Author
संवाद शृंखला मुलाखत क्र. ११
मा. डॉ. तुषाबा शिंदे (IRPS)
(Director, DARPG, Ministry of Personnel, Public Grievances and Pensioners, New Delhi)

उंच भरारीचे पंख....
IRPS अधिकारी मा. डॉ. तुषाबा शिंदे यांची प्रेरणादायी जीवनयात्रा संघर्षातून आत्मविश्वासाकडे, स्वप्नातून कर्तृत्वाकडेः
'महाराष्ट्रातील युवकांचा सर्वांगीण विकास' हे ध्येय नजरेसमोर ठेवून महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या माध्यमातून 'नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत सध्या दिल्लीत कार्यरत मा. डॉ. तुषाबा शिंदे, IRPS यांचा जीवनप्रवास आणि प्रशासकीय सेवेतील त्यांची उत्कृष्ट कार्यप्रणाली याची ओळख मुलाखतीतून करून घेण्याची संधी मिळाली.
आजचा विद्यार्थी बदलत्या करिअर जगात मार्ग शोधत असताना फक्त यशस्वी पदांची चमक बघत नाही, तर त्या पदांमागे लपलेला संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वास जाणून घेऊ इच्छितो. अशा असामान्य प्रवासांची उदाहरणं प्रेरणेला दिशा देतात, दृष्टिकोन बदलतात. आणि म्हणूनच IRPS अधिकारी डॉ. तुषाबा शिंदे यांची कहाणी हे फक्त करिअरचे मार्गदर्शक उदाहरण नाही तर ती जिद्दीची, स्वतःला घडवण्याची आणि आत्मविश्वासाच्या प्रकाशात प्रत्येक अडथळा ओलांडण्याची जिवंत साक्ष आहे असे जाणवते.
डॉ. शिंदे यांचा प्रवास ग्रामीण भागातल्या एका साध्या घरातून सुरू झाला. त्यांच्या घरचं वातावरण सोपं साधं; संधी मर्यादित, पण मनातली स्वप्नं मात्र अपरिमित. लहानपणी एका वर्तमानपत्रातील छोटेखानी बातमी ज्यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांविषयी वाचलेली ओळ त्यांच्या मनात काहीतरी खोलवर हलवून गेली. त्या क्षणाने त्यांच्या विचारविश्वाला वेगळी दिशा दिली. त्याच वेळी मनात एक ठाम भावना निर्माण झाली की, 'मी भारतासाठी काम करेन लोकांसाठी काही मूल्य निर्माण करेन,' असे अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचं स्वप्न धूसर नव्हतं; ते जाणूनबुजून स्वीकारलेलं ध्येय होतं.
पुढे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश हा त्यांच्यासाठी पहिला आत्मविश्वासाचा घडा ठरला. याविषयी सविस्तर सांगताना ते म्हणाले, मेडिकलमध्ये प्रवेश मिळणे हे त्यांच्या जीवनातील पहिलं मोठं यश आणि त्याचबरोबर पहिली मोठी कसोटीही. इंग्रजी भाषेची अडचण वर्गात सतत जाणवत होती. आजूबाजूचे विद्यार्थी अत्यंत आत्मविश्वासाने बोलत असताना ते मात्र गप्प बसत. त्या काळातील एक घटना त्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा ठरली. एका मैत्रिणीने सहजपणे पण मनाला भिडेल असे शब्द उच्चारले, 'इंग्रजी येत नाही म्हणून तू कमी नाहीस.' हे वाक्य त्यांच्या मनातील भीतीवर मात करणारं ठरलं. त्याच दिवशी त्यांनी स्वतःशी त्यांनी ठरवले की, भाषा कधीच व्यक्तिमत्त्व ठरवत नाही; व्यक्तीच त्याचं जग घडवतो.
त्यानंतर मेडिकलच्या सततच्या प्रॅक्टिकल्स, रात्रीचे लांब अभ्यासाचे तास, घरचा आर्थिक ताण, पण या सर्वांमध्ये त्यांनी स्वत्व टिकवलं. त्यांनी केवळ पाठ्यपुस्तकच नाही, तर मानवी वेदना, समाजातील असमानता, आरोग्य व्यवस्थेची कमतरता यांना जवळून पाहिलं. याच अनुभवांनी त्यांच्यात समाजासाठी व्यापक पातळीवर काम करण्याची जाणीव दृढ केली. 

मेडिकलचा अभ्यास, लोकांचे अनुभव, सामाजिक प्रश्न हे सर्व शिकत असताना त्यांना जाणवत होतं की त्यांच्या कार्यक्षेत्राची मर्यादा फक्त हॉस्पिटलच्या भिंतीपुरती नको. त्यांना व्यापक पातळीवर, नियमांमध्ये, व्यवस्थेत, सार्वजनिक सेवेत परिवर्तन घडवायचं होतं. त्यामुळे त्यांनी आयुष्य बदलून टाकणारा निर्णय घेतला UPSC ची वाट निवडली. हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. तो सलग वर्षानुवर्षे पाहिलेल्या समस्यांमधून, मनातल्या अस्वस्थतेतून आणि देशासाठी काहीतरी मोठं करण्याच्या ऊर्मीमधून तयार झालेला होता.
त्यानुसार UPSC च्या तयारीत त्यांनी सर्वात आधी स्वतःला प्रश्न विचारला- 'मी दररोज स्वतःला कालपेक्षा थोडं चांगलं बनवत आहे का?' त्यांच्या तयारीमध्ये महत्त्वाची गोष्ट होती ती स्वतःशी प्रामाणिक संवाद असणे, ते नेहमी म्हणतात, 'Self-talk तुम्हाला आतून मजबूत बनवतं; मेंदूला दिशा दाखवतं.' अभ्यासाच्या दिनचर्या, नोट्स, टेस्ट सीरीज एवढंच नाही; त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्त्व तयार करण्यावर जास्त भर दिला. त्यांच्या मते UPSC ही फक्त पुस्तकांची परीक्षा नाही तर ती संयम, सातत्य, काटेकोरपणा आणि स्वतःला सुधारत नेणं यांचीच परीक्षा आहे.
UPSC ची मुलाखत हा त्यांच्या करिअरमधील अविस्मरणीय टप्पा होता असे त्यांनी सांगितले. त्यावेळी इंग्रजी अजूनही परिपूर्णपणे येत नव्हती, पण आत्मविश्वास प्रखर होता. ते मुलाखतीतील काही क्षण सांगताना ठामपणे म्हणतात की, 'अधिकाऱ्यांनी माझ्या इंग्रजीकडे नाही, माझ्या प्रामाणिकपणाकडे आणि स्पष्टतेकडे पाहिलं.' हा अनुभवच त्यांना पुढे विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रेरणादायी संदेश देतो की, 'भाषा नाही, विचारांची ताकद महत्त्वाची असते.' डॉ. शिंदे सांगतात की जीवनात येणाऱ्या अडचणी म्हणजे दंड नाहीत; त्या आपल्याला अधिक सक्षम, स्थिर आणि आत्मविश्वासी बनवतात. त्यांच्या शब्दांत असे की, 'देव एक घेतो, पण त्याच्या बदल्यात मोठे काही देतो.' जिथे अनेक विद्यार्थी काही महिन्यांत किंवा एका प्रयत्नात UPSC चं यश अपेक्षित करतात, तिथे ते स्पष्ट सांगतात की, खरी उंच भरारी पक्क्या पायावरच मिळते. अभ्यास, अनुभव, सातत्य आणि ध्येयाशी निष्ठा हेच त्यांच्या यशाचे चार स्तंभ आहेत.
डॉ. शिंदे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची इच्छा नेहमीच मनात होती. त्यांच्या मते, जर ध्येय आंतरराष्ट्रीय असलं तर व्यक्तिमत्त्व, विश्वासार्हता, कामातील तज्ज्ञता यांचा दर्जा अत्यंत उच्च असावा लागतो. कारण त्या पातळीवर तुम्ही केवळ स्वतःचे प्रतिनिधी नसता तर तुम्ही एका राष्ट्राचा आवाज असता.
त्यांच्या या संपूर्ण प्रवासाविषयी अनुभव सांगत असताना विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक संदेशही त्यांनी दिला. तो असा की, स्वतःला सतत अपडेट ठेवा, ध्येय स्पष्ट ठेवा, Short-term विचारांपासून दूर रहा, आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज स्वतःशी बोला, अडचणींना घाबरण्यापेक्षा त्यांचा उपयोग घडण्यासाठी करा तसेच सराव आणि सातत्य हेच यशाचे एकमेव शॉर्टकट आहेत. त्यांच्या मते, 'मोठं स्वप्न बाळगाः आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला मोठं बनवा.'
IRPS अधिकारी डॉ. तुषाबा शिंदे यांचा जीवनप्रवास हा संघर्षातील अंधार फोडून आत्मविश्वासाचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रवास आहे. सामान्य परिस्थितीतून आलेला युवक, इंग्रजीची अडचण, आर्थिक मर्यादा, शिक्षणातील ताण पण या सर्वांवर मात करत आज ते राष्ट्रासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या मार्गदर्शनातून आम्हाला एक गोष्ट जाणवली ती अशी, 'अडथळे हे तुम्हाला थांबवण्यासाठी नसतात; तर ते तुम्हाला उंच झेपेसाठी तयार करण्यासाठी असतात'. IRPS अधिकारी मा. डॉ. तुषाबा शिंदे यांच्याशी साधलेला संवाद नक्कीच तरुणवर्गाला प्रेरणादायी राहणार आहे.
पुनःश्व करिअर कट्टाचे आभार.
धन्यवाद !

 

शब्दांकन
कु. पर्जन्या अंजुटगी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे