संपादक या नात्याने आपल्या सर्वांशी होत असलेला संवाद आणि करिअर कडाचे मासिक सुरू करून आज दोन वर्षे पूर्ण होतात. दुसऱ्या वर्षातला हा शेवटचा अंक आतापर्यंत साधारणतः २४ अंक प्रकाशित करण्यात आले, वेगवेगळे विषय या ठिकाणी हाताळण्यात आले. राज्यस्तरीय संपादकीय समिती मधले सदस्य वेळोवेळी बदलत गेले प्रत्येकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका आपल्या लिखाणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व वाचकांच्या पर्यंत पोहोचवलेली आहे, अंक जास्तीत जास्त उपयोगी, माहितीपूर्ण आणि आकर्षक बनावा यासाठी ज्या ज्या वेळेला सूचना केल्या त्या सर्व सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करिअर कट्टाच्या राज्यस्तरीय संपादकीय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
या अंकामध्ये राज्यस्तरीय करिअर कट्टा मासिकाच्या संपादकीय समितीच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे मॅडम यांचा 'उच्च शिक्षण विभागांमध्ये करिअर कट्टा कडून संपन्न झालेले उपक्रम' हा लेख समाविष्ट करण्यात आलेला आहे. मा. अमित भोळे सर (संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार) यांनी स्पर्धा परीक्षा ही आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची प्रेरणादायी यात्रा असल्याचे अधोरेखित करणारा 'स्पर्धा परीक्षाः करिअर आणि जीवन घडविण्याची तत्त्वज्ञानात्मक यात्रा' हा लेख आहे. मा. डॉ. तुषाबा शिंदे सर (IRPS) यांचा 'बारावीनंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी' हा लेख विद्यार्थ्यांना भविष्याचा मार्ग दाखवणारा ठरतो आणि म्हणूनच असा अत्यंत महत्त्वपूर्ण लेख या अंकात आहे. मा. राजीव नंदकर सर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक, यशदा पुणे) यांनी 'युवकांनी स्व समजून घेणे गरजेचे' या लेखातून आत्मचिंतनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. डॉ. वर्षा वैद्य (सहविभागीय समन्वयक, नागपूर विभाग) यांनी माननीय डॉ. तुषाबा शिंदे सरांच्या ५२ आठवड्यांच्या संवाद शृंखलेचा सखोल आढावा घेत 'प्रेरणेपासून यशाकडे नेणारा राजमार्ग' हा लेख लिहिलेला आहे. भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर सातत्याने लेखन करणाऱ्या मा. मिथिला दळवी मॅडम यांचा 'भावनांचा स्वीकार' हा लेख विद्यार्थ्यांना अंतर्मुख होण्याची प्रेरणा देतो. जिल्हा नियोजन समिती सदस्या कुमारी बेदिका संतोष थोरात आणि कुमारी अनिशा अशोक सुरवसे यांचे लेखही या अंकात प्रकाशित झाले आहेत. राज्यस्तरीय करिअर संसदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सर आणि लेखिका डॉ. सुवर्णा विष्णू तायडे मॅडम यांचे मनोगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारे लेख समाविष्ट करण्यात आले आहे. शेवटी डॉ. संदेश कासार सर लिखित प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांच्या ज्ञानपरीक्षणासाठी समाविष्ट करण्यात आली आहे.
अत्यंत सुबकरीत्या तयार केलेला हा अंक विद्यार्थ्यांना केवळ माहितीच देत नाही, तर त्यांच्या विचारांना दिशा देतो, आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची प्रेरणा देतो. करिअर कट्टा मासिक हे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक दीपस्तंभ ठरेल, अशी खात्री वाटते.
सद्यस्थितीला शैक्षणिक वर्ष २०२६- २७ चे प्रवेश राज्यभर सुरू झालेले आहेत अशावेळी या महिन्यातील अंक हा जून महिन्यामध्ये स्थापन होणाऱ्या करिअर संसदेचे संपूर्ण आकलन महाविद्यालयाचे समन्वयक, प्राचार्य व विद्यार्थ्यांना व्हावे या उद्देशाने नियमित अंकांच्या बरोबरच करिअर संसदेची सविस्तर मांडणी यामध्ये करण्यात आलेली आहे. गेल्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेने यावर्षी बारावी मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दोन ते तीन टक्क्यांनी कमी आहे. राज्यभर पारंपारिक अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या आणि मुळातच निकालामधील घसरण यामुळे महाविद्यालय आणिप्रशासनाला विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे हे करत असतानाच विद्यार्थी टिकवण्याबरोबरच व्यवस्था टिकवण्याचे एक आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे. काही महाविद्यालयांमध्ये जे अनिष्ट प्रथा सुरू होत आहेत किंवा होऊ घातलेले आहेत त्या थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये सुधार करण्यासाठी करिअर कट्टाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या सहकायनि काही पाऊलं उचलण्याचा प्रयत्न करीत आहोत. सातत्याने विद्यार्थ्यांना आपली मागणी बदलावी यासाठी आपण प्रोत्साहित करत आहोत विद्यार्थ्यांनी परीक्षेला सोपं जाईल असं महाविद्यालय किंवा उपस्थिती विचारली जाणार नाही असं महाविद्यालय निवडण्यापेक्षा गुणवत्तेचा आग्रह धरणे आणि त्या गुणवत्तापूर्ण महाविद्यालयाची निवड करणे ही मागणी विद्यार्थी करायला लागले तर निश्चितच महाविद्यालय देखील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा त्यांचा असणारा वसा आणि त्यांच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी परिश्रम घेतील असा विश्वास वाटतो. राज्यभरामध्ये उच्च शिक्षणामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून आवश्यक असणारी सर्व प्रकारचे कौशल्य विकासाचे कोर्सेस, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन आणि उद्योजकता विकासासाठी चाललेले विशेष प्रयत्न या सर्वांची इतंभूत माहिती देण्यासाठी सातत्यपूर्ण चाललेला उपक्रम हा दोन वर्षे पूर्ण करत आहेत तिसऱ्या वर्षाचा पदार्पण हे जून महिन्याच्या अंकापासून आपण करत आहोत नक्कीच पुढच्या महिन्यापासून अंकामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला जाणवतील आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. राज्यस्तरीय समितीचे मनःपूर्वक विशेष आभार मानतो आणि संपादकीय मनोगताला विराम देतो.
धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.