Author
उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टाकडून संपन्न झालेले उपक्रम
मा. डॉ. शरयू व. तायवाडे
प्राचार्या, तायवाडे कॉलेज महादुला कोराडी

'नव्या पर्वाची सुरुवात उद्योजकीय संस्कारांचा सूर्योदय'

करिअर कट्टा मासिक शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे हे पहिले मासिक करिअर कट्टा मासिकाच्या सर्व वाचकांना सप्रेम नमस्कार.

२०२६-२७ हे शैक्षणिक वर्ष आपल्या सर्वांसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे, आणि या नव्या पर्वाच्या पहिल्याच अंकाद्वारे आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. प्रत्येक नवीन शैक्षणिक वर्ष हे काही नवीन स्वप्ने, काही नवीन आव्हाने आणि काही नवीन संधी घेऊन येतं असतं. परंतु यंदाचं वर्ष हे केवळ रूढ अर्थानं नवीन वर्ष नसून, ते महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात, विशेषतः उच्च शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनाचे वारे आणणारं वर्ष ठरणार आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

या वर्षी करिअर कट्टा अनेक नवीन प्रयोग करणार आहे, अनेक नवीन उपक्रम राबवणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ माहिती पुरवण्याच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून, विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या प्रत्यक्ष जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृतीशील भूमिका घेणार आहे.

करिअर कट्टा मासिक 'युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी' हे मासिक केवळ वाचून ठेवण्याचं पुस्तक न राहता, ते आपल्या प्रत्येकाच्या करिअरच्या वाटचालीतला एक खरोखरचा सोबती, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनावं, हीच आमची मनस्वी इच्छा आहे.

आदरणीय डॉ. शैलेंद्र देवळाणकर सर राज्याचे शिक्षण संचालक हे सातत्याने उच्च शिक्षणामधील नवनवीन धोरणात्मक बदल, राज्य सरकारच्या भूमिका आणि शैक्षणिक क्षेत्रात उमलणाऱ्या नव्या दिशा यांच्याविषयी अनुक्रमे या मासिकांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी लिहीत असतात. या वर्षी आपल्या लेखक मंडळीत काही अत्यंत मानाची आणि अनुभवसंपन्न नावे जोडली जात आहेत, ज्यांच्या लेखणीतून वाचकांना एक नवीन दृष्टिकोन आणि व्यावहारिक मार्गदर्शन प्राप्त होईल. यंदाच्या शृंखलेमध्ये खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती, राज्यमंत्री दर्जा असणारे सन्माननीय श्री. रवींद्र साठे साहेब हे आपल्याशी नियमित संवाद साधणार आहेत. खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, ज्या उपक्रमांद्वारे ग्रामीण उद्योजकता विकासाला चालना दिली जात आहे आणि ग्रामीण भागातील आर्थिक परिसंस्था अर्थात Rural Ecosystem मजबूत करण्याचे जे प्रयत्न होत आहेत, त्याविषयी सविस्तर आणि सातत्याने लिहिणार आहेत. विशेष म्हणजे याच सदराअंतर्गत करिअर कद्याच्या वतीने राज्यभरात लवकरच सुरू होणाऱ्या 'मधुर क्रांती' या अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती वाचकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल ठरेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम ठळकपणे जाणवेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.

केवळ खादी ग्रामोद्योगाच्या परिप्रेक्ष्यातूनच नव्हे, तर एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आधारित उद्योगनिर्मितीच्या व्यापक उद्दिष्टाने यंदा आपल्या मासिकात आणखी एक महत्त्वपूर्ण सदर सुरू होत आहे. श्री. सागर बाबर हे उद्योजकीय कौशल्य (Entrepreneurial Skills) आणि उद्योजकीय मानसिकता (Entrepreneurial Mindset) या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर वर्षभर सातत्याने लेखन करणार आहेत. केवळ व्यवसाय कसा सुरू करावा? एवढ्यापुरतं हे मार्गदर्शन मर्यादित नराहता, उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक तयारी, जोखीम घेण्याची क्षमता, अपयश पचवण्याची ताकद, आणि सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत राहण्याची वृत्ती, या सर्व बाबींवर ते सखोल चिंतन मांडतील. आजच्या तरुणांना केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी हे सदर अत्यंत उपयुक्त ठरेल. परंतु कोणताही उद्योग, कोणताही व्यवसाय, अगदी वैयक्तिक आयुष्य देखील यांचा मूलभूत पाया हा शेवटी आर्थिक उन्नतीवरच अवलंबून असतो.

आर्थिक नियोजन कसं करावं? बचत कशी करावी? गुंतवणूक कुठे करावी? कर्ज कसं हाताळावं? या मूलभूत आर्थिक साक्षरतेविषयी आपल्या समाजात अद्यापही पुरेशी जागृती नाही. ही उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने श्री. संकेत मुनोत हे आर्थिक साक्षरतेबाबत आपल्याशी नियमित संवाद साधणार आहेत. त्यांच्या लेखातून वाचकांना आर्थिक व्यवस्थापनाचे व्यावहारिक धडे मिळतील, जे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सर्वच वयोगटांतील वाचकांसाठी अत्यंत मोलाचे ठरतील त्याचप्रमाणे करिअर कट्टाच्या यंदाच्या मासिकात याच महिन्यातील ६ जून हा दिवस 'जागतिक इक्यू दिवस' म्हणून साजरा केला जातो आणि या दिनाचे औचित्य साधून १ मे ते ३१ मे पर्यंत आपण दररोज अनुभवलेल्या तीन भावना नोंदवणं असा हा उपक्रम होता याच उपक्रमाची एकूण आकडेवारी ही ६ जून या दिवशी जाहीर केली. या उपक्रमात सक्रियपणे सहभागी झालेल्या प्रत्येकांची नोंद घेताना लक्षात आलं की मे महिन्यात सर्वाधिक नोंदवलेली भावना 'आनंद' ही होती आणि म्हणूनच मा. मिथिला दळवी मॅडम यांनी 'आनंदाचा महिना' या शीर्षकाखाली या उपक्रमाची सविस्तर माहिती आणि त्याबाबतची फलश्रुती व्यक्त केली आहे. मा. राजीव नंदकर सर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी संस्था यशदा, पुणे) यांनी विद्यार्थ्यांना आपली अध्ययन बुद्धिमत्ता वेळोवेळी तपासली पाहिजे आणि तिच्या आधारावर गांभीर्यपूर्वक कामकाज केले पाहिजे हे सांगणारा 'युवकांनो, आपली अध्ययन बुद्धिमत्ता समजून घ्या' हा मार्गदर्शनपर लेख लिहिला आहे. मा. डॉ. शरयू तायवाडे मॅडम यांचा 'उच्च शिक्षण विभागांमध्ये करिअर कट्टा कडून संपन्न झालेले उपक्रम' हा लेख आहे तर मा. डॉ. तुषाबा शिंदे सर (IRPS) यांचा 'पदवी शिक्षणासोबत विकासाच्या नव्या वाटा' याचे महत्त्व पटवून देणारा लेख आहे. तर प्राध्यापक संदेश कासार सर लिखित प्रश्नमंजुषा या मासिकात समाविष्ट करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत वाचनीय आणि माहितीपूर्ण अस हे मासिक ठरणार आहे.

आता या नव्या उपक्रमांच्या आणि नव्या लेखकांच्या परिचयाबरोबरच, एक अत्यंत गंभीर वास्तव आपल्यासमोर ठेवणे संपादक या नात्याने माझे कर्तव्य आहे. या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षण संस्थांसमोरील आव्हाने अधिक प्रकर्षाने जाणवू लागलेली आहेत. यंदाचा प्रवेश प्रक्रियेचा हा महिना तसा अत्यंत संथ गतीने राज्यभरात सुरू आहे आणि ही बाब आपल्या सर्वांसाठीच चिंताजनक आहे. दरवर्षी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन प्रवेशाबाबत जी उत्सुकता दिसते, ती गडबड, ती धावपळ, पालकांची ती लगबग, प्रवेश समित्यांसमोरील रांगा यंदा हे चित्र आपल्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये जवळजवळ दुर्मिळ झालेलं दिसतंय. वर्गखोल्या भरण्यासाठी ज्या ठिकाणी पूर्वी स्पर्धा असायची, त्या ठिकाणी आज जागा रिकाम्या राहत आहेत. ही परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कोविड महामारीनंतरच्या काळात आपल्याला अनेक 'रेड फ्लॅग्ज' मिळत होते विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत होणारे बदल, ऑनलाईन शिक्षणाची सवय लागल्यानंतर पारंपरिक वर्गांविषयीची उदासीनता, करिअर निवडीबाबतची संभ्रमावस्था, उच्च शिक्षणाच्या आर्थिक परताव्याविषयीच्या शंका, आणि नवीन रोजगाराच्या संधींची मर्यादितता. हे सर्व इशारे आपण गांभीर्याने घ्यायला हवे होते, परंतु आज हे सर्व प्रश्न एकवटून एक मोठ्या समस्येच्या रूपाने आपल्यासमोर उभे आहेत. परंतु आपण निराश होऊन हात झटकण्याची ही वेळ नाही. उलट या व्यवस्थेला अधिक सक्षम, अधिक सुदृढ, आणि अधिक काळाशी सुसंगत बनवण्यासाठी आपण सर्वांनी म्हणजेच, शिक्षक, संस्थाचालक, पालक, विद्यार्थी, धोरणकर्ते आणि समाज म्हणून एकत्रित प्रयत्न करण्याची हीच खरी वेळ आहे.

याच एकत्रित प्रयत्नांचा एक भाग म्हणून, या महिन्यात करिअर कट्टाच्या वतीने एका अत्यंत महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा गाभा हा एका साध्या परंतु क्रांतिकारी कल्पनेभोवती फिरतो आजच्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी पारंपरिक महाविद्यालयांना स्वतःमध्ये काही मूलभूत बदल करणं अपेक्षित आहे, किंबहुना ते आता अपरिहार्य बनलं आहे. आपण नेहमी परकीय विद्यापीठांची उदाहरणे देत असतो, आणि ती देताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्या विद्यापीठांमध्ये केवळ ज्ञानदान होत नाही, तर तिथे एक संपूर्ण उद्योजकीय परिसंस्था फुलते. तिथल्या संशोधक प्राध्यापकांची स्वतःची एक भूमिका असते, विद्यार्थ्यांची स्वतःची सक्रिय भागीदारी असते आणि महाविद्यालयाचीस्वतःची संस्थागत गुंतवणूक असते. या तिघांच्या एकत्रित प्रयत्नांतून, सामायिक दृष्टिकोनातून, आणि परस्पर पूरक भूमिकांमधून तिथे काही चांगले स्टार्टअप्स उभे राहतात. प्राध्यापकांकडून मार्गदर्शन मिळतं, संशोधनातून ज्ञान येतं, विद्यार्थी ऊर्जा आणि नवकल्पना घेऊन येतात आणि महाविद्यालय आर्थिक व पायाभूत साधनसामग्री पुरवते. परिणामी अनेक स्टार्टअप्स पुढे जाऊन युनिकॉर्न कंपन्या बनल्याची उदाहरणे पाश्चिमात्य देशांमध्ये प्रस्थापित झालेली आहेत. हाच आदर्श घेऊन, याच यशस्वी प्रारूपाचा (Model) आधार घेऊन, महाराष्ट्राच्या महाविद्यालयांमध्ये देखील अशा प्रवृत्तीची, अशा संस्कृतीची आणि अशा परिसंस्थेची उभारणी व्हावी या उद्देशाने 'स्टार्टअप इकोसिस्टम आणि उच्च शिक्षण' या विषयावर आधारित एक ठोस कृती आराखडा (Action Plan) तयार करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या ठिकाणी पार पडणाऱ्या य कार्यशाळेला राज्यातील सर्व प्राचार्य प्रवर्तक आणि जिल्हा समन्वयक उपस्थित असणार आहेत, आणि अत्यंत सकारात्मक मंथन या ठिकाणी होणार आहे.

मात्र कोणताही कृती आराखडा हा केवळ कागदोपत्री राहिल्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही. हा धडा आपण अनेक उदाहरणांतून शिकलो आहोत. म्हणूनच यंदा आपण कागदी आराखड्याच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष कृतीच्या टप्प्यावर पाऊल टाकले आहे. जागतिक सौर ऊर्जा दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्रात ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये (Green Energy Sector) काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना अत्यंत चांगल्या दर्जाच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एका नव्या कंपनीची स्थापना आपण करीत आहोत. नागपूर येथे पार पडलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या आणि बैठकीच्या दरम्यान या कंपनीचे प्रवर्तक निश्चित करण्यात आलेले आहेत आणि पुढच्या काही महिन्यांत ही कंपनी प्रत्यक्ष अस्तित्वात येऊन तरुणांना योग्य त्या रोजगाराच्या संधी देण्यास सुरुवात करेल. केवळ नोकरी देणारी कंपनी नव्हे, तर तरुणांना स्वतः उद्योजक बनवण्यासाठी हातभार लावणारी ही कंपनी असेल, ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.

हरित ऊर्जा हे भविष्यातील एक मोठे क्षेत्र असून, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांत येणाऱ्या काळात रोजगाराच्या आणि उद्यमशीलतेच्या असंख्य संधी निर्माण होणार आहेत आणि महाराष्ट्रातील तरुणांनी या लाटेचा पुरेपूर लाभघेण्यासाठी सज्ज असले पाहिजे. ग्रीन एनर्जीच्या जोडीने आणखी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करायची आहे. ती म्हणजे डिजिटल कंटेंट क्रिएशन (Digital Content Creation) क्षेत्रात कंपनीच्या स्थापनेची. केंद्र शासनाच्या अंदाजपत्रकामध्ये डिजिटल कंटेंट क्रिएशन या विषयाला जे विशेष महत्त्व आणि प्रोत्साहन दिले गेले आहे, ते लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल कंटेंट क्रिएटर्स निर्माण करण्याचे आपले ध्येय आहे. आजच्या डिजिटल युगात कंटेंट क्रिएटर हाच राजा आहे आणि कंटेंट निर्माण करण्याची कौशल्ये असणारे तरुण आज अक्षरशः लाखो रुपयांची कमाई करत आहेत. परंतु ग्रामीण भागातील आणि तालुका पातळीवरील विद्यार्थ्यांपर्यंत हे कौशल्य, हे प्रशिक्षण, आणि या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. ही पोकळी भरून काढण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तालुका पातळीवर डिजिटल कंटेंट क्रिएटर्सची एक मोठी फौज उभी करून, त्यांना या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा पुरेपूर फायदा घेता यावा, या उद्देशाने ही कंपनी कार्यरत होईल आणि या दोन्हींच्या जोडीने तितकीच महत्त्वाची तिसरी कंपनी म्हणजे कृषी उद्योजकता विकासासाठी (Agri-Entrepreneurship Development) स्थापन होणारी कंपनी. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे, परंतु आजही आपला शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुरेसा सक्षम झालेला नाही. शेतीला उद्योगाची जोड दिल्याशिवाय, शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यसंवर्धन केल्याशिवाय आणि कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणल्याशिवाय शेतकऱ्याचे जीवनमान उंचावणार नाही. हीच गरज ओळखून कृषी उद्योजकता विकासाला बळ देणारी ही कंपनी अनेक तरुणांना शेतीशी संबंधित नवनवीन उद्योगांची दिशा दाखवेल. या तिन्ही कंपन्यांच्या स्थापनेमुळे आणि कार्यान्वयनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात पारंपरिक महाविद्यालयांमध्ये उद्योजकीय संस्कारांचे एक नवे परिवर्तनाचे वारे वाहू लागेल, अशी आम्हाला खात्री वाटते आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये एका नव्या प्रयत्नांचा सूर्योदय आपण सर्वांना पाहायला मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. हा सूर्योदय केवळ काही कंपन्यांच्या स्थापनेपुरता मर्यादित नाही तर तो आहे विचारसरणीतला बदल, तो आहे शिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला बदल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आहे 'नोकरी मागणारे' तयार करण्याच्या मानसिकतेकडून 'नोकरी देणारे' तयार करण्याच्या मानसिकतेकडे होणारा सकारात्मक बदल.

हे सर्व करत असताना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या लाखो विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांकडे आम्ही दुर्लक्ष करूशकत नाही. किंबहुना त्यांच्या प्रयत्नांना अधिक संघटित स्वरूप देणं ही देखील आमची प्राथमिकता आहे. राज्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या एकूण दहा स्टेट रिसोर्स सेंटर्स पैकी पाच सेंटर्सचा '१०० दिवसांचा कार्यबद्ध कार्यक्रम' देखील याच महिन्यात सुरू करीत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी ही केवळ पुस्तकं वाचून होत नाही त्यासाठी योग्य मार्गदर्शन, नियमित सराव, आत्मविश्वास निर्माण करणारे वातावरण, आणि समविचारी मित्रांचा गोतावळा आवश्यक असतो.

हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे काम ही स्टेट रिसोर्स सेंटर्स करीत आहेत, आणि १०० दिवसांच्या या नियोजनबद्ध कार्यक्रमातून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोलाची साथ मिळेल. करिअर कट्टाच्या या वर्षीच्या उपक्रमांमध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणजे 'करिअर संसद' (Career Parliament). या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन करिअर संसदेची स्थापना होते. ही करिअर संसद म्हणजे केवळ एक संघटनात्मक रचना नाही, तर ती आहे महाविद्यालयांमध्ये करिअर विकासाच्या जाणिवा रुजवणारी, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणारी आणि महाविद्यालय व करिअर कट्टा यांच्यात सेतू बांधणारी एक जिवंत संस्था. ह्या नव्याने स्थापन झालेल्या करिअर संसदेच्या माध्यमातून यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक नवीन उपक्रमांना सुरुवात होणार आहे. विशेषत १५ जुलै हा 'जागतिक युवा कौशल्य दिन' (World Youth Skills Day) म्हणून साजरा केला जातो आणि याच निमित्ताने आयोजित होणाऱ्या भव्य उपक्रमात आपण करिअर संसदेच्या सदस्यांचा शपथविधी समारंभ संपन्न करणार आहोत. हा शपथविधी केवळ औपचारिक घटना नसून, तरुणांच्या मनात स्वतःच्या आणि समाजाच्या करिअरविषयीच्या जबाबदारीची जाणीव जागृत करणारा एक ऐतिहासिक क्षण असेल. ही करिअर संसद महाविद्यालयांचे आणि करिअर कद्याचे 'ब्रँड अॅम्बेसिडर्स' (Brand Ambassadors) म्हणून काम पाहतील आणि येणाऱ्या काळात अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करतील, असा आम्हाला अगदी मनापासून विश्वास वाटतो.

प्रिय वाचकहो, हा सर्व लेखाजोखा घेताना आणि आगामी वर्षाच्या योजनांचा आढावा देताना मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. आज आपल्या उच्च शिक्षण व्यवस्थेवर निःसंशयपणे एक मळभाची सावली आहे. प्रवेशाचे घटते आकडे, बेरोजगारीच्या आव्हानांचा वाढता ताण, पारंपरिक अभ्यासक्रमांची काळाशी असलेली असंगती, आणि एकूणच उच्च शिक्षणाच्या परताव्याविषयी समाजमनात निर्माण झालेली शंका, हे सर्व एक प्रकारची मळभ बनून आपल्यासमोर उभं आहे. परंतु प्रत्येक मळभानंतर सूर्योदय हा होतोच. हे निसर्गाचं अटळ सत्य आहे आणि हा सूर्योदय आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे प्राध्यापक, शिक्षक, संस्थाचालक, धोरणकर्ते, पालक, विद्यार्थी, उद्योजक, समाजसेवक आणि एकूणच जागरूक समाजघटक आपण सर्वांनी जर एकजुटीनं, समान दिशेनं, आणि सातत्यानं प्रयत्न केले तर ही मळभ नक्की दूर होईल आणि उच्च शिक्षण व्यवस्था पुन्हा एकदा आपलं हरवलेलं वैभव परत मिळवेल, असा माझा ठाम विश्वास आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आज जे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत, त्यांना आपण सर्वांनी आपापल्या परीनं हातभार लावावा, ही नम्र विनंती. कोणाला आर्थिक स्वरूपात योगदान देता येईल, कोणाला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, मार्गदर्शनाचा वाटा देता येईल, कोणाला आपल्या वेळेचं दान करता येईल, तर कोणाला फक्त एखाद्या होतकरू विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम करता येईल. प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक छोट्या प्रयत्नातून ही चळवळ बळकट होणार आहे.

या नव्या शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने मी सर्व वाचकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना आणि करिअर कट्टाच्या सर्व हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

हे वर्ष आपल्या सर्वांसाठी यशाचं, समाधानाचं, आणि सर्वांगीण विकासाचं ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

करिअर कट्टा हा केवळ एक मासिक न राहता, तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला एक प्रेरणादायी मित्र, मार्गदर्शक आणि सोबती बनो हीच आमची एकमेव अभिलाषा.

चला, या नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर एकत्रित उभं राहून, परिवर्तनाच्या या वाऱ्यांवर स्वार होऊन, उद्योजकीय संस्कारांच्या या नव्या सूर्योदयाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊया !

धन्यवाद !

जय हिंद! जय महाराष्ट्र!