Author
निमंत्रित संपादक
मा. श्री. ज्ञानेश्वर मुळे
माजी परराष्ट्र सचिव, सल्लागार, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा संवादः मा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे 
स्वतः सह जगावरील श्रद्धा, त्यातून येणारी सकारात्मकता आणि राष्ट्र उभारणीचा ध्यास यामुळे जगभरात काम केलेले सनदी अधिकारी म्हणजे मा. ज्ञानेश्वर मुळे. ज्यांना स्वतःच्या जीवनाचा अर्थ आणि त्यातली सार्थकता समजली त्याआधारे माणूस कोणत्याही परिस्थितीत आपल्या पंखाच्या बळावर आकाशात भरारी घेऊ शकतो, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. या साऱ्यांचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून घडत असतं. साहित्यिक व कविमनाचा सनदी अधिकारी म्हणून कार्य केलेल्या ज्ञानेश्वर मुळे यांना आपल्या संस्कृतीचे भान आहे. आपल्या मातीच्या व जनतेच्या भाषेत बोलणारा प्रशासक असण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. लोककल्याणाच्या विचारांनी नकारशाहीला होकारशाहीची दिशा त्यांनी दिली आहे. जगावर व भारतीय प्रशासनावर केवळ उच्चभ्रूसाठी इंग्रजी पुस्तके लिहिली जात असताना, ज्ञानेश्वर मुळे यांनी ती मातृ‌भाषेत लिहून लोकप्रिय केली आहेत. 'माती, पंख आणि आकाश', 'सायलेंट केऑस', 'अँड दी जिप्सी', पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया 'शांती की अफवाय', 'सकाळ जी होत नाही', 'श्री राधा' ही मुळे यांनी लिहिलेली पुस्तके आहेत.
परदेशात शिष्टाई व राजनैतिक काम करताना छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर महात्मा जोतिबा फुले व लोकहितवादींचे विचार त्यांना प्रेरक ठरले. जगभरात कामाच्या निमित्ताने जिथे होते तिथे राष्ट्रप्रमुखांबरोबर आणि सामान्य माणसांशीही थेट जोडताना राजदूतापेक्षा 'जनदूत' होता आलं असं म्हणणारे, देश विदेशात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट असा ठसा उमटवणारे सन्माननीय डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व पुढचे पाऊल यांच्यावतीने करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमांतर्गत 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या विद्यार्थी संवाद शृंखलेच्या शुभारंभाप्रसंगी स्वागतोत्सुक म्हणून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर भाष्य करीत, संवाद साधत असताना, सन्माननीय डॉ. ज्ञानेश्वर मुळे सर म्हणाले की, विद्यार्थी मित्रहो, आपल्या प्रत्येकाची स्वप्नं ही वेगवेगळी असतात कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर तर कोणाला प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायचं असतं. या संदर्भात माझं उदाहरण सांगायचं झालं तर मला अगदी लहानपणीपासूनच कंडक्टर व्हायचे होते, माझी अदम्य अशी इच्छा होती. त्यामागचं कारण असं की, आपल्याला छान प्रवास करायला मिळतो आणि त्याचे आपल्याला मानधनही मिळत. आता याच्या अगदी उलट माझ्या पत्नीला तिने सांगितल्याप्रमाणे, तिला एअर होस्टेस व्हायचे होते. ती चांगल्या मोठ्या शहरात लहानाची मोठी झालेली, इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं अस सगळ तिच्याबाबतीत होतं. आता गंमत बघा, आमची जर्नी पॅरलल आहे. इच्छा, आकांक्षा त्याच आहेत पण स्वप्नं कशी वेगवेगळी होतात. सांगायचा मुद्दा असा की, आपण जिथे राहतो तिथला परिसर, आपल्या आजुबाजूची लोकं, आपलं शिक्षण हे सगळच खूप महत्वाच असत आणि त्या त्या परिसरानुसार, समाजानुसार आपल्याला मिळालेल्या शिक्षणानुसार आपली स्वप्नं ही लहान-मोठी असू शकतात. आपली पार्श्वभूमी, आपले प्रभाव, आई वडील, आपले गुरुजन, मित्रमैत्रिणी हे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे आपली सगळ्यांची स्वप्नं ही जरी वेगवेगळी असली तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठीच धैर्य, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास हा कमी-जास्ती प्रमाणात आपल्यात असतोच. माझं स्वप्न काय आहे? मला काय व्हायचं आहे? हे कधी ठरवायला हवे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

तेव्हाही आणि आजही आपली स्वप्नं पूर्ण करायला पूर्वीच्या काळात गाव सोडून शहरात लोकं यायचे, आता शहरातून मोठ्या शहरात यायला लागले आणि मोठ्या शहरातून सगळ्या जगभर पसरायला लागले. आता हा ट्रेंड झालेला आहे. आज आपली मुलं विदेशात जाऊन शिकावीत, नोकरी करावीत म्हणून आपण धडपडत असतो. प्रत्येक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आई-वडिलांची इच्छा हीच असते की, त्यांचा मुलगा किंवा मुलगी परदेशात जावी, तिथे नोकरी करावी, तिथे सेटल व्हावे किंवा तस जर नाही झालं तर मुलांकडून आयएएस व्हावे, त्यांनी प्रशासकीय सेवेत जावे अशी इच्छा बाळगली जाते. आई-वडिलांचे स्वप्नं मुलांवर लादले जातात. पण आपण हे विसरून जातो की, आपल्याला मेक्यांच्या कळपाप्रमाणे एकापाठोपाठ एक असं जायचं नाही आहे. आपण अनेकदा समूहाच्या मागे धावतो. सगळे आयएएस होतात तर मीही होतो ही मानसिकता बदलायला हवी. आपल्या जगात ७०० कोटी लोकसंख्या असूनही एकही चेहरा दुसऱ्यासारखा नाही मग करिअर, जीवनमार्ग वेगळं असलं पाहिजे, आपल्यात इतरांपेक्षा वेगळेपण काय आहे? आपल्यातली बलस्थाने काय आहे? हे ओळखणं ही खरी यशाची सुरुवात आहे. बरेच लोक सांगतात की, स्पर्धा परीक्षेचा मार्ग अवघड आहे. यशप्राप्तीच्या शक्यता कमी असतात. मुळात प्रशासकीय सेवेत रुजू झालं म्हणजेच आपल्या हातून देशसेवा घडू शकते असा विचार करण्यापेक्षा आपण रेल्वे, पोलीस, विज्ञान, शैक्षणिक या कुठल्याही क्षेत्रात कार्य करीत असू तर ती ही एक प्रकारे देशसेवाच असते, हे समजण्याची आवश्यकता आहे.
यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळालं तर उत्तमच आहे परंतु समजा निराशा पदरी पडली तर; दुसरा मार्ग निवडून लगेचच त्या दिशेने वाटचाल करायची. तुम्हा विद्यार्थ्यांना मोटिवेशन करणाऱ्या काही लोकांनी मिसगाईड केलेलं असतं, ते काय म्हणतात तर, कोणीही आयएएस होऊ शकत. भाजीपाला विकणाऱ्याची मुलगी IAS झाली, रिक्षावाल्याची मुलगी झाली IAS, मेकॅनिकचा मुलगा झाला IAS. प्रत्यक्षात बघायला गेलं तर कोणी इंडियन रेल्वे सर्विसमध्ये नोकरी मिळवली असते तर कोणी ऑडिटर अकाउंटमध्ये सिलेक्ट होतात पण बातमी येथे आहे IAS झाल्याची त्यामुळे या प्रशासकीय सेवेत येण्याचं आकर्षण नको आहे तर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी, तुम्हाला जे व्हायचं आहे ते होण्यासाठी तुम्ही स्वतःवरती आणि स्वतःच्या आनंदावरती, स्वतःच्या जीवनावरती वेळ आणि पैसे योग्य दिशेने खर्च केले तर तुमच्यापैकीच कोणी चांगलं शेतीतज्ज्ञ होऊ शकतं, काही उत्तम लेखक ज्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकेल, काही शास्त्रज्ञ होऊ शकतील. आज इस्रोकडे आपण या देशातल्या सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून पाहतो पण बाकीच्या विज्ञानाच्या ज्या शाखा आहेत तिथे सुद्धा मूलभूत संशोधक व्हायला हवे. आज काळाची गरज तुम्ही लक्षात घ्यायला हवी.
चरेचदा हे सगळ करीत असताना अती आत्मविश्वासाने, अती उत्साहाने आपले निर्णय चुकतात, चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होत. पण विद्यार्थी मित्रहो, यशाच्या दिशेने पाऊल टाकताना या प्रवासात भ्रमनिरास होणे हेही कधीकधी आवश्यक असतं. कारण त्यातूनच आपल्याला खरी दिशा गवसत असते, असं माझं मत आहे. प्रत्येक क्षेत्रातील मनुष्यबळाचा अभाव किती आहे, हे लक्षात घेता आपण मुख्यत्वे संशोधनाच्या दिशेने विचार केला पाहिजे. तुम्ही सोशल मीडिया अकाउंट हाताळता फेसबुक, इंस्टाग्राम हे वापरता. आता हेच बघायचं की, यातल एकही अॅप्लिकेशन्स हे भारतात बनवले गेले नाही किंवा भारतीय संशोधकांनी बनवले नाही. सी. व्ही. रमण नंतर आपल्या देशात एकही नोबेल पुरस्कार विजेता शास्त्रज्ञ झालेले नाही. मुळात आपल्या देशात प्रतिभेला प्रचंड वाव आहे. काकोडकर, जयंत नारळीकर, बोस यांनी आपापल्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण जगासमोर दाखवून दिले ते त्यांच्याकडे असलेल्या प्रतिभेच्या जोरावर.
आज आपल्याला शिक्षणतज्ज्ञांची गरज आहे. जे. पी. नाईकानंतर त्या उंचीचे शिक्षण तज्ज्ञ झालेले नाही. आपला पॅटर्न आपणच तयार केला पाहिजे. जीडीपी वाढली तरी दरडोई उत्पन्न वाढवल्यास विषमता संपणार नाही म्हणूनच उद्योजक, शास्त्रज्ञ, शिक्षक, एनजीओ कार्यकर्ते या सगळ्यांची येत्या काळात गरज आहे. मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की, आज सरकार स्टार्टअपच्या माध्यमातून खेलो इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया असे अनेकविध उपक्रम राबवत आहे. आपले काही विद्यार्थी मित्र-मैत्रिणी ग्रामीण भागात असले तरी, कृषी उत्पादक संघटना, बचत गट अशा विविध माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या आपल्याला या योजनांचा लाभ घेता येतो, मार्गदर्शन मिळवता येतं.
आपण बघतो की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये अनेक कौशल्य असतात. तुलनेने शहरी भागातील मुलांमध्ये याचा अभाव असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी आपल्याला काही येत नाही हा विचार डोक्यातून काढून टाकायचा उलटपक्षी शहरी भागातील मुलांपेक्षा आपण हुशार आहोत याचा अभिमान बाळगायचा, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नोकरी आणि व्यवसायाच्या संधी वाढणार आहेत. एकीकडे वृद्धांची संख्या वाढल्यामुळे नर्सिंग, हेल्थकेअर, हॉस्पिटल केअर या सगळ्या गोष्टींची मग फिजिओथेरपी असो किंवा लॅब असिस्टंट असो या सगळ्यांची प्रचंड गरज निर्माण होत आहे. प्रत्येक क्षेत्रात हजारो तरुणांची आवश्यकता आहे मग ते कारखाने, बांधकाम क्षेत्र किंवा शेतीचे क्षेत्र असू देत प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी आपली गरज नेमकी कुठे आहे, आपल आवडीच क्षेत्र काय आहे, आपण काय करू शकतो याचा प्रामुख्याने विचार करावा. प्रशासकीय सेवेत काम केल्यानेच आपल्या हातून देशसेवा घडू शकते अन्यथा नाही असा विचार करायचा नाही.
देशसेवा ही प्रत्येक क्षेत्रात आहे फक्त तुम्ही तुमचं वेगळेपण ओळखा, तुमच्या आवडीचा मार्ग निवडा, भरपूर परिश्रम करा, स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण करा. करिअर कट्टा सारखं उत्तम व्यासपीठ आणि मार्गदर्शक तुमच्यासोबत आहे याचा आपण निश्चितच लाभ घ्यावा.
आपल्या सगळ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..!

शब्दांकन
प्रा. सायली लाखे पिदळी
सदस्य, राज्यस्तरीय प्रकाशन संपादकीय समिती