभवातून प्रेरणा मिळाली, आणि या संवादाने माझ्या आयुष्यात एक नवीन पायरी घडवली. केवळ
अधिकारी म्हणून नव्हे, तर एक मार्गदर्शक, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून मा. सुप्रिया देवस्थळी मॅडम यांनी माझ्यासह असंख्य
विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा दिली.
हा अनुभव माझ्यासाठी सदैव खास राहील कारण तो फक्त संवाद नव्हता, तर जीवन समजून घेण्याची एक अनमोल संधी होती.
धन्यवाद !

 

शब्दांकन
वेदिका संतोष थोरात
विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती, पुणे