Author
संपादकीय
मा. यशवंत शितोळे
अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा 'करिअर कट्टा' हा उपक्रम. या उपक्रमाला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झालेले आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. नाम. श्री. उदयजी सामंत, मा. रवींद्रजी साठे (महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई, महाराष्ट्र शासन), मा. डॉ. नामदेव भोसले (सहसचिव, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन) अशा अनेक मोठ्या मान्यवरांच्या आणि विविध महाविद्यालयातील प्राचार्य, समन्वयक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थित नुकताच करिअर कट्टाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत राज्यातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती सर्व स्टेकहोल्डरपर्यंत पोहोचावी या उद्देशाने माहिती पुस्तिका तयार करण्यात येत असते आणि याच पार्श्वभूमीवर विशेषत्वाने नमूद करण्यासारखे असे की, युवकांसाठी करिअर कट्टा मासिक एप्रिल २०२६ हे मासिक आणि माहिती पुस्तिका संयुक्त पद्धतीने निर्मित करण्यात आले आहे.

राज्यभर सेंटर ऑफ एक्सलन्स प्रस्तावित असून, ते अत्यंत परिणामकारक पद्धतीने कार्यान्वित झाले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र ही सुयोग्य रीतीने चालविली जात आहेत. करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दहा स्टेट रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्रनिहाय तज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मॉडेल स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या सहकार्याने राज्यातील प्रत्येक तालुक्यातील कृषी क्षेत्रात उद्योग, व्यवसाय करण्याची आवड असलेल्या तरुणांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमातून पंधराशेहून अधिक उद्योजक घडविण्याचा प्रयत्न यशस्वीपणे सुरू आहे.

'College of Excellence with Potential' ही योजना १००० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या योजनेत महाविद्यालय वैयक्तिक स्वरूपात किंवा क्लस्टर पद्धतीने सहभागी होऊ शकतात करिअर मार्गदर्शन, उद्योजकता विकास, स्पर्धा परीक्षा तयारी आणि कौशल्यवृद्धी यावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थी संख्येनुसार रु. ९००० ते रु. ६०,००० पर्यंत प्रोत्साहनपर निधी उपलब्ध करून दिला जातो. स्किल ट्रेनिंग आणि पायाभूत सुविधा उभारणी ही या योजनेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. सहभागासाठी सामंजस्य करार (MoU) करणे आणि करिअर संसदेची स्थापना करणे अनिवार्य आहे ही योजना केवळ आर्थिक सहाय्यकृती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी आहे. कौशल्यसंपन्न, आत्मविश्वासू आणि स्पर्धात्मक पिढी घडविण्याचा हा एक प्रभावी उपक्रम निश्चितच ठरणार आहे.

राज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत मधुमक्षिका पालनाच्या विषयाचे महत्त्व विद्यापीठ स्तरावर देण्यात आलेले आहे आणि दोन क्रेडिटचे कोर्स अनेक विद्यापीठाने तयार केलेले आहेत या कोर्सला पूरक प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा 'मधुर क्रांती' या उपक्रमांतर्गत केली जाणार आहे. राज्यामध्ये शंभरून अधिक महाविद्यालयांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीचे चार चाकी वाहन प्रशिक्षण देण्याची यंत्रणा उभी केली जात आहे तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना छोट्या व्यवसायासाठी संधी मिळावी या उद्देशाने 'बिजनेस फूड वॅन' देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत.                                                                                                                                                                                                                                                                          

'गर्जे मराठी ग्लोबल' सारखे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून शंभरहून अधिक देशातून पंधराशे पेक्षा जास्त मराठी उद्योजकांचा आणि विद्यार्थ्यांचा समन्वय संवाद सातत्यपूर्णरित्या घडवून आणला जात आहे या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील यासाठी आवश्यक असणारे स्टार्टअप साठीचे तज्ञ मार्गदर्शक देखील करिअर कट्टाच्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधीची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी आय आर पी एस माननीय डॉ. तुषाबा शिंदे सर यांची '५२ आठवड्याची अखंड संवाद शृंखला' हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे. करिअर संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकासाला चालना देत असताना त्यांच्यातील क्षमतांचा योग्य विकास व्हावा आणि त्यांना योग्य वेळी योग्य संधी उपलब्ध व्हाव्या त्या दृष्टिकोनातून हे विशेष उपक्रम राबविले जात आहेत आणि या उपक्रमास विद्यार्थी अत्यंत उत्साह पूर्णरित्या प्रतिसाद देतात.

त्याचप्रमाणे प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक अध्यापन पद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे हा कार्यक्रम ऑनलाईन व निवासी स्वरूपात असून अध्यापन कौशल्य वाढवतो तसेच 'आर्थिक साक्षरता कार्यशाळा' आणि 'आवाजाची कार्यशाळा' हे उपक्रम सातत्याने राबविले जातात हे उपक्रम शिक्षणाची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पर्यायाने प्राध्यापकांच्या व्यक्तिमत्वास उत्तमरित्या चालना देतात.

यासाठी संपूर्ण राज्यांमध्ये जिल्हास्तरीय करिअर संसद नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे प्रत्येक महाविद्यालयामध्ये दोन समन्वयक करिअर कट्टा उपक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर, प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा समन्वयक व प्राचार्य प्रवर्तक हे देखील उपक्रम जास्तीत जास्त सक्षमपणे राबविण्यासाठी कार्यरत आहेत.

आगामी काळात विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम साधनाच्या उद्देशाने एक कृती आराखडा घेऊन करिअर कट्टा मार्गक्रमण करत आहे. यामध्ये राज्यस्तरीय सल्लागार मंडळाची भूमिका ही अत्यंत मोलाची आहे. सल्लागार मंडळांनी दिलेले मार्गदर्शन आणि प्राचार्य प्रवर्तक जिल्हा समन्वयक, महाविद्यालय समन्वयक व करिअर संसद, जिल्हा नियोजन समिती यांची कृती या आगळ्यावेगळ्या समन्वयातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर कट्टा हा उपक्रम सातत्यपूर्णरित्या कार्यरत आहे. करिअर कट्टा मासिक तसेच महाविद्यालयासाठीची माहिती पुस्तिका ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांना दिशा देणारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीस उपयुक्त ठरणारी ठरेल याची निश्चितच खात्री आहे. करिअर कट्टा अंतर्गत उपक्रम राबविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण संचालक व सहसंचालक यांनी देखील खंबीर असे पाठबळ या उपक्रमांसाठी दिलेले आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे, राज्यस्तरीय संपादकीय मंडळानी ही माहिती पुस्तिका अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार व्हावी यासाठी परिश्रम घेतलेले आहे या सर्वांचे यानिमित्ताने मी आभार मानतो आणि थांबतो.

धन्यवाद !

जय हिंद, जय महाराष्ट्र.