सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार,
स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठीच्या या उपक्रमामध्ये आपण आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे. जसे केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा केंद्रस्थानी ठेवून आपण त्याभोवती असलेले जे वेगवेगळे घटक आहेत, यावर सखोल चर्चा केलेली आहे. त्याअनुषंगाने आपण एकूणच स्पर्धा परीक्षा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी कशी फायदेशीर ठरते किंवा त्यातून आपण आपले करिअर कसे घडवू शकतो यावर चर्चा केलेली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अंतिम टप्पा हा मुलाखतीचा असतो आणि मुलाखत ही बऱ्याचदा टर्निंग पॉईट ठरू शकते म्हणजे ज्याला आपण म्हणतो 'होत्याचं नव्हतं होणं' हे जे वाक्यप्रचार आहे ते मुलाखतीसाठी अत्यंत सार्थक ठरतात तर, आज आपण अशाच मुलाखतीमध्ये यशस्वी कसं व्हायचं? किंवा त्या मुलाखतीमध्ये आपण सामोरे जाऊन आपली यशस्विता कशी वाढवायची याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत.
नुकताच, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि सध्या दिल्लीमध्ये हे मुलाखत घेण्याचे सत्र सुरू आहे. तर सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची मुलाखत असते जो शेवटचा टप्पा असतो हा दिल्ली येथे 'ढोलपूर हाऊस'ला जिथे यूपीएससीच्या कार्यालय आहे तिथे होत असते. हे कार्यालय शहाजहा रोडला स्थित असून इंडिया गेट पासून अगदी जवळ आहे. त्यामुळे इथे जेव्हा आपल्याला मुलाखतीचा कॉल येतो तेव्हा प्रत्येक उमेदवाराने जमेल तेव्हा, जमेल तसे यथाशक्ती जर इथे मुलाखतीच्या आधी जाऊन बघितलं तर सोयीचं होईल. तसं नॉर्मल वेळेमध्ये आपल्याला यूपीएससीमध्ये प्रवेश करता येत नाही, पण त्या परिसरात आपल्याला जाता येतं. शहाजहा रोडवर जाऊन बघता येतं की हे ऑफिस नेमकं कुठे स्थित आहे? कुठे आपल्याला इंटरव्यूसाठी यायचे आहे? ही झाली त्या दिवसाची पूर्वतयारी, तर आपण आज मुलाखत दिवसाच्या तयारीसाठी काय काय करावं लागत या मुद्द्यावर बोलू या. म्हणजेच काय तर, त्या दिवशी आपण काय तयारी करायची आणि कसं या इंटरव्यूला सामोरे जायचं हे आपण आज बघणार आहोत.
मुलाखतीचा दिवस हा संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा किंवा तयारीचा क्लायमॅक्स असतो ज्याला 'जजमेंट डे' आपण म्हणू शकतो तर या दिवशी परीक्षार्थीने आपले बेस्ट देणे अपेक्षित असते. आता जसे मी या आधी सांगितले की, आपली मुलाखत जिथे होणार आहे तिथे एकदा जाऊन यावं, ती जागा ते स्थळ बघून घ्यावे म्हणजे काय तर तिथे काहीतरी नवीन गोष्टी किंवा नवीन ठिकाणी आपण जातोय अशी एक भावना यायला नको आपल्या मनामध्ये ! तिथल्या गोष्टींशी आपण परिचित असायला पाहिजे, त्या रस्त्यांशी आपण परिचित असायला पाहिजे ही एक त्यामागची संकल्पना तर आहेच त्याचबरोबर एखाद्या न बघितलेल्या गोष्टींसाठी ट्रबल शूटिंगसाठी आपण तयार राहायला पाहिजे म्हणजेच आपण जिथे दिल्लीमध्ये राहतोय तिथून बस नाही किंवा तिथे ओला, उबेर टॅक्सीची सुविधाच नाही हे सगळं आपल्याला आधी कळून जाईल हे परीक्षेच्या दिवशी मुलाखतीच्या दिवशी करण्यापेक्षा हे आधी कळणे बरे नाही का..? त्यामुळे हा सराव करणे गरजेचे आहे. जसे हा सराव करणे गरजेचे आहे तसेच मुलाखतीचा सराव देखील करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण मुलाखतीच्या सरावाबद्दल बोलतोय त्यालाच आपण अभिरूप मुलाखत किंवा मॉक इंटरव्यू असे सुद्धा म्हणतो तर 'जितके मॉक इंटरव्यू देता येईल तितके चांगलं' अशी एक रूढ संकल्पना सर्व परीक्षार्थीमध्ये किंवा जे याबद्दल मार्गदर्शन करतात त्यांच्यामध्ये आहे. पण माझं याबद्दल असं मत आहे की, जितके मॉक होत असतील तितके तर ठीकच आहे पण एका मॉकच्या नंतर दुसऱ्या मॉकमध्ये आपण कमीत कमी तीन ते चार दिवसांचं अंतर ठेवलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा परीक्षेच्या किंवा मुलाखतीच्या आधी पाच ते सात दिवस आपण एकही माँक दिला नाही पाहिजे. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात एक, जेव्हा आपण दोन माँकमध्ये तीन ते चार दिवसांचा अंतर ठेवतो, तेव्हा आपण पहिल्या मॉकमध्ये जे भरून काढण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न दुसऱ्या मॉकमध्ये करत असतो तर या सगळ्या चुका ज्या पहिल्या मॉकमध्ये झाल्या आहेत त्या दुसऱ्या मॉकमध्ये होऊ नये आणि मुख्य परीक्षेच्या वेळेला सुद्धा होऊ नये, हा त्या मागचा एकमेव उद्देश असतो. दुसरी गोष्ट जेव्हा मी म्हणतो की, मुख्य मुलाखतीच्या पाच-सहा दिवसाआधी इंटरव्यू किंवा मॉक देऊ नये ग्रामागचं कारण हे आहे की, आपल्याला एक स्वतःला gather करण्याचा तो वेळ असतो तेव्हा इतरांकडे बघण्यापेक्षा आपण आपल्या आत बघून आपली जी बलस्थाने आहेत ती एकवटायची असते हा तो वेळ असतो. त्यामुळे गडबड करून इतरांच्या गोष्टी मनावर घेऊन या मार्गाने जाऊ की त्या मार्गाने जाऊ? असं करण्यापेक्षा आपण जो आपला मार्ग निवडलेला आहे तो कसा भरभक्कम आहे, तो कसा आपल्याला अधिक सबळ करता येईल हे ठरवण्याची ती वेळ असते, त्यामुळे जरा चित्त शांत ठेवून स्वतःला gather करून आपण मुख्य परीक्षेला जाणे संयुक्तिक असते.
मुलाखतीच्या तयारीबद्दल आपण आधीच्या लेखांमध्ये बोलेलो आहोतच पण ऐनवेळी ऐन दिवशी जी आपल्याला दक्षता घ्यायची आहे ज्या सूचना आपल्याला पाळायच्या आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण सूचना ही असते की, आपण जो पोशाख धारण करणार आहोत ज्याने आपला आत्मविश्वास बळकट होणार आहे या कपड्यांची आपण योग्य काळजी घेतली पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित इस्त्री करून ठेवले आहे की नाही, त्या कपड्यांना काही डाग वगैरे तर लागलेला नाही ना, नवीन असल्यावर जरा बोर्ड कम्फर्टेबल व्हायला वेळ लागतो, टाय घालण्याची सवय करून घ्यावी हे सगळ्या गोष्टी आपण आधी करून घेतल्या पाहिजे ऐन परीक्षेच्या दिवशी त्या हिशोबाने आपण सामोरे गेलो पाहिजेत. या सर्व मुद्द्यांवर आपण तपशीलवार बोललो आहोतच.
मुलाखतीमध्ये 'प्रसंगावधानता' ही एक महत्त्वाची बाब आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण वैशिष्ट्यपूर्णरित्या प्रयत्न केले पाहिजे, प्रसंगावधानता म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये Alertness म्हणू शकतो किंवा Promtness म्हणू शकतो. हा प्रत्येकाच्या ठाई असतो पण कदाचित त्या वातावरणात मुलाखतीच्या दबावाखाली ऐन वेळेस उमेदवार योग्य प्रसंगावधानता दाखवू शकत नाही तर असं होऊ न देता यासाठी आधीपासून सराव करणे फार गरजेचे आहे. मग सराव करणे म्हणजे काय..? तर, सराव करणे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना विशेषतः इंटरव्यूचा अभ्यास करताना आपण दोन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा जुळवून घेता येतात हे बघितलं पाहिजे म्हणजे अगदी दोन टोकाने विरुद्ध असलेल्या गोष्टीदेखील त्यांच्यामध्ये काय साम्यता आहे किंवा यामध्ये काय भेद आहे आपल्याला पटकन एक-दोन-तीन-चार अशाप्रकारे मांडता यायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा कोणी परीक्षार्थी हा इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि सध्याचे अमेरिकेने हल्ले केले आहे यामध्ये असा प्रश्न विचारला की, इतिहासाचा अभ्यास असणारा विद्यार्थी जर एखाद्या लष्कराचा कमांडो असेल तर तो काय वेगळेपण आणू शकतो या प्रसंगात, आपल्या जवानांना आदेश देताना अशा युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेला असे काहीसे उदाहरण आहे, काहीसे प्रसंग आहे जे स्वतः आपण कल्पना करून या मुलाखतीला आपण सामोरे गेले पाहिजे. आता आपण मुलाखतीमध्ये काही विचारले गेलेले प्रश्न पाहू म्हणजे ज्याच्या अन्वये आपल्याला कळेल की प्रसंगावधान किती महत्त्वाचे आहे?
एका विद्यार्थ्याला हा प्रश्न विचारण्यात आला, त्याला एक प्रसंग दिला गेला, ज्याच्यामध्ये एक वडील आणि त्यांचा मुलगा हे दोघे गाडीने फिरायला गेले आणि त्यांचा एक भयावह अपघात झाला. त्याच्यामध्ये वडिलांचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला आणि मुलगा खूप गंभीर जखमी झाला त्या मुलाला आजूबाजूच्या लोकांनी एका नजीकच्या रुग्णालयामध्ये नेले आणि थेट ओटीमध्ये नेण्यात आले. ओटीमध्ये नेले असताना जेव्हा डॉक्टर तिथे आले आणि डॉक्टरांनी त्या मुलाला पाहिलं तेव्हा ते म्हणाले, 'मी नाही करू शकत याचं ऑपरेशन' सगळ्यांनी विचारलं त्या मागचं कारण..? कारण देताना डॉक्टर म्हणाले, 'हा माझा मुलगा आहे' तर हे असे त्या इंटरव्यूमध्ये विचारण्यात आलं तर त्या इंटरव्यू देणाऱ्या उमेदवाराने चटकन सांगितलं की डॉक्टर ही त्या मुलाची आई असू शकते म्हणजे हा कदाचित असा प्रश्न होता की, जिथे उमेदवाराची प्रसंगावधानता, विचार करण्याची क्षमता तपासली गेली आणि तिथे तो खरा उतरला. असे बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात उदाहरणार्थ मलाच माझ्या इंटरव्यूच्या सुरुवातीला विचारलं होतं की, 'Life is not a Midsummer Night's Dream, nor it is a Tempest it is but a Comedy of Errors, so Live it as You Like It' याच्यामध्ये हे काय म्हटलेलं आहे? अस तिथे बसलेल्या पॅनल ने मला प्रश्न विचारला त्यावर मी उत्तर देताना सांगितलं की, 'जीवन जगत असताना, पुढे जात असताना जे जे येईल ते ते अनुभव आपण घेतले पाहिजे.' हे उत्तर सांगताच ते नाही म्हणाले, मी एक विशिष्ट क्लू दिलेला आहे. यात तो काय आहे हे सांगा, त्यावेळी मग मला चटकन तिथेच सुचलं की, अरे ही सगळी जी नाव आहे ही नावं विलियम शेक्सपियरच्या नाटकांची नावं आहे तर मला हे तिथं क्लिक झालं. हीच प्रसंगावधानता इंटरव्यूमध्ये दाखवणे फार गरजेचे आहे. आणि ही प्रसंगावधानता आपल्या प्रत्येकामध्ये असते फक्त तिथे ती ट्रिगर होणं फार गरजेचं असतं आणि ट्रिगर होण्यासाठी आपण सराव करणे गरजेचे असतं आणि हेच महत्त्वाचं आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर, एकदा विचारण्यात आले होते, संसदेमध्ये बराच गदारोळ चालला होता की, स्त्रियांना आरक्षण देण्यात यावं म्हणून. त्यादरम्यान मुलाखतीला आलेल्या एका परीक्षार्थीला प्रश्न विचारण्यात आलं की काय गरज आहे का या सगळ्याची, आरक्षण देण्याची..? असा प्रश्न मलाही विचारण्यात आला होता. मी या प्रश्नाचे उत्तर देताना सांगण्याचा प्रयत्न केला की, कारण आतापर्यंत ज्या काही योजना आलेल्या आहे त्या हिशोबाने जितकी प्रगती किंवा ज्या टार्गेट ने ज्या पॉलिसीज आल्या होत्या त्या अजून फलावलेल्या नाही, त्यामुळे अजून आपल्याला या आरक्षणाची गरज आहे. त्यावेळेला मेंबर मला म्हणाले की नाही, आम्हाला हे उत्तर अपेक्षित नाही. नेमका मुद्दा सांगा. का गरजेचं आहे..? तर तेव्हा मी चटकन सांगितलं की कारण, Women Represent 50% of the Humanity हे उत्तर त्यांना पटलं आणि तेवढे रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ते रिप्रेझेंटेशन जर प्रत्येक ठिकाणी चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन दिसायला पाहिजे असेल तर आपल्याला या आरक्षणाची गरज आहे तर हे तिथल्या पॅनलला माझं उत्तर आवडलं आणि त्यांनी तसे सांगितले देखील मुलाखतीच्या वेळी.
तर मुद्दा हा आहे की आपण जी तयारी करतो त्यामध्ये आपण आपलं एक कोष्टक बनवत असतो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे पण हे सगळं करता करता आपण एका गाभ्याकडे लक्ष दिले पाहिजे. तो गाभा असतो अलर्टनेस, तो गाभा असतो आपल्या सगळ्या संचिताला तिथे आवाहन करून आपल्या उत्तरांमध्ये आणण्याचा, हे सगळं सरावानेच आपल्याला जमेल आणि यासाठी तुम्ही चार पुस्तकं वाचली पाहिजे. दहा लोकांना ऐकलं पाहिजे असं नसतं तर स्वतःचा स्वतःवर केलेला एक सराव असतो, अभ्यास असतो आणि हा सराव केल्यावरच इंटरव्यूमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो किंबहुना यशाची खात्री आपल्याला देता येऊ शकते असं मला आवर्जून सांगावं वाटतं.
"तयारीतून उमटते, आत्मविश्वासाची छटा प्रसंगावधानात दिसते, बुद्धीची कळा
मुलाखतीत जिंकतो, जो संयमाचा मार्ग
यशस्वितेकडे नेतो, त्याचा तेजोमय आभास..'
धन्यवाद..!