'महाराष्ट्राची माती ज्यांना घडवते, त्यांच्यात कामाची निष्ठा आणि सेवाभाव आपोआप येतो,' मा. सुशील गायकवाड सर हे त्याचेच जिवंत उदाहरण असून, महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे निवासी आयुक्त (गुंतवणूक) म्हणून त्यांची नियुक्ती राज्याच्या अभिमानात भर घालणारी आहे.
महाराष्ट्रातील युवकांचा सर्वांगीण विकास हे ध्येय नजरेसमोर ठेवून महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि पाहता पाहता आज महाराष्ट्रातील युवकांना दिल्लीत नेतृत्व गाजविण्याची संधी या उपक्रमांतर्गत प्राप्त झाली आहे. 'नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत आजच्या या भागात आपण आदरणीय सुशील गायकवाड सर यांचा जीवनप्रवास आणि प्रशासकीय सेवेतील त्यांची उत्कृष्ट कार्यप्रणाली याची ओळख मुलाखतीतून करून घेणार आहोत.
त्यांच्या मुलाखतीची सुरुवात 'पुढचे पाऊल' या प्रतिष्ठित संस्थेच्या माहितीने करण्यात आली. महाराष्ट्रातील युवकांना स्पर्धा परीक्षेबाबत दिल्ली येथे पुढचे पाऊल या प्रतिष्ठित संस्थेद्वारे यथोचित मार्गदर्शन दिले जाते आणि या उपक्रमाची सुरुवात २०१४ साली मा. ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उद्देश हाच होता की संपूर्ण दिल्लीतील महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना एकत्र जुळवून 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या म्हणीप्रमाणे या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील युवकांचा कल या दिशेने वाढविणे आणि सोबतच आपली संस्कृती दिल्लीपर्यंत पोहोचविणे हा असून, आज रोजी या प्रयत्नांना यशसुद्धा मिळत आहे.
मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातील. बारावीपर्यंतचे शिक्षण हे सोलापुरात झाले, त्यानंतर माझे MBBS चे स्वप्न पण होते, परंतु दुर्दैवाने २ ते ३ टक्क्यांनी मी मेडिकलची परीक्षा पास झालो नाही आणि येथे माझ्या या स्वप्नाला स्थगिती आली. सोबतच, माझा प्लॅन बी सुद्धा होता की इकडे आपले झाले नाही तर पुण्यात जाऊन आपलं पदवी शिक्षण करावं. पहिल्या स्वप्नाला पूर्णविराम मिळताच पुण्यात कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. कॉलेजला शिकत असताना स्पर्धा परीक्षेचे असणारे वातावरण अवती-भवती होतेच. सोबतच, आमचे बंधू UPSC पास झालेले होते तर त्यांनीसुद्धा याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यामुळे या क्षेत्रात पाऊल टाकले. 'स्टेट इन्स्टिट्यूट फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स' (SIAC) ही महाराष्ट्र शासनाची स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्था आहे. याचे मुख्यालय मुंबईत असून UPSC, MPSC आणि इतर प्रशासकीय स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पुरवते. SIAC मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य, मार्गदर्शन, मॉक टेस्ट्स आणि निवासाच्या सोयीसह संपूर्ण तयारीची सुविधा दिली जाते. येथे फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीच नाही, तर विद्यार्थ्यांना उत्तम विचारसरणी, वेळेचे व्यवस्थापन, उत्तरलेखन कौशल्य आणि प्रशासकीय ज्ञान मिळावे, यावर भर दिला जातो. SIAC चा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे नाही, तर भविष्यात महाराष्ट्र आणि देशासाठी सक्षम, जबाबदार आणि प्रेरणादायी अधिकारी तयार करणे हा आहे. या संस्थेद्वारे तुम्ही आपल्या भविष्याला दिशा देऊ शकता. या संस्थेची प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश घेतला आणि येथील नियम म्हणजे प्रथम प्रयत्नात जर का प्रिलिम्स नाही निघाली तर सोडून द्यावं लागेल आणि तशीच माझी प्रिलिम्स प्रथम प्रयत्नात निघाली नाही आणि नंतरच्या प्रयत्नात प्रिलिम्स निघाली परंतु काही कारणास्तव मेन्स निघाली नाही. मात्र तृतीय प्रयत्नात मी ही परीक्षा पास झालो. त्यावेळी माझी रैंक १८२ होती. भारतीय रेल्वे ट्रॅफिक सेवा (IRTS) या विभागात १९९८ साली अधिकारी म्हणून रुजू झालो. तसे पाहता माझा CV हा खूप भारदस्त नव्हता कारण १० वी आणि बारावीत जेमतेम मार्क्स होते आणि पदवी शिक्षण हे second क्लास मध्ये पूर्ण झाले होते. परंतु, एक ठाम निर्णय स्वतःशी असावा लागतो की मला हे करायचंच आहे आणि वाटेत काही मार्गदर्शक लाभल्यास UPSC चा प्रवास शक्य आहे. UPSC परीक्षेची तयारी करीत असताना पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात ज्या काही चुका झाल्या त्यावर काम केले आणि अभ्यासाची रणनीती बदलली आणि परिणाम म्हणजेच तिसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त झाले.
UPSC ची तयारी करीत असताना Financial अडचण प्रत्येकाला जाणवतेच, परंतु माझ्या स्वाभिमानाला या काळात ठेच लागत होती ती या कारणामुळे की पदवी शिक्षणानंतर सुद्धा आपल्याला आपल्या कुटुंबाकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. माझे बंधू आणि मित्रमंडळी नोकरीवर असल्यामुळे त्यांच्याकडून मला या काळात भरपूर आर्थिक मदत झाली. SIAC ला असताना माझ्या सोबतची मुलं कोटामधून शिक्षित आणि पदवीत गोल्ड मेडलिस्ट होते. अशावेळी, मी साधा पदवी सेकंड क्लास मध्ये पास होणारा, तरीही माझे ठरले होते की ४ प्रशत्नातसुद्धा आपण UPSC पास झालो नाही तर मात्र आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आणि या स्पर्धेत पाऊल टाकणाऱ्या प्रत्येकाने हा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जर ७ च्या वर Attempt आपल्याला लागत असतील तर आपण तणावात जातोच सोबतच आपलं कुटुंबसुद्धा विखुरले जाते. त्यामुळे आपल्याला IAS व्हायचे होते. आता हा छोटा व्यवसाय निवडणे किंवा नोकरी करणे स्वाभिमानाला ठेच पोहोचवीत जरी असेल तरी आपण त्याला सामोरे जाणे गरजेचे असते. आज रोजीचे चित्र पाहता महाराष्ट्रातील १०% विद्यार्थी या स्पर्धेत टिकत आहेत आणि ही आनंदाची बाब आहे.
या काळात रेल्वे व्यतिरिक्त सैन्याशी संबंधित लॉजिस्टिक म्हणजे अत्यंत संवेदनशील क्षेत्र; यात सैनिक, उपकरणं, दारुगोळा, इतर साहित्य - योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि पूर्ण गोपनीयतेने पोहचणं महत्त्वाचं असतं. रेल्वेची क्षमता, वेळापत्रक, सुरक्षा आणि गोपनीयता यांचा समन्वय साधून आर्मीला जास्तीत जास्त समर्थन देणं हे आमचं काम होतं. अशा वेळी एका छोट्या निर्णयाचा परिणाम हजारो सैनिकांच्या कामावर होऊ शकतो, म्हणून जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र असते.
लहानपणी आमच्या सोलापुरात 'देवाची गाडी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गाड्या पाहिल्यात आणि आता त्याच भागात आधुनिक गाड्या धावताना बघताना अत्यंत आनंद होत आहे. लहानपणी बार्शी-पंढरपूर परिसरात मिटरगेजवर चालणाऱ्या, थोड्या संथ पण भावनिक नातं जोडणाऱ्या गाड्या आम्हाला 'देवाची गाडी' म्हणून ओळखीच्या होत्या. वारीच्या काळात त्या गाड्यांतून जाणारी भक्तांची गर्दी, गाणं, कीर्तन, प्रसाद हा सगळा अनुभव अनोखा होता. आता त्याच मार्गावर ब्रॉडगेज, जास्त वेग, जास्त क्षमतेच्या गाड्या, सुधारलेली स्टेशनची इमारत, डिजिटल बोर्डस्, स्वच्छ प्लॅट फॉर्म या सगळ्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रचंड सुधारणा झालेली आहे, पण त्या जुन्या आठवणीही तितक्याच जिवंत आहेत. प्रशासकीय कामाबरोबरच साहित्य, कला आणि छंद जोपासल्यास संवेदनशीलता वाढते. मला लिखाण, ट्रॅव्हलिंग आणि फोटोग्राफीची आवड आहे. यामुळे विचारांची व्यापकता आणि दूरदृष्टी विकसित होते.
माझी रेल्वे विभागात सर्वप्रथम पोस्टिंग बंगलोर येथे झाली होती. त्यानंतर मी तामिळनाडू, चेन्नई, महाराष्ट्र येथे काम केले आणि दिल्ली येथे १० वर्षांपासून कार्यरत आहे. विविध ठिकाणी काम केल्याचा फायदा असा झाला की, तेथील विकास आणि नवीन तंत्रज्ञान सोबतच कार्यपद्धती यांचा अवलंब आपल्या देशात कसा करता येईल याकडे माझा जास्तीत जास्त भर असतो. तंत्रज्ञान विकसित होत असताना AI टेक्नॉलाजीचा मानवजातीला कितपत तोटा होणार यावर विचार न करता स्वतःला त्याप्रमाणे विकसित करणे गरजेचे आहे.
सरतेशेवटी, महाराष्ट्रातील तरुणांना एकच सल्ला देईल की, अब दिल्ली दूर नहीं..! सरकारी, खाजगी सर्वच क्षेत्रात नोकरीच्या प्रचंड संधी आहेत. पण त्याकरिता आपला करिअर ग्राफ अतिशय महत्वाचा असतो. सर्वात महत्वाचं आहे, कोणत्याही क्षेत्रात उतरल्यानंतर त्यात असणारी आपली आवड. कोणी Motivate केल्यांनतर होणारा प्रभाव हा तात्पुरत्या प्रकारचा असतो, परंतु आवड यश गाठेपर्यंत साथ सोडत नाही.
'जबाबदारी ही भार नसते, योग्य हातात गेली तर तीच परिवर्तनाची शक्ती बनते याचे जिवंत उदाहरण म्हणजे मा. सुशील
गायकवाड सर.
सोलापूरपासून दिल्ली पर्यंतचा आपला प्रवास प्रेरणादायी आहे आणि उत्तम मार्गदर्शक स्रोत सुद्धा आहे.
आपल्या अमूल्य वेळाबद्दल करिअर कट्टाकडून खूप खूप आभार.
धन्यवाद !
शब्दांकन
प्रा. ममता पळसपगार
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुररेल्वे