Author
स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना !
मा. डॉ. राजीव नंदकर
अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक, यशदा, पुणे ९९७०२४६४१७

आज भारतात स्पर्धा परीक्षा ही सरकारी नोकरी मिळवण्याचा एक प्रमुख आणि प्रतिष्ठित मार्ग मानला जातो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), बैंकिंग भरती (IBPS), रेल्वे बोर्ड, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आणि इतर अनेक संस्था दरवर्षी हजारो पदांसाठी परीक्षा घेतात. या परीक्षांमधून प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, बँक अधिकारी, कृषी सेवा अधिकारी इत्यादी महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती होते. स्पर्धा परीक्षेचे मुख्य आकर्षण म्हणजे मेरिटवर आधारित निवड, स्थिर करियर, पगार, पेन्शन, पदोन्नती आणि सामाजिक मान-सन्मान, मात्र ही परीक्षा कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक आहे. लाखो युवक तयारी करतात, पण यश मिळवणारे फार थोडे असतात. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी योग्य नियोजन, सातत्य आणि मानसिक तयारी अत्यंत आवश्यक आहे. प्रस्तुत लेखात स्पर्धा परीक्षाबाबत वस्तुस्थिती व वास्तव स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षांबाबत युवकांमध्ये आकर्षण असण्याची तीन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले, कोणतीही वशिलेबाजी न करता केवळ कष्ट आणि तयारीवर निवड होऊ शकते. दुसरे, शासकीय नोकरीत मान, सन्मान, पद आणि प्रतिष्ठा मिळते. तिसरे, पगार, पेन्शन, पदोन्नती, सुविधा, स्थैर्य आणि संरक्षण यांचा लाभ मिळतो. महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांत पदवीधर झालेल्या सुमारे एक कोटी युवकांपैकी २० लाख युवक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कमी-अधिक प्रमाणात करत आहेत. राज्य व देश पातळीवर ५० पेक्षा अधिक संस्था दरवर्षी स्पर्धा परीक्षांद्वारे योग्य उमेदवार निवडतात म्हणजेच ठरवले तर एक परीक्षार्थी एका वर्षात ५० परीक्षा देऊ शकतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, आयबीपीएस, रेल्वे बोर्ड आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन या प्रमुख संस्थां आहेत की ज्या दरवर्षी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी असले तरी केवळ तयारी करणाऱ्यांपैकी ५ ते ७ टक्के युवकांना प्रत्यक्ष यश मिळते.

स्पर्धा परीक्षेचे खरे वास्तव असे आहे की, राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सुमारे २० लाख युवक असले तरी फक्त ८ ते १२ तास कसून अभ्यास करणारे विद्यार्थी २ ते ३ लाखांच्या आसपास असावेत. जे विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या वर्षापासून अभ्यास सुरू करून तीन ते पाच वर्ष सातत्याने कष्ट घेतात, म्हणजे योग्य नियोजन करून साधारण ८ ते १० तास अभ्यास करतात त्यांची कोणत्याही स्पर्धा परीक्षेत निवड होण्याची शक्यता जवळपास ५१ टक्के वाढते असे म्हणायला वाव आहे. मात्र आज युवकांमध्ये एकाग्रता, फोकसिंग, संयम खूप कमी झाले आहे. अनेकांना कमी कष्टात यश मिळावे असे वाटते आणि त्यासाठी शॉर्टकट मार्ग शोधले जातात. स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न दिवसेंदिवस कठीण आणि क्लिष्ट होत चालला आहे. माहितीपर प्रश्न कमी होऊन विश्लेषणावर आधारित प्रश्न जास्त विचारले जात आहेत. यामुळे युवकांसमोरची स्पर्धा परीक्षेतील आव्हाने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, युवकांना यशस्वी व्हायचे असेल तर त्यांना तरुणपणी मौज-मजा यावर पाणी सोडावे लागेल. हे आज तंतोतंत खरे आहे. त्यामुळे तरुण वयात यशासाठी सखोल आणि सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक आहे.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या युवकांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी आणि सुरू केल्यानंतर कशा प्रकारे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध असे करावे. स्पर्धा परीक्षा हे एक व्यापक क्षेत्र आहे. यात मोठी स्पर्धा आहे आणि यशाची टक्केवारी साधारण ५ ते ७ टक्के आहे. त्यामुळे अभ्यास सुरू करण्यापूर्वी युवकांनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षणाची स्टिम, सध्याचे वय, क्लास उपलब्धता आणि मार्गदर्शक उपलब्धता याची पडताळणी करणे आवश्यक ठरते. स्वतःची अध्ययन बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता यांची चाचपणी सुद्धा करावी लागते. कष्ट घेण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य, ध्येयाप्रती समर्पण, स्वभावातील संयम आणि वागण्यातील शिस्त आपल्यामध्ये आहे का हे सुद्धा आजच्या युवकांनी तपासावे. त्याचबरोबर वेळेचे व्यवस्थापन, प्राथमिकता ठरवणे, संवाद कौशल्ये आणि नेटवर्किंग यांचीही चाचपणी करणे गरजेचे आहे. या सर्व बाबी पडताळून अभ्यास करायचा की नाही याचा निर्णय घ्यावा. कारण एकदा निर्णय घेतल्यानंतर काही वर्षांनी मागे फिरणे कठीण होते.

एकदा अभ्यास सुरू झाल्यावर सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी अभ्यासक्रम आणि मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका यांचा खोलवर अभ्यास करावा. यामुळे अभ्यासाची दिशा भरकटत नाही. नंतर योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी किमान सहा महिने चांगला क्लास लावा आणि त्यानंतर सेल्फ स्टडी करणे आवश्यक आहे. स्टडी मटेरियल उपलब्ध करून त्याची टिपणे किंवा स्वतःच्या हस्तलिखित नोट्स तयार कराव्यात. अत्यंत शांत आणि संयमी राहून अभ्यास करावा. जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा नोकरी करत असाल तर ४ ते ६ तास आणि फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ८ ते १२ तास दर्जेदार अभ्यास करावा.

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात युवकांना अनेक अडचणी येत असतात. परीक्षार्थी समोर येणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या अडचणी म्हणजे वाढणारे वय, काही ठराविक वर्षांनंतर आई वडील आणि नातेवाईकांचे पाठबळ न मिळणे, आर्थिक समस्या, वेळोवेळी अपयशामुळे येणारे नैराश्य, व्यसनाला बळी पडण्याची शक्यता आणि प्रेमप्रकरणातील चढ-उतार. अशा वेळी खूप खंबीर आणि निर्भय राहावे लागते. संयम आणि धीर ठेवावा लागतो. स्वतःला स्व-प्रोत्साहित ठेवावे लागते. स्वतःच्या कष्टावर आणि हिम्मतीवर विश्वास ठेवावा लागतो. प्रलोभनांना बळी पडण्यापासून स्वतःला सावरावे लागते.

मार्गदर्शन, क्लास, अभ्यास पद्धती, पुस्तके आणि नोट्स याबाबत युवकांमध्ये संभ्रम असतो. ध्येय आणि उद्दिष्टे यात विद्यार्थी गफलत करतात. स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे हे ध्येय असेल तर त्या ध्येयाकडे नेणाऱ्या किमान दहा उद्दिष्टांवर मेहनत घ्यावी लागते. त्यामध्ये अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सुयोग्य क्लासची निवड, निवडक पुस्तकांचे वाचन, स्व-हस्तलिखित नोट्स, सातत्यपूर्ण अभ्यासासाठी स्टडी, सुयोग्य मित्रांसोबत गटचर्चा, केलेल्या अभ्यासाची उजळणी व सराव, स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य यांचा समावेश आहे. या सर्व उद्दिष्टांचे काटेकोर पालन केल्यास संभ्रम दूर होतो आणि अभ्यास प्रभावी होतो.

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी युवकाकडे गुण आणि व्यवस्थापन कौशल्ये असणे आवश्यक आहे. युवक हा गुणसंपन्न असावा. त्याच्याकडे कष्टशळूपणा, सातत्य, समर्पण, संयम आणि शिस्त हे गुण असावेत. व्यवस्थापकीय कौशल्ये असावीत, यात वेळ व्यवस्थापन, प्राथमिकता ठरवणे, संवाद कौशल्ये, अंतर्वैयक्तिक संबंध आणि नेटवर्किंग यांचा समावेश आहे. त्याचा दृष्टीकोण कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक रीतीने पाहण्याचा, आशावादी राहण्याचा, जिज्ञासेने जाणून घेण्याचा, इतरांप्रती सहानुभूतीचा आणि कायम नावीन्यपूर्ण शिकण्याचा असावा. मानसिक संतुलन असावे यामध्ये भावनिक स्थिरता, एकाग्रता, आत्मविश्वास, चिकाटी, लवचिकता आणि आत्मनियंत्रण हवे. त्याची चांगल्या विचारांची बैठक असावी यामध्ये सकारात्मक विचार, ठोस विचार, चिकित्सक आणि विश्लेषणात्मक विचार, तर्कसंगत विचार आणि सृजनशील विचार यांची जोड हवी.

परीक्षेचे स्वरूप वेळोवेळी बदलत आहे. त्याचबरोबर वैकल्पिक विषय निवड आणि मुलाखतीची तयारी याबाबत युवकांनी दक्ष राहावे. विद्यार्थी, क्षेत्रातील तज्ज्ञ, बुद्धिवंत आणि विविध संस्थांच्या मागणीप्रमाणे तसेच राष्ट्रीय पातळीवरील नवीन बदलांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप बदलत असते. खरा स्पर्धा परीक्षार्थी अशा बदलांनी जास्त विचलित होत नाही, कारण त्याचा स्वतःवर आणि केलेल्या अभ्यासावर जास्त विश्वास असतो. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा आणि विश्लेषणात्मक परीक्षा यात बराच फरक आहे. त्यामुळे परीक्षार्थीनी लिखाणाचा सराव वाढवणे आवश्यक आहे. विषयाचे वाचन, मनन, चिंतन, विश्लेषण आणि निष्कर्ष असा पाच टप्प्यांचा प्रवास प्रत्येक टॉपिक आणि सब-टॉपिकसाठी करावा लागतो.

मुलाखत ही परीक्षार्थीच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी आहे. मुलाखतीत परीक्षार्थीचे व्यक्तिमत्त्व, संवाद, भावनिक स्थिरता, विचारांची बैठक, स्वभाव, समाजशील वर्तन, दृष्टीकोण, शहाणपण, विविध कौशल्ये आणि अनुभव यांचीचाचपणी केली जाते. मुलाखतीची तयारी ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे युवक ज्या दिवशी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतात त्या दिवशीच या दहा गोष्टींवर काम सुरू करावे.

समजा एखाद्या युवकाने खूप मेहनत घेतली पण स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही तर पुढे काय? हा प्रश्न अनेकांना सतावतो. स्पर्धा परीक्षेत यशाचे प्रमाण साधारण ५ ते ७ टक्के आहे. या अत्यंत अनिश्चित क्षेत्रात करियर करणाऱ्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून "जर मला अपयश आले तर माझा बी प्लान काय आहे?" हे ठरवलेले असावे. हा बी प्लान वास्तववादी आणि काळाशी सुसंगत असावा. ज्यांच्याकडे बी प्लान नाही त्यांनी या महायज्ञात पडू नये. बी प्लान म्हणजे असा पर्याय जो भविष्यातील उपजीविकेसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ देईल आणि स्वतःच्या पायावर उभे करेल. शेवटी स्पर्धा परीक्षेकडे करियरची संधी म्हणून पाहणाऱ्या युवकांसाठी स्पर्धा परीक्षा हा सरकारी नोकरी मिळवण्याचा राजमार्ग आहे. मात्र त्यासाठी किमान तीन ते कमाल पाच वर्षांचे नियोजन पाहिजे. स्वतःमध्ये कष्ट, सातत्य, समर्पण, संयम आणि शिस्त पाहिजे. अभ्यासात व्यावसायिकता पाहिजे. काय वाचायचे आणि काय नाही वाचायचे हे कळले पाहिजे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता फक्त अभ्यासावर फोकस करता आला पाहिजे. "शेवटी परिस्थिती कधीही अडसर नसते, अडसर असतात तुमचे विचार. विचार बदला, परिस्थिती बदलेल." "शेवटी यश तुमचेच आहे."