Author
'स्त्री : समाजाच्या प्रगतीची एक शक्ती'
मा. प्रा. दिनेश विजया भारत पवार
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

महिला सबलीकरण ही फक्त स्त्रियांचीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. स्त्रियांना शिक्षण, संधी आणि सन्मान दिला तर समाज अधिक सक्षम, प्रगत आणि समतोल बनेल. त्यामुळे 'सशक्त महिला म्हणजे सशक्त समाज' हे तत्त्व लक्षात ठेवून महिला सबलीकरणाला प्रोत्साहन देणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीमुळे आजची स्त्री प्रगतीची शक्ती बनली आहे.

आजच्या आधुनिक समाजात महिला सबलीकरण ही अत्यंत महत्त्वाची आणि काळाची गरज बनली आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्त्रियांचे शिक्षण, स्वावलंबन आणि निर्णयक्षमता वाढणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षण, रोजगार आणि समाजातील निर्णय प्रक्रियेत फारसे स्थान नव्हते. परंतु आज परिस्थिती बदलत आहे आणि स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहेत.

समाजाचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा स्त्री-पुरुष दोघांनाही समान संधी मिळतात. स्त्रिया शिक्षित आणि सक्षम झाल्या तर त्या कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देतात. महिला सबलीकरणासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन आहे. शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतात. त्यामुळे त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात.

महिला सबलीकरणामुळे बालविवाह, हुंडा, स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या सामाजिक वाईट प्रथांवर नियंत्रण येते. स्त्रिया जागरूक झाल्या की त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतात. स्त्री शक्तीमुळे आज समाजातील अनिष्ट प्रथा बंद झाल्या असून प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, सामाजिक बांधिलकी जपत आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपली उत्तुंग भरारी घेत असल्याचे दिसून येत आहे. आज महिला विज्ञान, शिक्षण, राजकारण, क्रीडा, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत मोठी कामगिरी करत आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती वेगाने होते. यातून स्त्रियांना समाजात समान दर्जा, सन्मान आणि सुरक्षितता मिळत आहे, ज्या समाजात स्त्रीला तिचे कौशल्ये अजमावण्याची संधी दिली जाते तो समाज सर्वांगीण दृष्टीने प्रगत होत असल्याचे दिसून येते.

हा महत्वपूर्ण होत असलेला बदल संपूर्ण समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. स्त्रियांना शिक्षण, संधी आणि सन्मान दिला तर समाज अधिक सक्षम, प्रगत आणि समतोल बनेल. त्यामुळे 'सशक्त महिला म्हणजे सशक्त समाज' हे तत्त्व लक्षात ठेवून महिला सक्षमीकरण ही आजच्या काळाची खरी गरज आहे. यासाठी देशातील प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे.

शिक्षणाचा प्रसार

शिक्षण हे असे शस्त्र आहे जो अजमावतो तो एक महान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण करतो, शिक्षण घेणारा व्यक्ती आपली मान समाजात सदैव उंचावतो, त्यामुळे महिलांना दर्जेदार शिक्षण मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो, निर्णयक्षमता विकसित होते आणि समाजात समान स्थान मिळते. या समान स्थानामुळे समान संधी निर्माण होतात नि स्त्री असो की पुरुष यांना आपले कौशल्ये विकसित करून यशस्वी होण्यासाठी फार मोठी मदत मिळते.

आर्थिक स्वावलंबन

स्त्रीला जर सक्षम बनायचे असेल तर शिक्षण घेऊन आर्थिक स्वावलंबन निर्माण करणे म्हणजे यशाची एक परिपूर्ण वाट असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आर्थिक स्वावलंबन निर्माण
करणे गरजेचे आहे. महिलांना रोजगार, उद्योग व्यवसाय आणि कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. आर्थिक स्वावलंबनामुळे त्यांचे समाजातील स्थान अधिक मजबूत होते.

आरोग्य आणि पोषण

महिलांना योग्य आरोग्यसेवा, पोषण आणि सुरक्षित मातृत्व सुविधा मिळणे आवश्यक आहे. निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज.

समान हक्क आणि संधी

महिलांना शिक्षण, नोकरी, राजकारण आणि समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांप्रमाणे समान हक्क व संधी मिळायला हव्यात. प्रत्येक क्षेत्रात महिला समान संधी मिळत गेल्यास एक मोठी क्रयशक्ती उभी राहू शकते व सर्वांगीण विकास होणे सहज सोपे होऊन जाते.

आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास

बदलत्या समाजाची रूपे बघून महिलांना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे व त्यांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. स्त्री एक संयमी बाब असून ती कोणत्याही क्षेत्रात माघार घेणारी नाही, फक्त उच्च दर्जाचे प्रशिक्षण, स्वसंरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान व कौशल्य विकास

बदलत्या काळात बदल घडवणे फार महत्त्वाचे आहे, आपण कितीही परिपूर्ण असलो तरी जगाच्या व्यवहारात क्षणोक्षणी बदल घडत आहेत, झालेला बदल स्वीकारणे व त्या पद्धतीने जाणे कधीही फायदेशीर ठरते, डिजिटल शिक्षण, संगणक कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान महिलांना दिल्यास त्या आधुनिक काळात अधिक सक्षम होतात.

स्त्री ही केवळ घराची नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच यश, समृद्धी आणि संस्कृती फुलते. स्त्री कमजोर नाही; ती संकटांना सामोरी जाऊन त्यांना संधीमध्ये बदलणारी शक्ती आहे.

स्त्री शिक्षित झाली तर दोन कुटुंबे सुशिक्षित होतात. आई, बहीण, मुलगी आणि पत्नी या प्रत्येक रूपात स्त्री प्रेम, त्याग आणि सामर्थ्याची मूर्ती आहे. स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा ती अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवते. स्त्री ही घराची शान आणि समाजाची ओळख आहे. त्यामुळे समान संधी उपलब्ध करणे गरजेचे ठरते.

स्वप्न पाहणारी आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असलेली स्त्रीच खऱ्या अर्थाने सशक्त असते. स्त्रीच्या कष्टामुळेच कुटुंबाचा पाया मजबूत राहतो. जग बदलायचे असेल तर स्त्रीला संधी आणि सन्मान देणे गरजेचे आहे.