Author
उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टाकडून संपन्न झालेले उपक्रम
मा. डॉ. शरयू ब. तायवाडे
प्राचार्या, तायवाडे कॉलेज महादुला कोराडी

नागपूर विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका" या विषयावरील कार्यशाळा संपन्न -

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका" या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा व नागपूर विभागीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर येथे उत्साहात पार पडला.

करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करिअर कट्टा प्रोत्साहन स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालय, समन्वयक, प्राचार्य तसेच करिअर संसद पदाधिकारी यांना या कार्यशाळेप्रसंगी विभागीय स्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी "विकसित भारत २०४७” या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणाची भूमिका यावर मार्गदर्शनपर चर्चा देखील आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अभिजित वंजारी (आमदार, महाराष्ट्र राज्य) लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणून अमित भोळे (संचालक, महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार) उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) तसेच डॉ. स्मिता वंजारी (कोषाध्यक्ष, अमर सेवा मंडळ व सिनेट सदस्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांची उपस्थिती लाभली यावेळी बोलताना मा. अमित भोळे यांनी करिअर कट्टा हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मा. यशवंत शितोळे यांनी नागपूर विभागातील विद्यार्थ्यांनी करिअर कट्टाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत राज्यस्तरावर आपली ओळख निर्माण केली असल्याचे सांगितले. भविष्यात नागपूर विभागाने आणखी पुरस्कार मिळवून नवे आदर्श निर्माण करावेत, असे त्यांनी आवाहन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाला 'फूड व्हॅन' हस्तांतरित करण्यात आली. यावेळी प्राचार्य प्रवर्तक डॉ. सुजित मेत्रे यांनी करिअर कट्टा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि स्पर्धात्मकता वाढत असल्याचे सांगितले. पुढील काळात महाविद्यालयांचे मूल्यमापन करताना करिअर कट्टा सारख्या उपक्रमांतील विद्यार्थ्यांची कामगिरीही महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात अॅड. अभिजित वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत करिअर कट्टा उपक्रम अधिक सक्षम कसा करता येईल यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी नव्या संधींचा शोध घेत आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

नांदेड विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व "विकसित भारत २०४७" विषयावर कार्यशाळा संपन्न -

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा नांदेड विभागीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच "विकसित भारत २०४७ महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका" या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, भोकर येथे उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वृषाली किन्हाळकर (अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती, दिगंबर बिंदू महाविद्यालय, भोकर) होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब भोसले (सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, नांदेड) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डी. एस. हाके (उपअधीक्षक पोलीस, भोकर, जि. नांदेड) उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षी करिअर कट्टा प्रोत्साहन स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे महाविद्यालय, समन्वयक, प्राचार्य तसेच करिअर संसद पदाधिकारी विजेत्यांना या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी "विकसित भारत २०४७" या संकल्पनेच्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, उच्च शिक्षण आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासातील विद्यार्थ्यांची भूमिका यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध महाविद्यालयांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला.

विभागीय कार्यशाळा (२० एप्रिल ते ३० एप्रिल) -

पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजना संदर्भात विभागीय कार्यशाळा दिनांक २० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान प्रत्येक विभागात घेण्याचा मानस आहे. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयापर्यंत शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील महाविद्यालयापर्यंत हा करिअर कट्टा पोहोचावा, ग्रामीण भागातील विद्याथ्यांनी विकासाची कास धरत, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून पुढे जाता यावे, महाविद्यालयीन व महाविद्यालयातून गेलेले माजी विद्यार्थी या सगळ्यांना बळ देण्यासाठी करिअर कट्टा उपक्रमाच्या निमित्ताने राज्यातील हजारो महाविद्यालयांना एकत्र करून प्रत्येक महाविद्यालयापर्यंत हा करिअर कट्टा पोहोचावा. सुविधा, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक संधीचे मार्गदर्शन प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे हाच उद्देश ठेवून प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन या २० एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात आलेले आहे. २० एप्रिल ला पुणे विभाग, २१ एप्रिल मुंबई विभाग, २२ एप्रिल नागपूर विभाग, २३ एप्रिल अमरावती विभाग, २४ एप्रिल छत्रपती संभाजीनगर, २५ एप्रिल जळगाव विभाग, २७ एप्रील नांदेड विभाग, २८ एप्रिल सोलापूर विभाग व २९ एप्रिल ला कोल्हापूर विभाग याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजना संदर्भात बैठक होतील. या कार्यशाळेमध्ये करिअर कट्टाने राबविलेले उपक्रम एवढेच नव्हे तर येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात अजून काय चांगले उपक्रम राबवता येतील यावर चर्चा करणे आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काय आवश्यक उपक्रम घेता येतील, अववे प कोर्सेस जे या वर्षी सुद्धा राबवल्या जातील त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा यावर सुद्धा चर्चा करणे व तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत हा करिअर कट्टा पोहोचवा यासाठी विभागीय स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्याचे उद्दिष्ट आहे. करिअर कट्टा हा उपक्रम जास्तीत जास्त विद्यार्थीभिमुख व्हावा आणि म्हणून विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये समन्वय साधने आवश्यक वाटत असल्यामुळे विभागीय स्तरावर कार्यशाळा आयोजीत करण्यात येत आहेत. यामध्ये प्राचार्यांची भूमिका जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महाविद्यालयात समन्वयकाची सुद्धा आहे आणि उपक्रमाची माहिती प्राचार्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

करिअर कट्टा - माहिती पुस्तिका (२०२६-२७) -

२५ फेब्रुवारी २०२६ ला करिअर कट्टाने पाच वर्षाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. विकासाच्या वाटेवर चालणारा सक्षम युवक घडवताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षण व्यवस्थेला साथ देणारा नवतरुण निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने आखून दिलेल्या अभ्यासक्रमची चौकट आणि त्या बाहेरची चौकट सांभाळणारा करिअर कट्टा नावाचा उपक्रम आपल्या महाराष्ट्रात सातत्याने सुरू आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक धोरणाला अनुसरून राबवल्या जाणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या उपक्रमांची सर्व माहिती फक्त विद्यार्थ्यांपर्यंतच नव्हे तर विद्यापीठ, महाविद्यालय, पालक व सर्व शैक्षणिक संस्था या सगळ्यांपर्यंत पोहोचवावी यादृष्टीने माहिती पुस्तिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. या माहिती पुस्तिकेमध्ये करिअर कट्टा संकल्पना, करिअर कट्टा उपक्रम आणि विविध कोर्सेस, प्रशासकीय मान्यता पत्रे, प्राचार्य प्रवर्तक व जिल्हा समन्वयक यांची कार्यपद्धती, सामंज्यस्य करार सेंटर ऑफ एक्सलंस, कॉलेज ऑफ एक्सलंस विथ पोटान्शिअल, कार्यशाळा, CSR प्रोजेक्ट, पोर्टल वरील नोंदणी करिअर संसद, विद्यार्थ्यासाठी असलेले करिअर कट्टा App, करिअर कट्टा मासिक, उपक्रम दिनदर्शिका, महाविद्यालयीन स्पर्धा, विद्यार्थी संवाद उपक्रम आणि स्टेट रीसोर्स सेंटर या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.