संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व उत्तम गायकवाड सर
'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या ब्रीद वाक्याला अनुसरून कार्यरत असलेले मा. उत्तम गायकवाड सर हे केवळ एक आदर्श नेतृत्व नाही तर, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहेत. सर आज इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असतानाही महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेली नाळ आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यात जाणवते आणि या तळमळीतून त्यांनी केलेलं मार्गदर्शन महाराष्ट्रातील तरुणाईला आव्हान पेलण्यासाठी एक नवी ऊर्जा देते. 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या दिल्लीतील प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची मुलाखत या संवाद शृंखलेच्या माध्यमातून करिअर कट्टाच्या पदाधिकाऱ्यांनी मा. उत्तम गायकवाड सर यांच्याशी संवाद साधला त्यांच्या अनुभवाचा आणि विचारांचा हा शब्दांकित संवाद....
ग्रामीण वातावरण ते दिल्ली पर्यंतचा प्रवास हा फक्त स्वतःच्या यशाचा प्रवास नसून महाराष्ट्रातील स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा हा प्रवास आहे. या प्रवासाची सुरुवात स्थानिक शाळेत प्रवेश घेण्यापासून सुरू झाली. सुविधा कमी असल्या तरी 'शिक्षण हीच बदलाची ताकद' हे जसं जसं मला जाणवलं तसं माझी शिक्षणातील गोडी वाढत गेली. परिस्थिती कितीही बिकट आली तरी मी शिक्षणाची साथ कधी सोडली नाही, असे सर सांगतात.
उच्च शिक्षणासाठी पुढे ते शहरात आले. गावातील वातावरण आणि शहरातील वातावरण यात बराच फरक असतो. त्यांच्याशी जुळवून घेणं सुरुवातीला कठीण गेलं. पण जीवनात काही करायचं असेल तर प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या बदलाशी जुळवून घेता आलं पाहिजे, तरच आपण स्पर्धेत टिकू ही एक महत्त्वाची शिकवण तेव्हा मला मिळाली. तेथून मग पुढे करिअरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. असे सर सांगतात.
करिअरच्या संदर्भात बोलायचं झालं तर आज आपण पाहतो यूपीएससी, एमपीएससी मध्ये जेव्हा अपयश येते. तेव्हा विद्यार्थी खचून जातात आता सर्व काही संपलं असं त्यांना वाटतं. पण आपण स्वतःला थोडं सावरून आजूबाजूला बघितलं तर अनेक संधी तुम्हाला दिसतील. पण आपण पाहतच नाही या गोष्टीची मोठी खंत वाटते असे सर म्हणतात.
आज सर जनरल मॅनेजर (एच आर अँड रिक्रुटमेंट सर्विस) इ. डी. सी. आय. एल. इंडिया मध्ये कार्यरत आहेत. इ. डी. सी. आय.एल. इंडिया लिमिटेड हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेली एक प्रतिष्ठित मिनी रत्न कंपनी आहे. देशातील शैक्षणिक प्रकल्प, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य आणि मोठ्या प्रमाणावर भरती सेवा पुरवण्यात ईडीसीआयएल अग्रगण्य आहे. या संस्थेच्या एच आर व रिक्रुटमेंट क्षेत्रात परिणामकारक नेतृत्व देणाऱ्या नावांमध्ये उत्तम गायकवाड हे एक महत्त्वाचं नाव आज आहे पण मी माझ्या करिअरची सुरुवात मानव संसाधन विभागात मूलभूत पदापासून केली. मानव व्यवस्थापन, कर्मचारी विकास, संस्थात्मक प्रगती, आणि मोठ्या प्रमाणावरील रिक्रूटमेंट प्रक्रिया या विषयांमध्ये मला सुरुवातीपासूनच आवड होती, असे सर सांगतात.
त्यामुळे ज्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आजपर्यंत मला देण्यात आल्या त्या पद्धतीने मी काम करत गेलो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रिक्रूटमेंट नेतृत्व असो किंवा एच. आर. धोरणाची आखणी असो किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे असो प्रत्येक काम मी केला आहे आणि करत आहे. आज प्रगत तंत्रज्ञानाच्या काळामध्ये फक्त डिग्री घेणं पुरेसे नाही. तर आपण नवीन स्किल शिकण्याकडे ही लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून सरांनी, Advance Excel, HR Analytic, Leadership and Management, VBA, Programming Power BI असे एक एक कोर्स पूर्ण केले. याचा पुढे त्यांना त्यांच्या कामामध्ये खूप फायदा झाला.
पुढे सर म्हणतात की, माझं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की, आपला आजूबाजूला खूप काही आहे करण्यासारखं फक्त यूपीएससी, एमपीएससी म्हणून आपण जेव्हा तयारी करत असतो तेव्हा या बाकीच्या क्षेत्राकडे पण थोडे डोळसपणे आपण पाहिलं पाहिजे. तुम्ही कुठेही काम करा, कोणत्याही कंपनी संस्थेसाठी काम करा 'मानव संसाधन हे कोणत्याही संस्थेचे खरे भांडवल आहे. योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी नेमणे हीच सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूक आहे. म्हणून आपण आपली पात्रता तपासणी स्वतःची आवड काय आहे आणि कोणत्या प्रकारचे काम मी पूर्ण क्षमतेने करू शकतो हे संपूर्ण तपासूनच करिअरचा मार्ग निवडावा.
शेवटी सरांनी तरुणांसाठी दिलेला संदेश म्हणजे, स्वतःला शिस्त लावा, सतत नवीन शिकत रहा, आणि काम करण्याची क्षमता विकसित करा, मग यश तुमचेच आहे.
एकाच भेटीत आपलेसे वाटणारे उत्तम गायकवाड सर, त्यांनी अनेक क्षेत्रात तरुणांसाठी असलेल्या संधीची ओळख आम्हाला करून दिली.
शब्दांकन
अनिशा अशोक सुखसे
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, धाराशिव