Author
संपादकीय
मा. यशवंत शितोळे
अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र

करिअर कट्टाचा जानेवारी महिन्याचा हा अंक विशेष आहे. ह्याचे कारण जानेवारी २०२६ मधील या अंकाची मांडणी करत असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्तृत्वसंपन्न महिलांच्या सन्मानाची संधी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त करिअर कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून हा आधुनिक सावित्री पुरस्काराचा कर्तृत्व सोहळा पार पाडीत असतो. मुख्यत्वे या पुरस्कारासाठी संस्थाचालक, प्राचार्य, प्राचार्य प्रवर्तक, महाविद्यालयीन समन्वयक, जिल्हा समन्वयक, प्रशासकीय अधिकारी, कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या, आर्थिक क्षेत्रातील तज्ञ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेहमीच जबाबदारीच्या पलीकडे जाऊन आपल्या कामातून समाजासाठी योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो अशा सर्व आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ प्राप्त स्त्रीशक्तीला संपादक या नात्याने विनम्र अभिवादन करतो त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो.
या बरोबरच करिअर संसदेचा अधिवेशनाचा कालावधी हा ३ जानेवारी ते ७ जानेवारी असा आहे. या निमित्ताने २५ अधिक मान्यवर या अधिवेशनामध्ये मार्गदर्शनासाठी सहभागी होत आहे स्पर्धा परीक्षा, उद्योजकता विकास, आर्थिक साक्षरता या सगळ्यांचा भरगच्च समावेश असलेल्या या अधिवेशनामध्ये दहापेक्षा जास्त वेगवेगळ्या कृषी क्षेत्राशी निगडित असणाऱ्या तसेच उद्योजकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या बाबींचे प्रशिक्षण तरुणांना या पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये देण्यात येणार आहे. २०२६ ची सुरुवात करत असतानाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी असणार आहेत. महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास प्रबोधिनीच्या मान्यतेने करिअर कडूया अंतर्गत पाच दिवसाचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. बदलत्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे. दररोज AI चा वापर वाढत आहे, अशावेळी या तरुणाईला योग्य दिशा देण्याच्या अनुषगाने सर्व प्राध्यापकांना अद्यावत ज्ञान जाणून घेणे, त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे आणि या माध्यमातून विद्यार्थी घडवण्यासाठी स्वतःला सिद्ध करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या बाबीचा विचार करूनच ही राज्यातली पहिली AI टीचर कार्यशाळा या अधिवेशनाच्या दरम्यान घेतली जाणार आहे. या अधिवेशनामध्ये ११०० पेक्षा जास्त शिक्षक प्राचार्य व विद्यार्थी पाच दिवस सहभागी होत आहेत सलग तिसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी अत्यंत उत्साहाने करत आहेत, त्याचा देखील उल्लेख मला आवर्जून या वेळी करावासा वाटतो. या बरोबरच विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने करिअर उपक्रमाचे आयोजन गणित दिनाच्या औचित्याने करण्यात आले होते, त्यामध्ये २२ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला हे देखील या ठिकाणी आवर्जून नमूद करावे वाटते. वर्षभर चाललेल्या करिअर संसदेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये दररोज ४० मिनिटं व्यायाम दररोज एका पुस्तकाचे क्रमशः वाचन आणि मोबाईलचा वापर कमी करावा या उद्देशाने स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी केलेले वर्षभराचे प्रयत्न या सगळ्याचा वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेऊन राज्यस्तरीय निवड समितीने पाच उत्कृष्ट करिअर संसदेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे, यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल ज्या माध्यमातून ते लॅपटॉप खरेदी करून स्वतःला स्पर्धेमध्ये सिद्ध करण्यासाठी पाऊल पुढे जातील हा उद्देश आहे. या विद्यार्थ्यांची नावे स्वाती भोजराज भारती (धनवटे नॅशनल कॉलेज), सानिया राजू कान्हारकर (रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स), मुकादम अब्दुल करीम अली (श्रीमती इंदिरा महादेव बहिरे कला महाविद्यालय, श्रीमंत चंदुलाल शेठ वाणिज्य महाविद्यालय व श्रीमती शोभाताई चंदुलाल शेठ विज्ञान महाविद्यालय खेड रत्नागिरी), वेदिका थोरात (विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी, बारामती) आणि सानिया शेख (राजश्री शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे, अमरावती) अशी आहेत या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
करिअर कट्टा मासिकाच्या अंतरंगाचा विचार करीत असताना; राज्याचे उच्च शिक्षण संचालक सन्माननीय डॉ. शैलेंद्र देवळाणकर सर यांनी '२१ वे शतक सेमीकंडक्टर्सचे या विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे' जाण्याच्या प्रवासात सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचे असेल तर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासावर भर द्यावा लागणार आहे, असे मत लेखाच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे. माननीय डॉ. तुषाबा शिंदे सर (आय. आर. पी. एस) यांनी 'RBI आणि बैंकिंग PO परीक्षा एक उत्कृष्ट करिअर पर्याय' हा लेख लिहिलेला आहे. माननीय अमित भोळे सर (संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार) यांनी 'केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मुलाखत तयारीः मार्गदर्शन' या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केलेले आहे. माननीय राजीव नंदकर सर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक यशदा, पुणे.) यांनी 'युवकांसाठी अध्ययन भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता कौशल्य' यावर प्रकाश टाकलेला आहे या तीन बुद्धिमत्ता युवकांना केवळ परीक्षा नव्हे तर; संपूर्ण जीवनात यशस्वी बनवतात असे महत्व लेखाच्या साह्याने अधोरेखित केलेले आहे. माननीय मिथिला दळवी मॅडम ह्यांनी 'नवे वर्ष नवे संकल्प' या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे.
प्रा. दिनेश पवार यांचा या अंकात 'स्वप्न साकार करू पोलीस उपनिरीक्षकाचे (PSI)' हा अभ्यासपूर्ण लेख आहे. प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे मॅडम यांचा 'उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टा कडून संपन्न झालेले उपक्रम' यावरचा माहितीपर लेख आहे तर प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सर यांचा 'करिअर संसद अधिवेशन युवा वर्गाचा महाकुंभ' ठरणार आहे असे प्रतिपादित करणारा लेख आहे तसेच माननीय डिंपल मित्तल यांचा लेख समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि डॉ. श्रीकांत इंगळे यांचे वृत्तवेत चालू घडामोडी तर प्राध्यापक संदेश कासार यांची प्रश्नमंजुषा आहे. या अंकाचे वैशिष्ट्ध विशेषत्वाने नमूद करायचे झाल्यास, या अंकात बारामती येथे होणारा राज्यस्तरीय करिअर संसदेच्या अधिवेशनात आधुनिक सावित्री पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या कर्तृत्वसंपन्न महिलांच्या मुलाखतीचे शब्दांकन घेण्यात आलेले आहे.
या अंकासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आपल्या अमूल्य वेळ देऊन लेख लिहिला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो.
अशाप्रकारे संपादकीय मंडळाच्या साह्याने जानेवारी महिन्याचे युवाकांसाठी करिअर कट्टा मासिक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास वाटतो आणि म्हणूनच अथक प्रयत्नातून तयार करण्यात आलेला या अंकासाठी संपादकीय मंडळाचे आभार मानतो आणि थांबतो.
धन्यवाद..!
जय हिंद, जय महाराष्ट्र.