करिअर कट्टाच्या मासिकाचे या महिन्याचे संपादकीय विशेष आहे.
'नजरेसमोर राष्ट्र.. हृदयात महाराष्ट्र..' या संकल्पनेंतर्गत दरवर्षी राज्यातील प्रत्येक विभागातून एक विद्यार्थी देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी करिअर कट्टाकडून निवडले जातात. नोव्हेंबर महिन्यामध्ये २५ ते ३० नोव्हेंबर हा या वर्षीचा या भेटीचा कालावधी होता. तरुणाईला समृद्ध करणारे अनुभव देणारा असा हा प्रवास असतो.
वेगवेगळ्या शासकीय पदावर आपले कर्तृत्व गाजवणारे मराठी अधिकारी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आवर्जून आपुलकीने वेळ देतात. विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये हाताळलेल्या वेगवेगळ्या वाटा, आलेले अनुभव याविषयी माहिती देतात आणि या अनुभवाच्या जोरावर विद्यार्थी स्वतःच्या करिअरची दिशा सहजपणे ठरवू शकतात. या उपक्रमाचा भाग म्हणून घेतलेल्या मुलाखतींचे शब्दांकन करून या मासिकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.
या मुलाखती राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ग्रंथालयाच्या माध्यमातून तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून देखील पोहोचवल्या जाणार आहेत.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी कोल्हापूरसारख्या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपलं नाव कमावलं. 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया' ही उपाधी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने मिळवली असे सर्व अधिकाऱ्यांसाठी सन्माननीय असणारे व्यक्तिमत्व या संवादशृंखलेच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून लाभले. याप्रसंगी बारा मुलांच्या स्वागतासाठी आठ ते नऊ उच्चपदस्थ अधिकारी मोठ्या मनाने उपस्थित राहिले, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याबरोबर स्नेहभोजन घेतलं आणि एक आश्वासक वातावरण मुलांच्यासाठी निर्माण केलं की, देशाची राजधानी दिल्लीमध्ये आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत. या सोहळ्यामध्ये सहभागी प्रत्येक अधिकाऱ्याचे मनःपूर्वक आभार !
निवासी आयुक्त गुंतवणूक म्हणून कार्यरत असणारे मा. सुशील गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य या उपक्रमाच्या महाराष्ट्र सदनामधील कार्यक्रमासाठी लाभले. सन्माननीय रेखा रायकर मॅडम, मा. सचित जाधव सर, मा. अमित गोळे सर, मा. चेतन शेलोटकर सर, मा. प्रफुल्ल पाठक सर, डॉ. तुषाबा शिंदे सर, मा. सुप्रिया देवस्थळी मॅडम या सर्वांनी उपस्थिती लावली. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या कार्यालयामध्ये बोलावून त्यांच्याशी संवाद साधला.
कोणतेही काम करताना त्यामध्ये येणारे अडथळे हे त्याच्या चांगल्या परिणामांचे द्योतक असतात. असे काही अडथळे या दिल्ली दौऱ्यादरम्यान आलेदेखील; पण म्हणतात ना शुध्द आणि निर्मळ मनाने केलेले कार्य निश्चितच सफल होते त्याचाच अनुभव या दौऱ्यात आला. महाराष्ट्रातील तरुणांसाठी सातत्याने संवेदनशील मनाने मदत करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना सहकार्याला पुन्हा एकदा सलाम करावासा वाटतो.
पोलीस स्मरण दिवसानिमित्त ३० नोव्हेंबर रोजी मोठ्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, सीआरपीएफ, बीएसएफ या पाच महत्त्वाच्या सैन्य दलातील २५० पेक्षा जास्त जवान आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या सायकल रॅलीच्या आयोजनामध्ये या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. आमच्या समन्वयक डॉ. योगिता चौधरी मॅडम ह्या स्वतः पोलीस कन्या आहेत. त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे या सर्व जवानांना राष्ट्रगीत आणि स्फूर्ती गीतासाठी कमांड देण्याची अभूतपूर्व संधी मिळाली. करिअर संसदेच्या या विद्याथ्यर्थ्यांनी जवानांच्या अनेक आठवणी जागवल्या. हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी पृथ्वी प्रदर्शना पायी घालणाऱ्या मा. विष्णू चापके यांनी अथक मेहनत घेतली होती. त्यांचा विशेष उल्लेख मला या संपादक लेखांमध्ये आवर्जून करावासा वाटतो.
कोकणामधून आलेल्या विद्यार्थिनींसाठी दिल्लीमध्ये पोलीस प्रशासनासाठीच्या व्यवस्थेमधल्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असणारे पोलीस निरीक्षक तावडे साहेब हेदेखील आवर्जून आले आणि संपूर्ण पोलीस नियोजन मुलांसाठी सविस्तर माहिती देता येईल अशी व्यवस्था केली. राष्ट्राच्या सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या सीआरपीएफ अॅकडमीमध्ये मा. डॉ. चेतन शेलोटकर सरांच्या माध्यमातून जाण्याची संधी मुलांना मिळाली. बारकाईनं तो संपूर्ण कॅम्पस बघता आला त्यातून त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. ही मुलं बारामतीच्या अधिवेशनामध्ये त्यांचे अनुभव मांडतील, बारामतीतल्या पंधराशे विद्यार्थ्यांच्यापर्यंत अनुभव जाईल. तिथून प्रेरणा घेतील आणि काही विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यासाठी मदत होईल असं वाटतं.
आज करिअर कट्टाच्या माध्यमातून हा अंक आपल्या हाती देत असताना १३ डिसेंबर रोजी नागपूर या ठिकाणी होणाऱ्या करिअर कट्ठाच्या पहिल्या स्टार्टअप समिटविषयी देखील आपल्याला सांगावसं वाटतं. नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी देणारे हात निर्माण व्हावेत, या उद्देशाने करिअर कट्टाच्या वतीने उद्योजकता विकासाच्या अनेक कार्यक्रम राबवले जातात. याचाच एक पुढचा टप्पा म्हणून विभागवार स्टार्टअप समिट घेण्यात येणार आहेत. त्यातली पहिली समिट सिटी बिंझाणी महाविद्यालय, नागपूर या ठिकाणी राज्याचे शिक्षण संचालक मा. शैलेंद्र देवळाणकर सर यांच्या शुभहस्ते सुरू होत आहे. यामध्ये गर्जे मराठी ग्लोबल या अमेरिकास्थित संस्थेचे अध्यक्ष मा. आनंद गाणू, नागपूर फर्स्ट या उपक्रमाचे प्रमुख तसेच इतर मान्यवर देखील सहभागी होणार आहेत.
या अंकामध्ये सहभागी मुलाखतीचे शब्दांकन विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषेमध्ये केलेलं आहे. काही संपादकीय मंडळातील सदस्यांनी केलेलं आहे आणि यातून काही त्रुटी राहू नयेत किंवा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला बघता यावेत यासाठी प्रत्येक मुलाखतीच्या सोबत त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा क्यू आर कोडदेखील देण्यात आलेला आहे तरी आपण या मासिकाच्या माध्यमातून या संपूर्ण व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या अनुभवांचा फायदा आपल्या करिअरसाठी होईल, यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला विचार किंवा आपली मत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांना शंभर टक्के पटलीच पाहिजेत, हा अट्टाहास करिअर कट्ठाचा मुळीच नाही पण मराठी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी चाललेल्या उपक्रमाला सहकार्य करून समृद्धतेच्या शिखरावर घेऊन जाणाऱ्या अनेक मान्यवरांच्या साथीने सुरू असणारा हा प्रवास आहे. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित धरतो. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना निश्चितच स्वागतार्ह असतील. त्याचा समावेश पुढच्या अंकामध्ये करण्याचे आश्वासन देतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र!