डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (DAIC) थोडक्यात माहिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (DAIC), जनपथ, नवी दिल्ली हे भारत सरकारद्वारे स्थापन केलेले राष्ट्रीय दर्जाचे संशोधन, अध्ययन आणि जनजागृती केंद्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समता, शिक्षण, संविधान, अर्थशास्त्र आणि मानवाधिकार विषयक विचारांचा प्रसार, संवर्धन आणि अभ्यास करण्यासाठी हे केंद्र कार्य करते. येथे आधुनिक सुविधांनी सज्ज लायब्ररी, संशोधन विभाग, कॉन्फरन्स हॉल, ऑडिटोरियम आणि विविध शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी, धोरण अभ्यासासाठी आणि आंबेडकरी विचारप्रवाह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी DAIC महत्त्वाची भूमिका बजावते.
आकाश पाटील सर हे शांत, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. प्रशासकीय कौशल्य, उत्कृष्ट संघटनशैली आणि प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि राष्ट्रनिर्मितीविषयक कार्याबद्दल त्यांच्यात खोल संवेदनशीलता आहे. ते संवाद्कुशल असून आधुनिक सामाजिक प्रश्नांना आंबेडकरी विचारांशी जोडून युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची त्यांची शैली प्रेरणादायी मानली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवताना त्यांचे व्यवहारज्ञान, विनम्रता, कार्यतत्परता आणि समाजासाठी सकारात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे जाणवतो. करिअर कट्टा उपक्रमांतर्गत 'नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र' या नाविन्यपूर्ण संवादशृखंलेंतर्गत मा. आकाश पाटील सर यांच्याशी साधलेला संवाद शब्दरूपात मांडत आहोत.
माझं १ ली ते १० वी पर्यंतचं शिक्षण जळगावमध्ये झालं. त्या काळात मी रोज सायकलने शाळेत जात असताना, आज ज्या ठिकाणी आकाशवाणी केंद्र आहे, त्या ठिकाणाला पूर्वी सर सेनापती वैद्य चौक म्हणून ओळखलं जायचं. त्या नावामागचं कारण काय असेल, याची मला नेहमीच उत्सुकता वाटायची. हळूहळू याच उत्सुकतेतून आर्मीबद्दल जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली आणि त्या वर्दीबद्दल एक वेगळंच आकर्षण वाटू लागलं. सुरुवातीला हे आकर्षणच जास्त होतं त्याबाबत सखोल माहिती, मार्गदर्शन किंवा दिशा फारशी माहीत नव्हती. असंच एकदा वडिलांनी आणलेली एक छोटीशी जाहिरात माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. त्यात दहावी नंतर औरंगाबाद येथे एक सैनिकी पूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था असल्याचं दिलं होतं. ती जाहिरात वाचल्यानंतर मनात आलं "चल, एकदा प्रयत्न करून पाहू या!" मी प्रवेश परीक्षा दिली आणि या प्रशिक्षण संस्थेसाठी माझी निवडही झाली. तिथे गेल्यानंतरच मला पहिल्यांदा कळलं की NDA नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी असं एक राष्ट्रीय दर्जाचं संस्थान आहे.
निर्णयक्षमता आयुष्यात खूप महत्त्वाची असते. कोणताही ताण, परिस्थिती किंवा अडचण आली तरी स्वतःचा निर्णय ठाम ठेवणे आवश्यक आहे. निर्णय घेतल्यानंतरच आपण त्याचा विचार करू शकतो, आपला निर्णय योग्य होता की चूक. आमच्या क्षेत्रात असे प्रशिक्षण नेहमीच दिले जाते, आणि NDA, IMA व सर्व्हिस ट्रेनिंगमुळे माझी निर्णयक्षमता आता कधीच डगमगत नाही. जर तुमच्याकडे व्यावसायिक ज्ञान असेल आणि लक्ष योग्य दिशेने केंद्रित असेल तर निर्णय चुकीचा ठरत नाही. आमच्या NDA च्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये राहायचे "When in doubt, take the harder right than the easier wrong", म्हणजेच, शंका आली तर सोपा नाही, तर योग्य आणि कठीण निर्णय घ्यावा. निर्णय घेण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा आपल्या मनात शंका असते. उदाहरण द्यायचे झाले तर, आज मला आंबेडकर सेंटरला जायचे आहे. मनात शंका येते की फॉर्मल कपडे घालू का नाही? तर इथे योग्य निर्णय म्हणजे आज संविधान दिवस असल्याने फॉर्मलच घालायचे. हा निर्णय चुकीचा ठरणारच नाही.
आपण कोणत्याही स्पर्धेत उतरायचे असल्यास किमान पदवीचे किंवा त्यापुढील शिक्षण ही आवश्यक अट असते. तसेच इतर अनेक ठिकाणीही शिक्षणाला महत्त्व दिले जाते, म्हणून शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण त्याचबरोबर सर्वांगीण विकास आजच्या स्पर्धेच्या युगात तितकाच महत्त्वाचा आहे. आपण खेळात सहभाग घेतला पाहिजे, आपली संवादकौशल्ये चांगली असायला हवीत. कारण, गुणपत्रिकेत ९९ टक्के मिळाले तरीही जर एखाद्या टीमचे नेतृत्व करता येत नसेल किंवा लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलता येत नसेल, तर त्या गुणांचे महत्त्व कमी होते. स्वतःच्या उणिवा ओळखता येणे आणि त्यावर काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणासोबत सर्वांगीण विकास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय महत्त्वाचे आहे.
देशभक्ती फक्त सैन्यातच मर्यादित नाही. जेव्हा देशाची सुरक्षा आपल्या समोर येते तेव्हा ती एकतेतूनच साध्य होते. प्रत्येक क्षेत्र देशभक्ती आहे, सैन्य असू द्या, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस असू द्या, व्यावसायिक, खेळाडू, शेतकरी, वैज्ञानिक किंवा विद्यार्थी आपण सर्व देशभक्त आहोत. आपण विकसित देशाचे स्वप्न पाहत आहोत आणि हे तेव्हाच साध्य होणार जेव्हा आपण सर्व मिळून एकत्र येऊन काम करू, देशभक्ती दाखवण्याची गरज नाही; ती लहानपणापासूनच आपल्या संस्कारांमध्ये रुजलेली आहे. शिक्षणातूनही ही मूल्ये आपल्यात नैसर्गिकरित्या विकसित झाली आहेत. आपण कोणतेही काम करत असू, त्यात आपल्या राष्ट्राची जाणीव ही आपली प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे, आणि ही भावना आपल्यात आपोआप तयार होत जाते.
स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात विद्यार्थी उतरतात तेव्हाच योग्य पूर्वतयारी करून, ठोस रणनीतीनुसार अभ्यासाला सामोरे जाणे आवश्यक असते. कमी वेळात जास्तीत जास्त संकल्पना स्पष्ट कशा करता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण येथे कोणत्याही कारणांना किंवा सबबींना जागा नसते. अन्यथा हळूहळू तुम्ही या स्पर्धेतून बाहेर पडू लागता. परीक्षेला गेल्यानंतर १५० प्रश्नांपैकी शेवटच्या क्षणाला वेळ कमी असल्यामुळे ५० सोडवले होते म्हणून निकाल आला नाही किंवा "मला जमत होतं, पण वेळ पुरला नाही" असे म्हणणे ही तयारी नसते आणि अशा सबबींना काहीही अर्थ राहत नाही. खरी तयारी म्हणजे वेळेचं योग्य नियोजन, सततचा सराव आणि मागील प्रश्नपत्रिकांचे अचूक आकलन. ह्याच गोष्टी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ठरतात. महाराष्ट्रातील अनेकांना "दिल्ली" म्हटले की तिथे जाण्याबाबत संकोच वाटतो. परंतु माझ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, संधींचे खरे केंद्र म्हणजे दिल्ली. 'भरलेला ग्लास अर्धा दिसतो की पूर्ण' हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. जर आपण दिल्लीतील फक्त नकारात्मक बाबींवरच लक्ष केंद्रित केले, तर आपले मनही त्याच प्रकारे प्रतिक्रिया देत राहते. एक विद्यार्थी, शिक्षक किंवा व्यावसायिक म्हणून दिल्लीमध्ये येत असाल, तर येथे प्रगतीसाठी विपुल संधी उपलब्ध आहेत. या शहरात स्वतःला जुळवून घेणे हा वैयक्तिक प्रक्रियेचा भाग असून, त्यासाठी काही वेळ लागत असला तरी ते नक्कीच शक्य आहे. योग्य दृष्टिकोन, तयारी आणि अनुकूलता असेल तर दिल्लीसारखे शहर तुम्हाला वाढ, अनुभव आणि संधी तिन्ही गोष्टी भरभरून देते.
संकल्प से सिद्धी या उक्तीप्रमाणे आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर (DAIC) आणि डॉ. आंबेडकर नॅशनल मेमोरियल सेंटर ही भारत सरकारद्वारे स्थापन केलेली दोन महत्त्वाची केंद्रे आहेत, ज्यांचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक पातळीवर प्रसार करणे, त्यांचे संशोधन, लेखन, संविधान निर्मितीतील योगदान आणि सामाजिक न्यायावरील तत्त्वांचा अभ्यास करणे हा आहे. DAIC हे एक संशोधनकेंद्र, थिंक टैंक आणि शैक्षणिक मंच आहे ज्यामध्ये लायब्ररी, डिजिटल संसाधने आणि धोरण-अभ्यासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, तर नॅशनल मेमोरियल सेंटर हे त्यांच्या जीवनकार्याचे स्मरणरूप प्रेरणास्थान म्हणून उभारले गेले असून तेथे प्रदर्शने, दस्तऐवजीकरण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.
आकाश पाटील सर DAIC चे संचालक म्हणून या दोन्ही केंद्रांच्या कार्याला गतिमान नेतृत्व देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प, संविधानविषयक परिसंवाद, प्रकाशनकार्य, युवकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, सामाजिक न्यायाविषयी व्याख्याने आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सहयोग वाढविण्याचे उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे DAIC है केवळ स्मारक किंवा अध्ययन केंद्र न राहता सामाजिक बदल आणि विचारप्रबोधनासाठी सक्रिय मंच म्हणून उभे राहत आहे.
करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आपल्यासोबत अतिशय सकारात्मकरीत्या घडून आलेला हा संवाद आणि अनुभव कायम मनावर बिंबणारा आहे.
आपले मनःपूर्वक आभार.
शब्दांकन
प्रा. ममता पळसपगार
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुररेल्वे