'आनंदाची वाट'
मा. डॉ. मिथिला दळवी भावनिक बुद्धिमत्ता ट्रेनर
mithila.dalvi@gmail.com
आपल्या सगळ्यांना कायम आनंदी राहायचं असतं. जगण्यासाठीची सगळी धडपड सुखी, समाधानी आयुष्यासाठीच तर असते, ही खूणगाठ आपल्या मनाशी पक्की असते. आनंदी असणं, स्वास्थ्य शांतता लाभणं, उत्साही वाटणं, कशात ना कशात रमणं, हाताशी घेतलेल्या गोष्टी छानपणे पार पाडता येणं, समाधानी आयुष्याचे हे काही पैलू असतात. जोपर्यंत या अशा सकारात्मक भावना आपण अनुभवत असतो, तोवर आपल्याला छानच वाटत असतं.
पण आयुष्याच्या प्रवासात कधी न कधी नकारात्मक भावना आपल्याला भेटतातच. कधी ताणाच्या स्वरुपात, कधी त्या चिडचिड स्वरूपात. कुणाचा तरी राग येतो, कुणी आपल्याला समजून घेत नाही असं वाटतं, एकटेपणा, उदासी छळायला लागते. कधी गोष्टी पुढे सरकत नाहीत, हताश वाटतं उद्विग्न वाटतं... आनंदी समाधानी असण्याच्या वाटेवर या अशा भावना मोठा अडसरच बनवून राहतात असं आपल्याला वाटत राहत.
कधी असं ही होतं की, इतरांचं कसं छान चाललंय माझ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे नाही होत, बिघडत जातात, माझ्यासोबतच का असं सगळं होतं, असं वाटायला लागतं. त्रागा होत राहतो. अशा पार्श्वभूमीवर इतरांचं ठीकठाक चाललंय हे दिसत असेल आणि पुन्हा पुन्हा लक्ष तिथेच जात असेल तर हेवा, असुया ही वाटायला लागते आणि ती मनात, विचारात ठाण मांडून बसते अगदी ग्रासते. थोडक्यात कधी चेहऱ्यावरचं स्मित जरा मावळतं. मग आयुष्य झाकोळलं, दुःखी झालं असं म्हणायचं का?
मुळात आनंदी आयुष्य म्हणजे काय? सतत चेहऱ्यावर स्मित असणं, उत्साही वाटणं, मजा येणं म्हणजे आनंदी आयुष्य का ? तर तसं नाही आहे. या बाबतीतलं संशोधन सांगतं की, सकारात्मक भावनांसोबत नकारात्मक भावनांनाही सामोरं जाता येणं, दोन्ही प्रकारच्या अनुभवांना हाताळता येणं, यातून आनंदी, समाधानी आयुष्याची बैठक
बनत जाते.
नकारात्मक भावना हाताळता येणं, त्यांना सामोरे जाणं हा आनंदी समाधानी असण्याचा एक मोठा भाग आहे हे ऐकायला जरा विचित्र वाटतं ना? आपण जरा वेगळ्या प्रकाराने या सगळ्याकडे पाहूया.
हॅपिनेस आनंद म्हणजे काय? यावर ना गेल्या जवळजवळ दोन-तीन दशकांमध्ये प्रचंड संशोधन होते. आता ह्याच्यात गंमत अशी असते की आपला आनंद अनेक गोष्टींशी जोडलेला असतो. म्हणजे असं की मला अमुक ठिकाणी सहलीला जायचं आहे. तिकडे गेलं की मला मस्त वाटेलं, आणि वाटतंच. किंवा मला ना आता माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगला फोन विकत घ्यायचा आहे. तो विकत घेता याला हवा, हे मी ठरवलं होतं आणि ते मला जमलंही. त्यामुळे मला अर्थातच छान वाटतं किंवा मला एका धमाल पार्टीला जायचं आहे, मला एखादी नवीन गोष्ट करायची आहे, वेगळी गोष्ट खायची आहे या सगळ्याने आपण एक वेगळा अनुभव जरुर घेतो, अनेकदा तो असा त्यात नावीन्य असतं, आपला आनंद आपण फक्त त्याच्याशी जोडत जर राहिलो तर मग एकदा ती गोष्ट करून झाली किंवा जमली की मग पुढे काय ?
मग पुढच्या आनंदाचा पडाव काय असावा याचा विचार करत राहायचा का? पुढची नवी वस्तू कोणती, पुढची नवी सहल कुठे असं सगळं ठरवत राहायचं का? आणि पुढचा आनंदाचा नवा पडाव येईपर्यंत मधल्या काळात काय करायचं? म्हणजे मधल्या काळात आपण आनंदी नसतोच असा त्याचा अर्थ का? मुळात एखाद्या वस्तूशी, घटनेशी, प्रसंगाशी आपला आनंद जोडणं हीच यातली खरी गोम आहे.
आनंद हे मुळात उद्दिष्ट नसावं, आपलं पोहोचंयचं ठिकाण नसावं, एखाद्या प्रवासामध्ये ते साधून जावं. एखादं उद्दिष्ट साध्य करायचं ते साधन असावं. थोडं क्लिष्ट वाटतंय का? एक उदाहरण घेऊया.
मी एक चित्र काढलं आणि ते इंस्टाग्राम वर टाकलं. माझ्या मित्र मैत्रीणींनी त्याला लाईक्स दिले. काहींनी शब्दात कौतुक केलं आणि या सगळ्याने अर्थातच मला छान वाटतं पण मुळात ते चित्र काढून मला आनंद मिळाला का? ही त्यातली ग्यानबाची मेख आहे. मला माझं चित्र आवडलं आणि वर मित्र-मैत्रीणींनी त्याचे कौतुक केले तर माझा आनंद आणखीनच द्विगुणित होईल. यात अनेक शक्यता असतात. आणखी एक शक्यता आहे की, माझं चित्र मला फारसं आवडलं नाहीय पण अगदीच टाकाऊ ही वाटलं नाही. मला जरा अनिश्चिततेची साशंकतेची भावना आहे. पण मी ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करता येईल एवढं तर मला वाटतंय, आणि मी करते ही पोस्ट आणि ते चित्र काहींना आवडलं तर मग मला जरा बरं वाटतं. साशंकता कमी होते, जरा आत्मविश्वास वाढतो. पण मुळात मला ते चित्र खूप आवडलं नसलं तरी ते चित्र काढायची प्रोसेस आवडते, त्यात मी रमते हे जास्त महत्वाचं. कधी एखादं चित्र जमतं. कधी नाही. एखाद दिवशी माझं चित्र अगदीच मनासारखं नाही आलं तर मी काय करते, हे इथे महत्वाचं. काहीतरी इन्स्टावर टाकायला हवं म्हणून टाकते का? आणि मग किती लाईक्स मी मोजत राहते आहे का? मलाच माझं आजचं चित्र आवडलं नाही तर येणारी जराशी नाराजी, जरासा अस्वस्थपणा या भावनांचं मी काय करते, हे तर विशेष महत्वाचं. सगळ्या भावना आपल्याला काहीतरी सांगत असतात. माझी नाराजी, बेचैनी मला काय सांगते ? हे अमुक प्रकारे केलं तर जसं होतंय ते मलाच खूप नाही आवडत आहे. मग मला माझं चित्र आवडेल यासाठी मी वेगळं काय काय करु शकेन? मी ते वेगवेगळे प्रकार करुन
पाहते का? आणि मग मला त्यातून काही सापडतं का ? आणि काही सापडतं, एखादं चित्र छान होतं, तेव्हा मिळणारं समाधान हे त्या बेचैनीमधून वाट काढतच हाती लागलेलं असतं. बेचैनी आल्यावर मी पुढच्या चित्राकडे वळलेच नाही, चित्र काढणं टाळत गेले तर मग ते नंतरचं समाधान ही मला कधी मिळणार नाही.
आणखी एक उदाहरण पाहू. माझ्या आताच्या मोबाईलपेक्षा जास्त फीचर्स असलेला थोडा जास्त महाग मोबाईल मला घ्यायची गरज वाटते आहे. त्यातल्या काही फीचर्सनी माझी काही काम आणखी सोपी होतील. पण तसा फोन घेण्यासाठी माझ्याकडे आत्ता बजेट नाही आहे. थोडीशी काटकसर करून, थोडेसे काही मोहाचे क्षण टाळून तो फोन घेण्यासाठी मला माझं बजेट मॅनेज करायचं आहे. पुरेसे पैसे साठेपर्यंत मध्ये थोडा काळ गेला, पण मला काटकसर जमली आणि माझ्याकडे तो फोन आला देखील. फोन आल्याने मला छान वाटतंच. पण मी ठरवल्याप्रमाणे मला काटकसर जमली, याचं ही मला खास वाटतंय. तो पर्यंत थोडा हात राखून खर्च करणं, काही मोहाचे क्षण टाळताना जर मनात थोडी खंत, नाराजी उमटली असेल तरी, शेवटी मला जमलं याचं समाधान मोठं वाटतं आणि पुढच्या वेळेला मी जेव्हा असं काहीतरी ठरवते तेव्हा आधीच्या समाधानाचा अनुभव माझ्या गाठीशी असतो आणि म्हणून माझा आत्मविश्वासही थोडा जास्त असतो. त्यामुळे माझ्याकडे हवा तसा फोन नव्हता आणि बजेट नव्हतं याची खंत होती, ती आता एका वेगळ्या सकारात्मकतेकडे गेलेली असते.
सकारात्मक आणि नकारात्मक सगळ्या प्रकारच्या भावनांच्या वळणा आणि नाक्यावरुन आनंदाची वाट अशी शोधता येते, आणि सापडतही जाते. भावनिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून हे शिकता ही येतं. त्या बद्दल आणखी थोडं पुढच्या लेखात.