Author
उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टाकडून संपन्न झालेले उपक्रम
मा. डॉ. शरयू व. तायवाडे
प्राचार्या, तायवाडे कॉलेज महादुला कोराडी

युवा करिअरच्या दिशा दाखवणारी संसद बैठक मा. श्री. राजीव नंदकर यांचे मार्गदर्शन 
नागपूर जिल्हा करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांची सभा दिनांक ७ नोव्हेंबरला धनवटे कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. नागपूर विभागाच्या प्राचार्य प्रवर्तक डॉ. शरयू तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मा. यशवंत शितोळे सर व डॉ. सुजित मेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. राजीव नंदकर सरांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीचा उद्देश विद्यार्थ्यांना करीअरच्या विविध संधीबाबत मर्गदर्शन करणे आणि त्यांच्यात स्वावलंबन आणि नेतृत्वगुण रुजविणे हा होता. मा. राजीव नंदकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक, यशदा, पुणे) यांनी विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठीच नव्हे तर उद्योग, शेती आणि उद्योजक्तेतील करीअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले. सोबतच पुस्तके वाचा, त्यातील लोकांचे अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी समजून घ्या. पुस्तकातून अनेक लोकांना जवळून बघता येते, अनुभवता येते हेही त्यांना सांगितले. या कार्यक्रमाला १२० पेक्षा ज्यास्त पदाधिकारी उपस्थित होते.


करिअरच्या वाटा आणि सांस्कृतिक वारसा विश्लेषित करणारा दिल्ली दौरा नजरेसमोर राष्ट्र हृदयात महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत 'नजरेसमोर राष्ट्र.. हृदयात महाराष्ट्र..' या ब्रीदवाक्यसह विशेष संवाद शृंखला दिल्लीतील मराठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा दौरा दिनांक २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. सदर दौऱ्यासाठी महाराष्ट्रभरातील विविध महाविद्यालयातून करिअर कट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमधून गेल्या
वर्षभरापासून सर्व उपक्रमांमध्ये पुढाकार घेणारे, शिस्तप्रिय, नाविन्यपूर्ण विचार करणारे विद्यार्थी यांची ११ विभागातून निरीक्षण करून निवड करण्यात आली होती. त्यात नीलम शैलेंद्र पाटील (मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), पर्जन्या नील अंजूटकी (करिअर कट्टा, सोलापूर), वेदिका संतोष थोरात (विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, बारामती, पुणे), साक्षी प्रकाश सिट्टक (पुंडलिक आबाजी करले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, शिरगाव), शंतनू विलास चिंचाळकर (जिल्हा नियोजन समिती सदस्य, नागपूर), मिहीर गजानन भिडे (नूतन आदर्श कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, उमरेड), युगांश कनोज (शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर), भूमिका मंगेश जोशी (अ. र. भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी), सानिया सादिक शेख (राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालय, चांदूर रेल्वे), धनश्री राजेश मिश्रा (जी. एस. खामगाव कॉलेज बुलढाणा), माधवी रतन बोरसे (कला वाणिज्य व बीसीए महाविद्यालय, महिला महाविद्यालय, धुळे) व अनिशा अशोक सुरवसे (छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा, धाराशिव) या विद्यार्थ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती.
दिनांक २५/११/२०२५ रोजी सदर कार्यक्रमाचे उद्धघाटन सत्र महाराष्ट्र सदन दिल्ली येथे पार पडले. उद्धघाटन सत्रात दिल्लीतील विविध प्रशासकीय पदांवर असणारे मान्यवर उपस्थित होते. मा. श्री. ज्ञानेश्वर मुळे, माजी परराष्ट्र सचिव, सल्लागार, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. सरांच्या मुलाखतीनेच या कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च पदावर असलेले शासकीय अधिकारी, प्रशासनात काम करतांना असलेली कार्यपद्धती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी दिल्ली विशेष संवाद शृंखला दौरा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आला. या दौरामध्ये विद्यार्थ्यांनी केंद्रीय सेवेत कार्यरत विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, राष्ट्रीय स्मारके पाहिली आणि प्रशासकीय संस्थांना भेटी दिल्या. आपल्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या व्यक्तीची मुलाखत ही सगळ्यांच्या ज्ञान, कौशल्यात भर टाकणारी अशीच होती. त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या क्षेत्रात येण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांच्या आयुष्यातील संघर्षातून पदरी पडलेले यश, संकटाच्या वेळी घेतलेले निर्णय सगळ्या गोष्टीचे सुक्ष्म कंगोरे मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उलगडले. या सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्या गावापासून व्यक्तिमत्वाच्या नगरी पर्यंतचा केलेला यशस्वी प्रवास विद्यार्थ्यांच्या मनात घर करून गेला आणि हा दौरा विद्यार्थ्यांमधील कौशल्यपूर्ण आणि सर्जनशील जाणीव विकसित करणारा ठरला. या संपूर्ण उपक्रमाचा समारोप ३० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आला.
विद्याध्यर्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्या सगळ्या मुलाखती You Tube चॅनेलवर उपलब्ध आहेत. या उपक्रमातील विद्यार्थ्यांची कामगिरी विशेष स्वरूपाची होती.
सर्व विद्यार्थ्यांनी मुलाखतीचे शब्दांकन स्वतः केले. प्रत्येक मुलाखत YouTube वर अपलोड करण्यासाठी संपादित केली जात आहे. मुलाखतींमुळे विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती कौशल्य, प्रश्न विचारण्याची पद्धती आणि आत्मविश्वास या कौशल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास झाला. समारोप सत्रात विद्याथ्यर्थ्यांनी संवाद शृंखलेचा अनुभव मांडला. सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.


राज्यस्तरीय अधिवेशन बारामती ३ जानेवारी ते ७जानेवारी २०२६
करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक ३ ते ७ जानेवारी दरम्यान शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर बारामती येथे आयोजित करण्यात आले आहे. एकूण १००० सभासदांची नोंदणी या अधिवेशनासाठी झाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग मार्गदर्शन तत्वानुसार मान्यताप्राप्त Al Teacher हा प्राध्यापकांसाठी FDP सुद्धा घेतला जाणार आहे. तसेच या अधिवेशनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना अधिवेशनातील ३० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमाचे दोन क्रेडीटचे प्रमाणपत्रपण दिले जाणार आहे.