युवक हा राष्ट्राचा कणा आहे. आजच्या वेगवान व बदलत्या काळात यशस्वी जीवनासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही; तर शिस्त, कष्ट, सातत्य, चिकाटी, लवचिकता, संयम, नम्रता, निर्भयता, समर्पण, सकारात्मकता आणि प्रामाणिकपणा या अकरा गुणांचा स्वीकार आणि समन्वय आवश्यक आहे. हे गुण केवळ यश मिळवून देत नाहीत, तर आयुष्याला अर्थपूर्ण व समृद्ध करतात. प्रस्तुत लेखात या प्रत्येक गुणाचे महत्त्व सोप्या साध्या भाषेत स्पष्ट करून युवकांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले आहे. हे अकरा गुण अंगी बाळगल्यास प्रत्येक युवक आपले स्वप्न सत्यात उतरवू शकतो आणि यशस्वी-सार्थ जीवन जगू शकतो.
१. शिस्त
शिस्त म्हणजे काय, तर योग्य गोष्टी योग्य वेळी पार पाडणे होय. शिस्त स्वभावाचा भाग नसून ती एक उच्च दर्जाचे वर्तन दर्शवते. चांगले आणि उचित शिस्त व वर्तन तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवते. वर्तन हे तुम्ही अधिक शिस्तप्रिय असला तरच इतरांकडून स्वीकारले जाते. त्यामुळे वर्तनाला घडविण्यासाठी मानवी जीवनात शिस्त हा खूप महत्त्वाचा भाग आहे. युवा म्हणून या वयात जर शिस्त अंगी बाळगली, तर अनेक कामांना गती मिळते. युवकांचा जीवनप्रवास अधिक सोपा व सुलभ होतो.
२. कष्ट
कष्ट करण्याची हिम्मत अंगी असेल, तर कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. युवक जेवढे कष्ट व परिश्रम करतील, तेवढे यश त्यांच्या आवाक्यात येते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तरुण वयातील मौज-मजेवर पाणी सोडण्याचे धैर्य जे युवक दाखवतात, त्यांचा भविष्यकाळ उज्वल असतो. यश मिळवण्यासाठी कोणताही
शॉर्टकट नसतो, त्यासाठी फक्त कष्ट आणि परिश्रम करण्याची जिद्द युवकांनी ठेवावी लागते. कष्टाला प्रतिष्ठा लगेच प्राप्त होत नाही, याचा अर्थ युवकांनी निराश व्हावे असाही नाही. आपले कर्म म्हणजे कष्ट, त्याला प्राथमिकता दिली की फळ आपोआप पदरात पडते.
३. सातत्य
कष्ट आहेत, परंतु त्या कष्टशत सातत्य नसेल, तर कष्टातून अर्थपूर्ण यश मिळवता येत नाही. सातत्य म्हणजे काय? तर ठरविल्याप्रमाणे किंवा नियोजनप्रमाणे एक एक टप्पा गाठत राहणे. सातत्य हे लहान स्टेपसारखे असते. एक-एक स्टेप तुमचा खूप दूरवरचा टप्पा गाठून देते. युवक कष्ट घेतात, मात्र नियोजनबद्ध सातत्य राखत नसल्याने अपयशी होतात. स्पर्धा परीक्षा तयारी असेल, तर साधारण दोन ते तीन वर्षे सातत्यपूर्ण सहा ते आठ तास अभ्यास करावा लागतो. व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यात दोन ते तीन वर्षे तग धरावा लागतो. त्यामुळे चांगली सुरुवात आणि पहिले पाऊल हे यशाकडे युवकांना मार्गस्थ करते.
४. चिकाटी
युवक कष्ट घेत आहेत आणि त्यांच्यात सातत्य आहे. मात्र यशाकडे मार्गस्थ होत असताना अनेक अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष घटक विचलित करतात. विविध प्रलोभने दाखवली जातात. नकारात्मकता जाणीवपूर्वक पेरली जाते. चुकीची दिशा दाखवली जाते. या सर्व गोष्टी घडत असताना युवकांनी आपल्या ध्येये आणि उद्दिष्टे यांच्याशी चिकाटी ठेवून प्रामाणिक राहावे लागते, बऱ्याच वेळा कोणी कष्ट करून मोठा होतो का? ते तुला थोडेच शक्य आहे? तुझी ते करण्याची पात्रता नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र अंगी चिकाटी असलेला तरुण विचलित न होता आपल्या मार्गान कष्ट व सातत्य राखत चालत राहतो आणि यश संपादन करतो.
५. लवचिकता
लवचिकता ही आजच्या युगात अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे. सर्व काही सरळ धोपट मार्गाने होण्याचे दिवस संपले. जगात बदल हे गुणाकार पद्धतीने होत आहेत. पदोपदी समस्या व अडचणी युवकांच्या समोर उभ्या राहत असतात. मात्र भौतिक गोष्टींच्या मोहमायेला बळी न पडता युवकांना त्यांच्या वर्तनात लवचिकता आणावी लागते बदल स्वीकारावेच लागतात, आहे त्या संसाधनांमध्ये काम भागवावे लागते. परिस्थिती हीच कायम राहत नाही, हे ध्यानी ठेवावे लागते. तुम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करताय, तर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावू शकते. तुम्ही ज्या ठिकाणी राहता, त्या ठिकाणी अभ्यासासाठी योग्य बातावरण उपलब्ध नसू शकेल, तुम्हाला तुमच्या घरचे पाठबळ नसेल, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्यात अडचणी येत असतील अशा वेळी हार न मानता अत्यंत लीन आणि नग्न होऊन याचकाच्या भूमिकेत जाऊन यशाला गवसणी घालावी लागते.
६. संयम
प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देणे ही संयमाची पहिली कसोटी आहे. मनासारख्या गोष्टी प्रत्येक वेळी घडत नाहीत आणि मनासारखे प्रत्येक वेळी कोणी वागत नाही अशा वेळी युवक संयम गमावून बसण्याची शक्यता असते. मात्र आपले ध्येय मोठे आहे आणि त्या ध्येयाला गाठण्यासाठीची उद्दिष्टे मी निश्चित केली आहेत, हे एकदा पक्के केले की संयम ढळत नाही. संयमाने सर्व गोष्टी, बाबी आणि माणसे हाताळता येतात. मात्र त्यासाठी आपले वागणे आणि दृष्टिकोन आधी सकारात्मक करावा लागतो. संवादात खूप परिपक्कता आणावी लागते. 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे करून चालत नाही. संयमाने वाटचाल केली, तर यश लवकर प्राप्त होण्यास मदत होते.
७. नम्रता
युवकांच्या वागण्यात नम्रपणा असेल, तर त्यांना इतरांकडून लवकर स्वीकारले जाते. जेवढा स्वीकार जास्त,
तेवढे मार्गदर्शन जास्त. नम्रपणा हा अनेक वाटसरू जोडून देण्याचे काम करतो. 'आधी तुम्ही मग मी' हा विचार नम्रतेचा आहे. नम्न राहिल्याने ऐकून घेण्याची पात्रता वाढते. नम्र असाल, तर चुकीला माफी मिळण्याची शक्यता वाढते. नम्र माणसाकडून धोक्याची शक्यता कमी असल्याने इतर लोक त्याला जवळ करतात. नम्रपणा आदर वाढविण्यासाठी मदत करतो. नम्रपणा हा अनेक मार्ग उघड करतो. त्यामुळे युवकांनी अधिक नम्र कसे होता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात.
८. निर्भय
यश व अपयश, दुःख व सुख, चूक व बरोबर, चढ व उतार या मध्ये युवकांनी निर्भय आणि खंबीर राहायला हवे. आयुष्य हे कधीच एकसारखे नसते. संधी उपलब्ध असतात, तेवढेच आव्हाने व समस्या आ वासून उभ्या असतात. अनेक वेळा अपयश येते आणि आयुष्य अंधारमय झाल्यासारखे वाटते, अशा वेळी निर्भयता अंगी आणावी लागते. तुमचे असणे महत्त्वाचे आहे, बाकी सर्व बाबी व गोष्टी यावर मी मात करू शकतो असा निर्धार करावा लागतो. अवती-भवती घडणाऱ्या वाईट गोष्टींना निर्भयपणे आणि खंबीरपणे सामोरे जावे लागते, तेव्हा कुठे ध्येयाकडे जाण्याचा प्रवास सोपा व सुटसुटीत होतो.
९. समर्पण
गुणवत्ता व बुद्धिमत्ता ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. अनेक वेळा बुद्धिमत्ता हीच गुणवत्ता असाही गैरसमज केला जातो. मात्र बुद्धिमत्ता व गुणवत्ता यांपेक्षाही ध्येयाप्रती किती समर्पण आहे, हे अधिक महत्त्वाचे ठरते. ध्येयाप्रती कायम फोकस राहावे लागते. जेवढे समर्पण जास्त, तेवढा तुम्हाला निसर्ग मदत करतो. समर्पित वृत्ती तुम्हाला ध्येयापासून कधीच विचलित होऊ देत नाही. समर्पण असेल, तर चुकीच्या गोष्टी तुम्हाला स्पर्श करत नाहीत. समर्पणाची एक तेज प्राप्ती होते आणि यशाला लवकर गवसणी घातली जाते.
१०. सकारात्मकता
स्वार्थी व संकुचित वृत्ती ही नकारात्मकता निर्माण करते. नकारात्मकता युवकांच्या आयुष्यात पसरली की निराशेचे ढग जमा होतात. आयुष्यात अंधार येतो आणि युवक रस्ता भरकटतात. नकारात्मकता निर्माण होण्यास आळस हा ही तेवढाच कारणीभूत ठरतो. नकारात्मकता असेल, तर कष्टातून सुटका करून घेण्यासाठी कारण मिळते. या सर्व गोष्टी व बाबी विचारात घेता सकारात्मकता आयुष्यात रुजवणे आणि ती वाढवणे यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागते. सकारात्मक होण्यासाठी युवकांचा सहवास हा सकारात्मक लोकांसोबत असावा लागतो. नकारात्मक रिल्स, बातम्या, मालिका, वेब सिरीज यांपासून जाणीवपूर्वक दूर व्हावे लागते. सकारात्मक चर्चा आणि दुर्दम्य असा आशावाद ठेवावा लागतो. आज जरी माझा नसला, तरी उद्याचा भविष्यकाळ माझ्या हातात आहे, ही धारणा पक्की करावी लागते.
११. प्रामाणिकपणा
आपली ध्येये आणि उद्दिष्टे यांच्याशी तडजोड न करणे म्हणजे खरा प्रामाणिकपणा होय. स्वतःला फसविण्यात काही एक अर्थ नसतो, त्यातून फक्त अपयश आणि वेदना यांची निर्मिती होते. प्रामाणिकपणे आपले कार्य करत राहण्याला एक वेगळा अर्थ असतो. प्रामाणिकपणा युवकांमध्ये असेल, तर त्यातून त्यांना मदत व सहकार्य करण्यासाठी अनेक हात पुढे
येतात. प्रामाणिकपणा हा वागण्यात दिसावा लागतो. जेवढी इतरांना मदत करण्यासाठी पुढे व्हाल, तेवढीच तुम्हाला मदत मिळते. कदाचित ती लगेच मिळत नसेलही, पण कधीतरी आणि कोणत्यातरी स्वरूपात ती मिळत राहते.
युवकांनो, हे अकरा गुण फक्त शब्द नाहीत; ते तुमच्या यशाचे खरे हत्यार आहेत. शिस्त तुम्हाला दिशा देईल, कष्ट तुम्हाला ताकद, तर सातत्य व चिकाटी तुम्हाला विजय मिळवून देईल. लवचिकता बदल स्वीकारायला शिकवेल, संयम व नम्रता माणसे जोडेल, निर्भयता अडथळे पार करायला मदत करेल, समर्पण तुम्हाला अजिंक्य बनवेल, सकारात्मकता आशा जागवेल आणि प्रामाणिकपणा तुम्हाला खरा मान मिळवून देईल. हे गुण अंगी बाळगा, सतत जोपासा. तुमच्यातील ही शक्ती जागृत झाली, की कोणतेही स्वप्न दूर नाही. उभे राहा, पुढे चाला आणि जग जिंका! 'तुमचे यश निश्चित आहे.'