विद्यार्थ्याच्या दृष्टीने आपल्या क्षमता, कौशल्ये आणि त्याप्रमाणे मिळणाऱ्या करिअरच्या संधी महत्त्वाच्या असतात. पंरतु उत्तम करिअर संधी मिळण्यासाठी स्वतःमध्ये कौशल्ये वृध्दींगत करावी लागतात तसेच करिअरच्या संधी माहिती असणे, त्या उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. या दोनही गोष्टी लक्षात घेउन करिअर कट्टा या अंतर्गत विविध उपक्रम घेतले जातात. त्यापैकी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असा उपक्रम म्हणजे करिअर संसद होय. यामध्ये महाविद्यालयीन स्तरावर कमीत कमी ९ विद्यार्थ्यांचा सहभाग असणारे मंत्रीमंडळ स्थापन केले जाते. पदवीच्या दुसऱ्या वर्षात किंवा त्यापेक्षा पुढील कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो. यामध्ये ५० टक्के मुली असून या संसदेचा कालावधी एक वर्षाचा असतो. दि. १५ जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांची संसद स्थापन केली जाते. यामध्ये मुख्यमंत्री, नियोजन, कायदे व शिस्त पालन, माहिती व प्रसारण, उद्योजकता विकास, रोजगार स्वयंरोजगार, कौशल्य विकास, संसदीय कामकाज, महिला व बालकल्याण अशा मंत्रीपदावर नेमणूक केली जाते. या पदांप्रमाणे त्यांची कार्यप्रणाली सुध्दा निश्चित केलेली आहे. महाविद्यालयातील नव्याने अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ही संसद करते. या शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण महाराष्टामध्ये ३० जून रोजी १८५ महाविद्यालय सहभागी झाली व १८५ करिअर संसद स्थापन झाले.
दरवर्षी १५ जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या करिअर संसदेचा स्थापना दिवस असतो. सर्व विभागातील महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी सर्व संसद पदाधिकाऱ्यांना शपथ दिली जाते. जिल्हा नियोजन समितीतील पदाधिकारी या शपथविधी सोहळ्याला अतिथी असतात. विद्यार्थी करिअर संसद शपथविधीचा कार्यक्रम १५ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे होणार असून त्याच वेळी प्रत्येक महाविद्यालय ऑनलाईन जॉईनहोउन आपापल्या करिअर संसदेची शपथ घेणार आहे.
करिअर संसदेमध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची सभा प्रत्येक रविवारी सकाळी आयोजित केली जाते. यामध्ये प्रशिक्षण आणि विकासाला चालना देणारे नेतृत्वगुण यावर व्याख्यान आणि विविध कौशल्यांविषयी माहिती दिली जाते. जिल्हा नियोजन समितीमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांची सभा प्रत्येक शुक्रवारी आयोजित करून त्यामध्ये जिल्हानिहाय सुविधा आणि कमतरता याची माहिती घेतली जाते. करियर संसदेचे अधिवेशन बारामती येथे ३ ते ४ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित केले जाते. यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धापरिक्षांमधील व्याख्यान, स्टार्टअप विषयी माहिती दिली जाते.
'जागतिक युवा कौशल्य दिन' दरवर्षी १५ जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस, भविष्यातील रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी तरुणांना तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्य देण्यासाठी उपयोगी ठरतो. तरुणांमधील बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने 'तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण' याद्वारे विशेष भर दिला जातो.
उत्तम करिअरच्या संधींसाठी शिक्षणाबरोबरच कौशल्य विकसित करणे महत्त्वाचे असते. कौशल्य विकास ही करिअर संधींची पायरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण उपलब्धता आवश्यक असते. रोजगार आणि शिक्षण यातील दरी कमी व्हावी यासाठी नविन शैक्षणिक धोरणामध्येही कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. शालेय स्तरावर तसेच महाविद्यालयीन स्तरावरही विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
दि. २७ जून २०२६ रोजी करिअर कटटा स्टार्टअपइकोसिस्टिम आणि उच्च शिक्षण या विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव या ठिकाणी करण्यात आले होते.
महाराष्ट्र गीताने उद्घाटन सत्रास प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मा. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, शैक्षणिक संचालक, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCE Society), जळगाव यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री प्रफुल्ल पाठक, अध्यक्ष, सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे बनावे, यासाठी स्टार्टअप इकोसिस्टीमची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या आयोजनात मा. प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, विभागीय प्राचार्य प्रवर्तक, मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, प्रा. डॉ. जयेन्द्र लेकुरवाळे, विभागीय समन्वयक तसेच प्रा. डॉ. योगिता चौधरी, सहविभागीय समन्वयक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रांमध्ये पुढील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली -
* करिअर कट्टा व स्टार्टअप इकोसिस्टीमची कृती आराखडा निश्चित करणे.
* ग्रीन एनर्जी, डिजिटल कंटेंट क्रिएशन आणि कृषी क्षेत्रातील कंपन्या व महाविद्यालये यांच्या समन्वयाची रूपरेषा निश्चित करणे.
* महाविद्यालयांची भूमिका व जबाबदाऱ्या निश्चित करणे.
* करिअर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय समित्यांची फेररचना करणे.
* इंडक्शन अवेअरनेस वीक कार्यक्रमाचे नियोजन.
* करिअर संसद पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळ्याचे नियोजन.
* स्टेट रिसोर्स सेक्रेटरी यांच्या कार्यपद्धती व कृती आराखड्यावर चर्चा.
* फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) अंतर्गत इमोशनलइंटेलिजन्स व मधुर क्रांती या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय.
विविध सत्रांमध्ये सहभागी प्राचार्य, प्राध्यापक, समन्वयक आणि तज्ज्ञांनी आपल्या सूचना मांडल्या. राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात मानपत्र वाचन सेवानिवृत्त होणाऱ्या प्राचार्यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 'करिअर कट्टा स्टार्टअप इकोसिस्टीम आणि उच्च शिक्षण' ही राज्यस्तरीय कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेमुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योजकता, नवोपक्रम, उद्योग-शिक्षण समन्वय आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी दिशा निश्चित झाली. सहभागी प्राचार्य, प्राध्यापक व समन्वयकांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा उपयोग आपल्या महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कटटा या उपक्रमांतर्गत तरूणांसाठीचा विशेष उपक्रम म्हणून २० जून २०२६ रोजी सूर्यसेवा महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड नागपूर येथे विद्यार्थी आधारित सोलर सेवा कंपनी स्थापनेची पहिली धोरणात्मक मिटिंग यशस्वीरित्या पार पडली. या ऐतिहासिक बैठकीचा मुख्य उददेश तरूणांच्या हाताला काम घरांना स्वच्छ उर्जा मिळणे हा होता. या बैठकीमध्ये सोलर एमर्जी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मा. श्री प्रफुल्ल पाठक यांची प्रमुख उपस्थिती होते आणि त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रातून ३१ प्रवर्तकांचा सहभाग या सभेला होता.
मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपल्या सोलरच्या कंपनीसाठी सूर्यसेवा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावास मान्यता मिळालेली आहे.