'भावनाशीलता' हा अनेक शतकांपासून खास स्त्रियांचा प्रांत मानला गेला आहे आणि 'तर्कसुसंगत विचार करणे' हा पुरुष बर्गाचा. स्त्री आणि पुरुष दोघं ही सर्वसाधारणेपणे भावना वेगवेगळ्या प्रकारे हाताळतात, हे आपण अनेकदा पाहतो. स्त्री आणि पुरुषाची वेगवेगळी शारीरिक रचना, त्यांच्यातले वेगवेगळे हार्मोन्स हे सगळे घटक जीवशास्त्रीय घटक त्यामागे असतातच, पण त्या व्यतिरिक्त समाजामधली स्त्रीची भूमिका सुद्धा यामागे खूप मोठी भूमिका बजावत असते.
आदिमानव काळात पुरुष गटाने शिकार कनायला जायचा, आणि स्त्रियां अन्न गोळा करावच्या समूहाने राहायच्या, मुलं सांभाळायच्या यातून स्त्रियांच्या भाषेची, शब्दसंपदेची जडणघडण वेगळ्या प्रकाराने होत गेली. समोरच्या व्यक्तीच्या भावना स्त्रियांना सहजगत्या समजतात, त्या भावनांना जास्त नैसर्गिकरित्या प्रतिसाद देतात, हे आजवर अनेकवेळा अधोरेखित झालं आहे. ८ मार्चला जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होतो. त्या निमित्ताने या मार्चच्या अंकामध्ये स्त्रिया आणि भावना या संदर्भात थोडा आणखी विचार करूया.
घराचाहेर पडून काम करणाऱ्या स्त्रियांसाठी म्हणून 'वर्किंग विमेन्स डे' साजरा करायची कल्पना १९१० मध्ये पुढे आली. पुढे एकूणच स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी त्याची परिणिती 'विमेन्स डे' साजरा करण्यात झाली. पण त्याचं मूळ घराचाहेर पडून काम करणाऱ्या स्त्रियांपासून झाली आहे, हे लक्षात ठेवणं महत्वांच आहे. शतकानुशतके जगाच्या पाठीवर सगळीकडे शेतात-घरांत स्त्री काम करतेच आहे. पण स्त्री घराबाहेर पडते तेव्हा तिची जबाबदारी अनेक पटीने वाढते. भारतापुरता विचार करायचा झाला तर किमान अर्धशतक तरी भारतीय स्त्री घराबाहेर पडून काम करते आहे व त्यात नोकरी आली, स्वतःचा व्यबसाय आला, अगदी मोलमजुरी ही आली. त्यातून तिचे व्याप वाढले, पसारे वाढले. व्यवधानं वाढली.
या सगळ्या वाढलेल्या व्यवधानांमध्ये तिने तर घरच्यांची देखभाल नीट होईल ना याला प्राधान्य दिलं. मग त्यात कुटुंबाचं खाणं पिणं, घराची स्वच्छता, एकंदर घराचं व्यवस्थापन, मुलांची शिक्षण, पाहुणचार, ज्येष्ठ मंडळींची देखभाल, आजारपणं, सणवार, रुही परंपरा, कुटुंब व्यवस्था, नातीगोती राखणं हे सगळं सगळं आलं. त्या सगळ्याला तिने काहीवेळा इतका प्राधान्यक्रम दिला की तिचं स्वास्थ्य-मग त्यात भावनिक आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्ही आलं अनेकदा मागे पडलं. असं का झालं? आपल्या हातून काही कमी पडू नये आणि कुणाला आपल्याला नाव ठेवायला संधी मिळू नये हा त्या मागचा सर्वसाधारण विचार. प्रत्येक घराबाहेर पडून काम करणाऱ्या स्त्रीने कधी ना कधी हा ताण घेतला आहे. आपण बाहेर पडून काम करण्याने मुलांच्या संगोपनात कमी तर नाही ना राहिली, आपलं घरांचं व्यवस्थापन कमी तर नाही ना पडलं, या बाबत अपराधी भाव अनुभवला आहे.
आणि मग या अपराधी भावाचं करायचं काय? तर स्वतःकडे आणखी दुर्लक्ष करायचं आणि इतरांना नाव ठेवायला संधी द्यायची नाही म्हणून खूप झटायचं, खूप झिजायचं आणि मग हे असंच बराच काळ चालत राहिलं तर काय होतं? मी इतरांसाठी इतक करते पण माझी कोणी दखलच घेत नाही, इतरजण मला कसं समजून घेत नाहीत अशी भावना मनात यायला लागते. बाकीचे जण स्वतःला गृहीत धरताहेत असं वाटायला लागतं, एक प्रकारचा भकासपणा, एकटेपणा याथला लागतो. या सगळ्याचा परिणाम म्हणून कधी इतरांकडून अवास्तव अपेक्षा केल्या जातात, तर कधी स्वतःच्या त्यागाचे गोडवे गायले जातात. थोडक्यात, त्या स्त्रीने स्वतःच्या भावना कधी तपासूनच पाहिलेल्या नसतात किंवा असं म्हणू या तिला तशी संधी मिळालेली नसते
मागच्या एक-दोन पिढ्यांची ही कहाणी आहे. आज बीस ते तीस वयोगटांतल्या मुली हे सगळं पाहत मोठ्या होत आहेत. आईच्या पिढीतले शारीरिक कष्ट, तारांबळ त्यांनी पाहिली आहे. आणि अनेकजणी 'हे नाही बाबा आपल्याच्याने होणार!' असा सूर लावताना दिसताहेत. एकीकडे इतरांसाठी झिजणारी पिढी आणि दुसरीकडे ते झटकून लावणारी पिढी अशी ती विचित्र कात्री आहे. अभ्यास करिअर एकीकडे आणि दुसरीकडे घर, कुटुंब अशी सरळसरळ विभागणी करताना तरुण मुली दिसताहेत, यातलं काहीतरी एकच मी करु शकेन असा सर्वसाधारण सूर त्यात आहे. हे खासकरून शहरी, महानगरी भागात जास्त दिसतं आहे.
मुळात स्वतःची शारीरिक आणि भावनिक काळजी घेता येणं, स्वतः साठी योग्य काय आणि अयोग्य काथ हे ठरवता येणे हे प्रौढ, सज्ञान व्यक्तीचं असण्याचे लक्षणं. अनेकदा नव्या पिढीतल्या मुली आधीच्या पिढी इतके कष्ट करणार नाहीत असे म्हणतात तेव्हा ते स्वतःची शारीरिक आणि भावनिक योग्य काळजी घेत असतात का? असा मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे साधी सरळ गोष्ट. एखाद्या मुलीला नाही आवडत स्वयंपाक करायला मान्य आहे आणि आई-आजींच्या पिढीने जो सकाळ संध्याकाळ साग्रसंगीत स्वयंपाक केला आहे तसा मी नाही करणार असं तिने ठरवलं आहे. पण रोज चौरस आहार पोटात जाईल याची ती काय सोय करते आहे? त्यासाठी गरज पडेल तेव्हा तिला स्वतःला ते शिजवता येत्त आहे का? तिचा दिनक्रम, त्यात बेसिक शारीरिक व्यायाम, हालचाल यांचं ती काय गणित बसवते आहे? आणि स्वतःकडून स्वतःच्या अपेक्षा, तिचे ताण तणाव, इतरांनी जज करण्याची भीती, तिचं तिला हाताळता येतं आहे का?
त्यामुळे कारण कितीही वेगवेगळी असली तरी प्रत्येक पिढी त्या-त्या काळाला, परिस्थितीला सुसंगत अशा ताणाला सामोरी जात असते. या सगळ्यांमध्ये स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याची आणि भावनिक स्वास्थ्याची काळजी घेणे हे कोणालाही चुकत नाही हे तुम्ही कशा प्रकारे करता आहात, त्यासाठी कोणत्या गोष्टी सोडता आहात, कोणत्या गोष्टी नव्याने अंगीकारता आहात, याचं गणित सगळ्यांनाच करावं लागतं. अगदी पुरुषाला ही। फक्त दोघांची ही शारिरिक बैठक वेगळी आहे, निसर्गाकडून त्यांना मिळालेल्या भूमिका वेगळ्या आहेत, म्हणून काही बाबतीत फरक पडतो एवढंच. पण आपापल्या भावनांचे व्यवस्थापन प्रत्येकीला प्रत्येकाला करायचं आहेच.
स्त्रीला भावनांची जाणीव अंगभूत असते म्हणताना, त्याचा रोख तिने स्वतःकडे वळवणं ही सर्वात आवश्यक गोष्ट. स्वतःच्या भावना तपासून बघायची सवय तिने लावून घेणे, हे सर्वात महत्वाचं, तिच्या विचार भावना आणि कृतींचा समन्वय साधता येणं, मला काय हवंय, काय टाळायचं आहे, याचा ताळमेळ राखायची कला प्रत्येकीने शिकायला हवी. हे आहे तिच्याकडे फक्त तिने योग्य प्रकारे बापरायला हवं.
मुलगी शिकली प्रगती झाली, हे वाक्य भावनांच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. मुलगी आपल्या भावनांचं नियोजन शिकली तर त्यातून भावनिकदृष्ट्या सुदृढ समाजाच्चा पाया नक्कीच घातला जाईल.