Author
नवं वर्ष, नवे संकल्प
मा. डॉ. मिथिला दळवी
भावनिक बुद्धिमत्ता ट्रेनर

करिअर कट्टाच्या सगळ्या वाचकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. नववर्ष आणि त्याला जोडून काहीतरी संकल्प करणे, ही एक खास प्रथा आहे. नव्या वर्षासाठी काहीतरी संकल्प करणे याला साधारण ४००० वर्षांचा इतिहास आहे.
मुळात ही बॅबीलोनियन संस्कृतीमध्यली प्रथा. शेतीच्या नव्या हंगामात जुनी देणी, उधार उसनवाऱ्या चुकवायसाठी देवाला केलेलं हे प्रॉमिस. यातून शुभं घडेल, बरकत येईल अशी त्या समाजाची श्रद्धा होती. काळानुरूप त्यात काही बदल झाले. साधारण एकोणीसाव्या शतकापासून नव्या वर्षी संकल्प करणं ही प्रथा जगभर पाळली जाते आहे. हा संकल्प म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी स्वतःला केलेलं प्रॉमिस.
या संकल्पाचं स्वरुपही जरा खासं असतं. यात सर्वात लोकप्रिय संकल्प आहेत ते स्वास्थ्याच्या फिटनेसच्या संदर्भातले. हेल्दी खाणं, व्यायाम करणं, नियमित चालायला जाणं, योगासनं करणं, सकाळी लवकर उठणं, नीट झोप घेणं अशा प्रकारचे. काहीतरी नवं शिकणं, भावनिक आणि शारीरिक दोन्ही आघाड्यांवर स्वतःकडे जास्त लक्ष देणं, अशा संकल्पांनाही मागणी भरपूर. गेले कित्येक वर्ष हा संकल्प प्रत्यक्ष पार पडण्यापेक्षा नव्या वर्षसाठी संकल्प केला, याला जास्त महत्व यायला लागलं आहे. त्यामुळेच जगाच्या पाठीवर सगळीकडे ही जितकी प्रथा आहे तितकाच हा विनोदाचा विषयही आहे. यंदा संकल्प केला आणि तो सोडूनही दिला, कारण पुढच्या वर्षी पुन्हा तो करायला शिल्लक राहायला हवं ना!!
भावनिक बुद्धिमत्तेच्या मुलांच्या कार्यशाळेमध्ये 'नव्या वर्षांचे संकल्प' या विषयावर आम्ही बोलत होतो. संकल्प अयशस्वी का होतात, ते अर्धवट का सुटतात? याचा उहापोह होत होता.
संकल्प का पुरे होत नाहीत? याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे स्वतःकडून खूप कडक अपेक्षा केल्या जातात.
म्हणजे रोज उठून मी चालायला जाईनच, साखर अगदी सोडूनच देईन, असे निश्चय करणे हे वाईट नक्कीच नाही पण जेव्हा हे जमत नाही तेव्हा काय स्वतःवर अचानक कड़क बंधन घालणं, स्वतःवर जाचक अटी नियम लागणे यांनी काही काळासाठी मोटिवेशन जरूर होतं पण मुळात अशा नियमांनी मला जखडल्यासारखं वाटत असेल तर काय ! काही अगदी महत्त्वाच्या कारणासाठी एखाद दिवस आपला निश्चय आपल्याला पार पाडता आला नाही तर काय करायचं विचार झालेला नसतो. संकल्पाबाबत खरी गोष्ट इथे सुरू होते.
मी राहते तिथे अगदी सकाळी बरंच धुकं असतं, गारठा असतो, म्हणून लोक सकाळी शेकोट्या पेटवतात खूप धूर होतो. मी माझ्या नव्या वर्षाच्या सकाळी उठून फिरायला जाते, आणि आठवडाभरातच माझ्या लक्षात येतं की भी सकाळी फिरायला गेले की मला अगदी ठसका लागतो आणि मास्क लावून फिरायला जायचं असेल तर ते फिलिंग विचित्र असतं, आणि मला मजा नाही येत. आता असं सगळं जेव्हा होऊ लागतं तेव्हा कळतं की माझ्या निश्चयातला हा प्रॅक्टिकल पैलू आधी लक्षात आला नव्हता. आणि असं होणं अगदी स्वाभाविक असतं. एखादी गोष्ट करण्याआधी त्याचे सगळे पैलू कळणं कठीणच असतात.
पण मग अशावेळी खरी ग्यानबाची मेख काय असते? सकाळी फिरायला जाणं हा माझा संकल्प आहे की स्वास्थ्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकायचं आहे, म्हणून मी सकाळी फिरायला जायचं ठरवलं आहे, यातला फरक लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. माझा स्वास्थ्य हा माझा मुख्य फोकस असेल, आणि सकाळी फिरायला जाऊन त्रास होत असेल तर स्वास्थ्याच्या दिशेने मी दुसरं काय करु शकेन, असा माझा विचार होऊ शकतो.
मग मी वेगवेगळे पर्याय आजमावू शकते. सकाळ जमत नसेल तर संध्याकाळी फिरायला जाऊन कसं वाटतं हे मला पाहता येईल किंवा संध्याकाळी ट्रॅफिकचा, आवाजाचा त्रास होत असेल तर मग फिरायला न जाता स्वास्थ्याच्या दृष्टीने मी दुसरं काहीतरी करू शकते? उदाहरणार्थ योगासनाचा वर्ग, तिथे मी प्रत्यक्ष जाऊ शकते किंवा ऑनलाईन वर्ग ही जॉईन करू शकते. किंवा मी आठवड्यामध्ये ठरवून एक दोन वेळेला खेळायला जाऊ शकते. माझ्याबरोबर ज्यांना खेळायला आवडतं, अशा काही मित्र-मैत्रिणींना माझ्या प्लॅन मध्ये सामील करून घेऊ शकते. स्वास्थ हा जो मुख्य उद्देश आहे, तो या सगळ्यातून साध्य होतोय, हे महत्वाचं, अशा वेळी मूळ उद्देशाशी सुसंगत अशी कृती निवडण्यात मला लवचिक (फ्लेक्झिबल) राहता येतं.
त्यामुळे नव्या वर्षाचा संकल्प निवडताना एखादा उद्देश निवडला तर तो संकल्प साध्य होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्या उद्देशाकडे जाणारा एखादा मार्ग चालत नाहीये, हे लक्षात आलं तर वेगळा मार्ग निवडायचं स्वातंत्र्य आपल्याकडे राहतं. संकल्प हातून सुटून जाऊ नये यासाठी ही बाब फार महत्वाची आहे.
आणखी एक बाब संकल्प निवडताना फार महत्वाची आहे, ती म्हणजे मला तो संकल्प 'माझा' वाटला पाहिजे. जो निवडेन तो माझ्या आत्ताच्या परिस्थितीशी सुसंगत हवा. म्हणजे माझे सगळे मित्र नव्या वर्षात जिमला जायचं ठरवताहेत, म्हणून मी पण त्यांच्यासोबत तोच संकल्प
ठरवतो. आणि मी नेमकी स्पर्धा परीक्षा किंवा सीए किंवा तत्सम परीक्षांची तयारी करतो आहे, माझं रोजचं वेळापत्रक वेगळं असतं. अशा वेळी मित्रांची आणि माझी वेळ जमून येण्याची शक्यता कमी. आणि एकट्याने जिमला जायला मला कंटाळा येतो, असं असेल तर हा संकल्प हातून सुटण्याची शक्यताच जास्त असते.
व्यक्ती म्हणून मला माझ्यात काय बदल व्हायला मला हवा आहे, त्यानुसार संकल्प हवा, आणखी एक महत्वाची बाब- त्यातले 'अॅक्शन पॉइण्ट्स' माझ्या, आपल्या पिंडाला मानवेल असे हवेत. समजा मला पहाटे उठून अभ्यास करणं अगदी जिवावर येतं आणि सध्या दिवस कसा हातातून निसटून जातो हे कळत नाही, कामं अभ्यास तुंबून राहतो, म्हणुन त्यामुळे मी ठरवते की आता मी पहाटे उठून अभ्यास करणार. म्हणजे सकाळी सगळं वातावरण शांत असतं, मित्र मैत्रिणी उठलेले नसतात आणि मला डिस्ट्रॅक्ट करणारे मेसेजेस वगैरे काही येत नाहीत. इरादा चांगला आहे, पण मी रात्री वेळेत झोपत नसेन आणि म्हणून मला सकाळी उठणं जड जातं, तर हा 'अॅक्शन पॉईंट्स' अंमलात येणं अवघड आहे.
म्हणून आपल्या स्वतःच्या अडचणी, उणीवा समजून घेऊन उद्देश ठरवणं हे ही महत्वाचं आणि त्यानुरुप आपल्या पिंडाशी परिस्थितीशी मिळते जुळते 'अॅक्शन पॉईंट्स' ठरवणं हे ही तितकंच महत्वाचं.
याबद्दल आणखी बोलूया पुढच्या अंकात. तोवर नव्या वर्षाच्या संकल्पासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !